रोकड, वाहने, जमिनीही डावावर
सांगली : मतदान प्रक्रिया समाप्त होताच बुधवारी सायंकाळपासून आमदार कोण होणार यावरून चर्चा व पैजांना ऊत आला आहे. रोकड, वाहने, जमिनीही डावावर लावण्याचा खेळ रंगला. लोकसभेप्रमाणे विधानसभा निकालाबाबत असलेली उत्सुकता या पैजांमधून दिसून येत आहे.
सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अनेक प्रकारच्या पैजा लागल्या होत्या. जेवणावळ्यांपासून पैशापर्यंत अन् वाहनापासून जमिनीपर्यंतच्या पैजा लागल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही अशाच पैजा आता लावल्या जात आहेत. सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले आहे. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
त्यातच पैजांमधूनही धक्कादायकरीत्या अंदाज वर्तविण्यात येत आहेत. सर्वाधिक पैजा सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ व जत मतदारसंघात लावल्या जात आहेत. निकाल लागताच ठरल्याप्रमाणे पैजांचा हिशेब केला जाणार आहे.
तोंडी व लेखी पैजा
काही गावांत तोंडी, तर काही ठिकाणी लेखी स्वरूपात पैजा लावण्यात आल्या आहेत. लेखी पैजांवर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. जेवणावळ्यांच्या पैजा सर्वाधिक आहेत.
जिथे चुरस, तिथे पैजा
जिथे सहजासहजी अंदाज व्यक्त करणे मुश्कील आहे, अशा ठिकाणच्या निकालावर अधिक प्रमाणावर पैजा लावण्यात येत आहेत. सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ व जत या मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात पैजा अधिक दिसताहेत. त्याखालोखाल शिराळा, खानापूर या मतदारसंघात पैजा लावल्या जात आहेत.
राजकीय कार्यकर्ते अधिक
पैजा लावणाऱ्यांमध्ये राजकीय कार्यकर्ते, नेते यांचा समावेश अधिक आहे. दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही पैजा लावल्या गेल्या आहेत. वादातूनही अनेकांनी डाव लावले आहेत.