कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल

 

नागपूर : मध्य नागपूर मतदारसंघात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड करणे कॉंग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा, तोडफोड, धमकावणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अतिरिक्त ईव्हीएम नेणारे वाहन किल्ला परिसरातील बूथबाहेर निघाले. त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबविली. त्यांनी शिवीगाळ करीत त्यावर हल्ला केला व तोडफोड केली. त्याचवेळी एमएच १९ बीयू ६०२७ ही गाडीदेखील निघाली. त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यावरदेखील हल्ला करण्यात आला. तरुणांनी दगड व लोखंडी रॉड्सने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले. तोडफोड करण्यात आलेली गाडी कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले. ही बातमी पसरताच भाजप व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आणि त्यानंतर रात्री तुफान राडा झाला. ईव्हीएमसोबत कुठलाही गैरप्रकार झाला नसतानादेखील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत झोन अधिकारी हुमैद नाजीर खान यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांना नियमानुसार राखीव ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले होते. त्यांच्या वाहनात ते ठेवण्यात आले होते. संध्याकाळी सात मतदानाचा अहवाल फॉर्मची झेरॉक्स प्रत घेण्यासाठी बुथवरून वाहनातून निघाले. कल्याणेश्वर मंदिर ते झेडा चौकादरम्यान झेरॉक्स सेंटर पाहून खान थांबले. तेथे हा प्रकार घडला. खान यांनी शेळके यांना नेमके तथ्यदेखील सांगितले. मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
दरम्यान, महालातील निखीळ गाडगीळ हा तेथे उभा होता. त्याच्यावर गर्दीतीलच एका व्यक्तीने चाकूने वार केले. त्याला त्याच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *