मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने जवळपास २०० जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे आदी अनेक मनसे नेत्यांना संधी देण्यात आली. यापैकी काही मतदारसंघात भाजपाने मनसेला जाहीर पाठिंबा दिला होता. शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेने बाळा नांदगावकर यांना संधी दिली आहे. उद्या मतमोजणी असून तत्पुर्वी बाळा नांदगावकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबद्दल त्यांनी आता माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झाल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणाले, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाचं लग्न आहे. म्हणून ते सकाळी राज ठाकरेंकडे आले होते. त्यांनी राज ठाकरेंना पत्रिका दिल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांकडे पत्रिका द्यायला जात होते. ते म्हणाले की चला सोबत, म्हणून मीही त्यांच्याबरोबर आलो.
बाळा नांदगावकर यांना भाजपाचा पाठिंबा
“पाठिंब्याबद्दल बाळा नांदगावकर किंवा मनसेने आपल्याला बोलण्याची वाट न पाहता आपण स्वतःहून त्यांचा प्रचार करू. स्वइंजिनाप्रमाणे आपण प्रचारात उतरू. मनसेचं स्वतःचं इंजिन (निवडणूक चिन्ह) आहेच. मी स्वइंजिनाबद्दल बोलतोय, म्हणजेच आपलं इंजिन. आपण मतदारांपर्यंत पोहोचायचं, मनसेचं चिन्ह पोहोचवायचं. लोकांमध्ये जाऊन समस्त महाराष्ट्राच्या हितासाठी, प्रगतीसाठी या (शिवडी) मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणू. त्यासाठी तुम्हा सर्वांना कंबर कसावी लागेल”, असं म्हणत आशिष शेलारांनी बाळा नांदगावकर यांना भाजपाचा पाठिंबा जाहीर केला होता.
शिवडीत टफ फाईट
शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेचे बाळा नांदगावकर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अजय चौधरी निवडणुकीच्या रिंगणात होते. गेल्या १० वर्षांपासून अजय चौधरी येथील आमदार आहेत. तर, बाळा नांदगावकर २००८ साली येथील आमदार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *