रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ट्रॅफिक जाम
हरिभाऊ लाखे
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका ते इंदिरानगर बोगदा या दरम्यान उड्डाणपुलाखालील रस्त्याचे काँक्रिटीकरण्याचे काम सुरू आहे. यामुळे मुंबई नाका सर्कल याठिकाणी दररोज दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. गुरुवारी दिवसभर याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनचालकांना नाहक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक वळविण्यासाठी व कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलेली असली तर कोंडीचा सर्वांना सामना करावा लागला.
द्वारका ते इंदिरानगर बोगदा या दरम्यान उड्डाण पुलाखालील सर्व्हिसरोडचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या काँक्रिटीकरणाचा सर्वाधिक ताण मुंबई नाका सर्कलवरील वाहतुकीवर पडला आहे. इंदिरानगर बोगद्याकडून मुंबई नाका सर्कलकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामुळे येणारी वाहतूक प्रकाश पेट्रोल पंपासमोर सर्व्हिसरोडकडे वळविण्यात आलेली आहे. यामुळे मुंबई नाका सर्कलवर सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची जाम कोंडी होते आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांच्यासह वाहतूक पोलिसांचे पथक सतत प्रयत्नशील आहे. मात्र, सायंकाळच्या वेळीच वाहने मोठ्या संख्येने असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. मुंबई नाका ते संदीप हॉटेलमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. तर भाभानगर रस्त्यावर आणि इंदिरानगर रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरही वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीत सापडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.
