– सहज आठवण करून द्यावी म्हटलं, बाकी काही नाही!
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून एक्झिट पोल बाजूला ठेवत बहुमत मिळवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, नक्की काय होणार याचे उत्तर मात्र शनिवारी सकाळी दहावाजेपर्यंतच मिळणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. समविचारी पक्षांना आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांना सोबत घेण्यासाठी दोन्हीकडून फोनाफोनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या निकालानंतर काय स्थिती असेल याबाबत चांगलीच उत्सुकता ताणली गेली आहे.
दरम्यान, निकालापूर्वीच एकमेकांना डिवचण्याचा देखील उद्योग सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचे जुने वक्तव्य समोर आणलं असून त्या वक्तव्यावरून त्यांना सहज आठवण करून द्यावी, असं म्हटलं आहे. बाकी काही नाही असे म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण ट्विट करून दिली आहे. त्यामुळे निकालापूर्वीच सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडीकडून रणनीती आखण्यास सुरुवात
दरम्यान, राज्यामध्ये एक्झिट पोलमध्ये बरीच संभ्रमावस्था असली तरी महायुतीला कौल दिला आहे. मात्र. यामध्ये शिंदे यांच्या अपेक्षेनुसार जागा येत नसल्याचे चित्र एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. दुसरीकडे अजित पवार गटालाही अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे. एक्झिट पोलमध्ये काही जरी असले तरी महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर तातडीने मुंबईला येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
