अनिल ठाणेकर
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा विजय हा, कोणत्याही एका पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही. या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन, निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय. आता, यापुढे ‘काळा-पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती” असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा ‘सातबारा’ मांडावा लागेल, अशा शब्दात राजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याहीपेक्षा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे, “नवसे पुत्र होती। तरी का करावा लागे पती।।” याच तालावर, “ईव्हीएम कारणे विजयी होती, तरी का प्रचार करावा लागे निवडणुकीप्रती”, असंच या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन करावं करावं लागेल. पूर्वी ‘मटका’ लावला जायचा, आता ‘ईव्हीएम’ लावला जातो, एवढाच काय तो फरक. मतपेटीतून परिवर्तन होईल असे दिसेनासं झालं; तर, अखेरीस जनता स्वतःच्या हाती सूत्र घेते आणि अराजकसदृश पार्श्वभूमी तयार होऊ लागते. सत्ताधाऱ्यांच्या ‘स्टार-प्रचारकां’च्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, प्रचारादरम्यान यांना लोकं गावागावातून हाकलून देतात. महागाई-बेरोजगारी आणि अर्धरोजगारीचा आगडोंब उसळलेला असतानाही, निव्वळ ‘दीड हजारी’ भिकेपोटी, महाराष्ट्रीय जनता, यांची एवढी भरभरुन मतांनी ‘ओटी’ भरेल, हे संभवत नाही…इतर भाषिकांना, बहुतांशी गुजराथी भाषिकांना श्रीमंत करणारा ‘शिवबा-संतांचा’ भोळसट महाराष्ट्र, कायमच गरीब होता; पण, गुजराथसारखा ‘नीतिशून्य’ आणि यूपी-बिहारसारखा ‘अवलक्षणी-भिकारडा’ कधीच नव्हता. फक्त, तो तसा यापुढे होऊ नये म्हणून, खूपच मेहनतीने नजिकच्या भविष्यात डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागेल, अशा शब्दात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी परखड भूमिका मांडली.
०००००