जनतेच्या न्यायालयात एकनाथ शिंदे, अजित पवार जिंकले

 

स्वाती : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे मविआची अक्षरशा वाट लागली. भाजपाप्रणित महायुतीने तब्बल २३० जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीला जेमतेम ४६ जागां जिंकता आल्या. भाजपाने १३२, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जांगावर बाजी मारली. तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेने २०, काँग्रेसने १६ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या. निकाल इतका अनपेक्षित होता की महाराष्ट्राच्या विधानसभेत आता विरोधी पक्षनेताच असणार नाही. विरोधी पक्षनेत्यासाठी किमान २९ आमदार पक्षाकडे असणे गरजेची होते. महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांना धक्कादायक पराभवाला सामेर जावे लागले. तर नाना पटोले फक्त २०८ मतांनी जिंकून आले.

दरम्यान या निवडणुकीत कोकण विभागातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जवळपास ठाकरे गटाला हद्दपार केलं आहे. ठाकरे गटाला कोकणात केवळ १ जागा राखता आली आहे. बाकी सर्व ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ठाकरे सेनेला एकही जागा जिंकता आलेली नीही.

मुंबईत मात्र ठाकरेंच्या सेनेने एकनाथ शिंदेच्या सेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या. मुंबईत ठाकरीं ९ तर शिंदेनी ६ जागा जिंकल्या. सर्वात धक्कादायक विजय माहिमध्ये ठाकरेंच्या महेश सावंत यांनी मिळविला. त्यांनी सदा सरवणकर आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा पराभव केला. वरळीतून ठाकरे  सेनेंच्या आदित्य ठाकरे तर बांद्र पुर्वमधून वरूण सरदेसाई यांनीही विजय मिळविला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून पराभव पत्करावा लागल्यामुळे यंदा मनसेची पाटी कोरीच राहीली.

ठाकरेंच्या शिवसेनेची भिस्त असणाऱ्या कोकणात धक्कादायक पराभव त्यांना पत्करावा लागला. कुडाळमधून निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला आहे तर रत्नागिरीत पुन्हा एकदा उदय सामंत यांनी त्यांची जागा राखली आहे. याठिकाणी भाजपातून ठाकरे गटात आलेले बाळा माने यांना सामंतांविरोधात उमेदवारी दिली होती. मात्र याठिकाणी बाळा माने यांचा पराभव झाला आहे. राजापूरमध्ये ठाकरे गटाचे राजन साळवी यांनाही पराभव सहन करावा लागला आहे. याठिकाणी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडून आले आहेत. सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर पुन्हा निवडून आले आहेत त्याठिकाणी ठाकरे गटाचे राजन तेली यांचा पराभव झाला आहे.

दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. याठिकाणी ठाकरे गटाच्या संजय कदम यांचा पराभव झाला आहे. गुहागर मतदारसंघात ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचा अवघ्या २५९२ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला कोकणात ही एकमेव जागा राखता आली आहे. याठिकाणी शिवसेनेच्या राजेश बेंडल यांचा पराभव झाला आहे. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांचा विजय झाला असून त्याठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत हे तिसऱ्या नंबरवर गेले आहेत. पालघर मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांचा ४० हजार मतांनी विजय झाला आहे. तिथे ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांचा पराभव झाला आहे.

अंबरनाथ मतदारसंघात डॉ. बालाजी किणीकर हे पुन्हा निवडून आले आहेत. त्याठिकाणी ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांचा ३५ हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. बोईसर मतदारसंघात शिवसेनेचे विलास तरे निवडून आले आहेत. तिथे ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वाळवी हे तिसऱ्या नंबरवर आहेत. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शांताराम मोरे हेही पुन्हा विजयी झाले आहेत. त्याठिकाणी ठाकरे गटाचे महादेव घटाळ यांचा ५७ हजार मतांनी पराभव झाला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजेश मोरे यानी दणदणीत विजय मिळविला. तिथे ठाकरे गटाचे सुभाष भोईर हे तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. कल्याण पश्चिम येथेही शिवसेनेचे विश्ननाथ भोईर पुन्हा विजयी झाले आहेत तिथे ठाकरे गटाचे सचिन बासरे यांचा पराभव झाला आहे. ठाण्यातील ओवळा माजिवडा येथे प्रताप सरनाईक आणि कोपरी पाचपाखाडी इथं एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत त्यामुळे इथेही ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. एकुणच ठाणे आणि कोकणात खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्यावर शिक्कामोर्तब केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *