बदलापूरः माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रूपाने स्वपक्षिय छुपे आव्हान आणि महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची नाराजीतून प्रचारातून माघार यामुळे कधी नव्हे ते आव्हानात्मक झालेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे ५२ हजार हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. २५ व्या फेरी अखेर किसन कथोरे यांना १ लाख ७५ हजार मते होती. अंतिम निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. मात्र विजयानंतर किसन कथोरे यांनी विरोधात काम करणाऱ्या सर्वांना इशारा दिला आहे. माझ्या विरोधी काम करणाऱ्यांना सर्व माजी लोकांना कधीही आजी होऊ देणार नाही, असे आव्हान कथोरे यांनी दिले आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आमदार किसन कथोरे यांच्यासाठी यंदाही निवडणुक काही अंशी कठीण मानली जात होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे सुभाष पवार रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीनंतर पराभूत झालेल्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा रोष, त्यांचा समर्थकांची उघड नाराजी, त्यातच महायुतीतीत शिवसेना पक्षाच्या बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रचारातून माघार, शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी उघडपणे केलेला विरोधी उमेदवाराचा प्रचार अशा सर्व विरोधकांवर मात करत किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळवला आहे. २५ व्या फेरीत किसन कथोरे यांना १ लाख ७५ हजार मते मिळवली होती. विजय झाल्यानंतर किसन कथोरे यांनी केलेल्या भाषणात सर्व पक्षांतर्गत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.
आता १५ वर्षांचा हिशेब चुकता करणार असे सांगत कथोरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्या नजरेतून कुणी चुकला असेल तर तस कुणी चुकणार नाही. माझ्या विरूद्ध सर्व माजी लोक एकत्र आले होते. पण तुम्हाला शब्द देतो की एकही माजी आता आजी होऊ देणार नाही, असे सांगत कथोरे यांनी कपिल पाटील आणि वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या गद्दारांना सोडणार नाही. यापुढे कोणत्याही गद्दाराला माझ्याकडे आणू नका. गद्दारांना माझ्याकडे आणणाऱ्यांनाही मी गद्दारच समजणार असेही कथोरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगत विरोधात काम करणाऱ्या पक्षांतर्गत आणि महायुतीच्या विरोधकांचा समेटीचा मार्ग बंद केला आहे. तसेच यापुढे आता बदलापुरातही साफ करून शांत करणार. झाकून नाही तर दाखवून करणार. ते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी हेडमास्टर आहे, अशीही टीका कथोरे यांनी यावेळी केली. त्यामुळे आता यापुढचे बदलापूर आणि मुरबाड मधील राजकारण काय वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.