कळवा : कळवा पूर्वेला असलेल्या शिवशक्तीनगर येथे एका विहिरीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. धर्मवीर मार्केटमागील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी कळवा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख पटवली. मृताचे नाव गुड्डू खान (वय ३५) असून तो याच परिसरातील आहे. कळवा पोलिसांनी त्याचा मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
