शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सार्त हाक
राज भंडारी
पनवेल : १९० उरण विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापचे प्रितम जे.एम.म्हात्रे यांना ८२३ मतांनी विजयी घोषित केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर भाजपचे आमदार महेश बालदी यांनी रिकाऊंटिंगची मागणी केल्यानंतर तब्बत ७ हजारांच्या आसपास मतांच्या आकडेवारीमध्ये फरक पडला आणि भाजपचे महेश बालदी यांना विजयी घोषित करण्यात आले. यामुळे उरण विधानसभा क्षेत्रातील उरण, पनवेल आणि खालापूर तालुक्यातील पदाधिकारी चांगलेच पेटून उठले आहेत. यावेळी उलवे परिसरातून शेतकरी कामगार पक्षाचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी दगाफटका केल्यामुळे प्रितम म्हात्रे यांना पराभव स्वीकारावा लागल्याचा ठपका ठेवत कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा तत्कालीन पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे सभापती नारायणशेठ घरत यांच्याकडे केली आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालताना वरिष्ठांशी बोलून येत्या दोन दिवसातच निर्णय घेणार असल्याचे आश्र्वासित केले.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल अविश्वसनीय असल्याचे दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी पोस्ट केले. यानंतर देखील सर्वसामान्य जनतेने भाजपच्या प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले, ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे आक्रमक स्वरूप ते ही संथ गतीने पसरविले गेले. यामध्ये तांत्रिक उपकरण म्हणजे ईव्हीएम मशीनचा वापर ज्यापद्धतीने केला गेला आहे, ते संपूर्ण राज्याने जरी पाहिलं असलं तरी जगभरात आता ईव्हीएम मशीन आपण का वापरत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे दिले जात आहे. हा विषय जरी राज्यातील असला तरी उरण विधानसभा क्षेत्रात मात्र जिंकलेला उमेदवार मोठ्या फरकाने कसा काय हरू शकतो, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. रिकाऊंटिंगमध्ये अधिकतर १०० ते २०० नाहीच म्हटले तरी ५०० मतांचा फरक पडू शकतो, मात्र उरण विधानसभा क्षेत्रात तब्बल ७ हजारांच्या आसपास फरक पडणे म्हणजे काहीतरी घडतंय आणि बिघडतंय असा प्रकार झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पेटून उठले आणि त्यांनी सरळ आपल्या नेत्यांनाच साद घालून पक्षातील घाण काढून टाकण्याची विनंती केली आहे.
२३ नोव्हेंबर रोजी निकाल लागला, लागलीच २४ नोव्हेंबर रोजी प्रितम म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पराभव स्विकारत पनवेल येथील त्यांच्या पळस्पे गोडावूनवर सर्व पदाधिकाऱ्यांची सभा लावली आणि सर्वांना तत्काळ कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. ज्या ज्या नागरिकांनी आपल्या चांगल्या कामाचे फळ आपल्याला का दिले नाही, त्यांना कोणत्या दडपणाखाली ठेवण्यात आले, या बाबींचा शोध घ्या, आणि त्यांना त्रास न देता त्यांच्या पाठीशी कायम उभे रहा, काही अमिषे मन भरकटवितात पण त्या लोभात आता गेलात यापुढे जावू नका, असे समजावून सांगा अशा सूचना प्रितम जे.एम.म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी अनेक दस्तुरखुद्द जे.एम.म्हात्रे, नारायणशेठ घरत, जितेंद्र म्हात्रे, रविंद्र घरत, रमाकांत म्हात्रे, रामशेठ भोईर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.