ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विभागाच्या वायुवेग पथकाने कारवाईत जप्त केलेल्या ४० वाहनांचा या लिलावात समावेश आहे. त्यामध्ये रिक्षा, चारचाकी, मिनी बसचा समावेश आहे.
ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहने जप्त केलेली आहेत. ही वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे, राज्य परिवहन भिवंडी आगार, भिवंडी, राज्य परिवहन मिरा-भाईंदर आगार, मुंब्रा वाहतूक पोलिस ठाणे, राज्य परिवहन शहापूर आगार येथे असलेल्या जागेत अटकाव केलेल्या स्थितीत ठेवलेली आहेत. एकूण ४० वाहनांचा जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी वापरून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात २९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने लिलाव करण्यात येणार होता. काही तांत्रिक कारणास्तव हा लिलाव ३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. इच्छुकांनी या लिलावात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. लिलावाच्या अटी व शर्ती; तसेच अनामत रक्कम याबाबतची माहिती लिलावाच्या अगोदर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
