मुंबई : ट्रेडबाइनरी या आघाडीच्या टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग कंपनीने रोटरी क्लब मुंबईशी हातमिळवणी करून ठाण्यातील पुराणिक कॅपिटल परिसरात एका रक्तदान मोहिमेचे आयोजन केले होते. सामुदायिक सेवा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेला चालना देत असताना इस्पितळांमधील रक्ताची आत्यंतिक निकड पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम करण्याचे योजण्यात आले होते.
या मोहिमेला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि ४३ लोकांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले. या शिबिरात एकूण ४३ युनिट रक्त संकलित करण्यात आले. हे संकलित झालेले रक्त विविध इस्पितळांमध्ये वितरित करण्यात येईल, ज्याचा उपयोग गरजू रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी होऊ शकतो. रक्तदान करण्यास उत्सुक लोकांनी कै. वामनराव ओक ब्लड सेंटर येथे संपर्क साधावा.
ट्रेडबाइनरीचे संस्थापक आणि संचालक दर्शील शाह म्हणाले, “रक्तदान ही केवळ एक धर्मादाय कृती नाही तर गरजू व्यक्तीविषयीची व्यक्त केलेली आस्था आहे आणि त्याला जगण्याची नवी आशा देण्याची मनुष्याची क्षमता अभिव्यक्त करणारी ही कृती आहे. दान केलेले रक्त म्हणजे जीवनाशी झुंजणाऱ्यासाठी एक नवजीवन असते, त्याच्या पाठीशी कुणी तरी आहे हा दिलासा असतो. या उदात्त ध्येयाने एकत्र येऊन केलेल्या या कृतीमधून आपण जीवन दान तर करतोच, पण त्याच बरोबर आशा आणि उपचार जिथे शक्य आहेत असे विश्व उभे करण्याच्या सत्कारणात आपली संघटित ताकद, करुणा आणि जबाबदारी यांचा विनियोग आपण करतो.”
रोटरी क्लब ठाणे क्रीकचे अध्यक्ष श्री. युवराज शिधये म्हणाले, “कुशल वैद्यकीय व्यावसायिकांच्या एका टीमने अत्यंत काळजीपूर्वक या रक्तदान शिबिराचे आयोजन केले. प्रत्येक रक्तदात्यासाठी रक्तदानाची प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित असेल याची दक्षता घेण्यात आली. अधिकाधिक लोकांना नवजीवन देण्याच्या या उदात्त कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल अशी आम्हाला आशा आहे.”
या शिबिराच्या यशस्वी आयोजनाने प्रोत्साहित होऊन वारंवार अशाच प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा ट्रेडबाइनरी आणि रोटरी क्लब मुंबई यांचा मानस आहे. नियमितपणे रक्तदान करण्याचे महत्त्व लोकांना पटवून देऊन सक्रिय रक्तदात्यांचा समूह अधिक विस्तारित करण्यावर भावी शिबिरांचा भर असेल.”
