कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना साकडे

पालघर  : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून शहापूर विधानसभेची वाट्याला आलेली जागा दौलत दरोडा यांनी जिंकली असून त्यांनी तब्बल पाचव्यांदा शहापूर विधानसभेतून निवडून जाण्याचा विक्रमही केला आहे. त्यामुळे पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेले अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून निष्कलंक कामगिरी केलेल्या दौलत दरोडा यांना नव्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्याची मागणी आता करण्यात येत आहे. याबाबत कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.

दौलत दरोडा हे अनुभवी, निष्कलंक व सर्वसामान्य जनतेला भावणारे लोकप्रतिनिधी असून त्यांनी 1995 पासून आत्तापर्यंत सात वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे त्यात त्यांनी पाच वेळा विजय संपादन केला आहे. सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील असणारे आमदार दरोडा हे उच्चशिक्षित असून ठाणे व पालघर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील समस्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. आमदार दरोडा यांना मंत्रीपदाची संधी दिल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील संघटन वाढीसाठी होणार असून त्यांच्या माध्यमातून दुर्गम भागातील जनतेच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आमदार दरोडा यांना मंत्रिपदाची संधी देऊन ठाणे व पालघर जिल्ह्यासह ग्रामीण दुर्लक्षित व दुर्गम भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी सर्व समाजातील घटकांकडून करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन आमदार दरोडा यांना मंत्रिपद द्यावे यासाठी साकडे घातले आहे.

दरम्यान आमदार दौलत दरोडा यांना मंत्रीपदाची शपथ दिल्यास आगामी काळात होणाऱ्या ठाणे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला व महायुतीला चांगले बळ मिळणार असून त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच वेळा निवडून आलेले ज्येष्ठ व अनुभवी आमदार दौलत दरोडा यांच्याबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *