महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर देशासह जगाचे संपूर्ण लक्ष होते.कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्त्व होते.त्यामुळे महायुतीसह भाजपचे संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावर होते.त्याच पध्दतीने त्यांनी व्युहरचना आखली. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आपसी तालमेलचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला.कारण निवडणुकीच्या आधीच उध्दव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाचा दावा होत होता, त्याचप्रमाणे शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा होत होती तर दुसरीकडे कॉग्रेसकडुन बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व नाना पटोले यांच्या नावाची चर्चा अशाप्रकारे तीन्ही पक्ष मुख्यमंत्री पदाची दावेदारी करतांना दिसत होते.त्याचप्रमाणे जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच दिसून आली व लहान भाऊ -मोठा भाऊ अशी चर्चा रंगु लागली.कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना लोकसभेच्या विजयाचे घमंड आले होते.आपण जर महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील विजयाचा विचार केला तर त्यांच्या खासदारांच्या तुलनेत प्रत्येक खासदारांच्या मतदार क्षेत्रातुन कमीत कमी ४ आमदार तरी निवडून यायला पाहिजे होते.परंतु प्रत्येक खासदारांच्या तुलनेचा विचार केला तर एका खासदारांच्या मतदार क्षेत्रातुन फक्त १.५० खासदार निवडून आल्याचे दिसून येते.म्हणजेच कॉग्रेसचे – १६, उध्दव ठाकरे गटाचे-२० व शरद पवार गटाचे १० अशाप्रकारे महाविकास आघाडीचे ४६ आमदार निवडून आलेत.एका खासदार क्षेत्रात कमीत कमी ६ आमदार असतात त्या पध्दतीने लोकसभा क्षेत्रानुसार महाविकास आघाडी अर्धेही आमदार निवडून येवू शकले नाही ही महाविकास आघाडीच्या बाबतीत शोकांतिका म्हणावी लागेल.महाविकास आघाडीच्या काही लोकसभा क्षेत्रात तर संपूर्णपणे सुपडा साफ झाल्याचे सुध्दा दिसून आले. यावरून असे लक्षात येते की महाविकास आघाडीला वाटत होते की आपल्या जवळ २९ खासदार आहेत म्हणजेच जवळपास आपले १४५ आमदार अवश्य निवडून येतील असे गृहीत धरून निश्चिंत होते आणि हाच अहंकार आज त्यांच्या मानगुटीवर बसला व पराजयाचे कारण बनले आहे आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की विरोधी पक्षनेते पदासाठी पाहिजे असलेल्या २९ जागा सुध्दा आघाडीतील कोणताही पक्ष प्राप्त करू शकला नाही हे मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल.आघाडीचा अहंकाराचा व त्यांच्यातील आपसी तालमेलचा अभाव याचाच सटीक आणि अचुक फायदा महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांनी घेतला आणि त्याच पद्धतीने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी कामाला सुरुवात केली.त्यामुळेच आज महायुतीला भरघोस यश प्राप्त झाले व महाविकास आघाडीला ४६ जागांवर रोखण्यात यश प्राप्त झाले.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *