अकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. बंडखोरीमुळे झालेल्या मतविभाजनातून भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. निकाल जाहीर होताच जल्लोषात तरुणांनी उन्माद करून चक्क बंदोबस्तातील पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी शहरातील टिळक मार्गावर घडला. स्वत:ला वाचवण्यासाठी पोलिसाला एका घराचा आधार घ्यावा लागला. या घटनेची एक चित्रफित प्रचंड व्हायरल झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तब्बल २९ वर्षे अधिराज्य असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात यावेळेस भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी भाजपचे विजय अग्रवाल यांचा अवघ्या एक हजार २८३ मतांनी पराभव केला. वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना २० हजार ५१७ मते मिळाली. या मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसला. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा सलग सहा वेळा येथून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर वर्षभरापासून ही जागा रिक्त होती. या मतदारसंघात भाजपला धक्का देत काँग्रेसने खाते उघडले आहे. काँग्रेसच्या या विजयात भाजपच्या बंडखोरांमुळे झालेले मतविभाजन निर्णायक ठरले आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या साजिद खान पठाण यांनी आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत ती कायम राखून काँग्रेसने तब्बल ३० वर्षांनंतर अकोला पश्चिम मतदारसंघात यश मिळवले.
काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झाल्याचे घोषित करताच काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. अकोला शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजयी जल्लोषामध्ये काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले. त्यावर तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली. याची एक चित्रफित समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. त्यामध्ये तरुण पोलिसाच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसून येते. पोलिसांवर तरुणांनी हात देखील उगारला. एकच पोलीस असल्याचे पाहून तरुणांच्या जमावाने त्यांना घेरले होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणांचा प्रतिकार केला. जल्लोषात सहभागी असलेल्या काही जणांनी मध्यस्थी करून संतप्त तरुणांना रोखण्याचे प्रयत्न केले. अखेर पोलीस कर्मचाऱ्याला जमावापासून वाचण्यासाठी परिसरातील एका घराचा आधार घ्यावा लागला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकाल जाहीर होताच काही तासामध्ये शहरातील वातावरण बिघडल्याने नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *