नागपुर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. महायुतीचा दणदणीत विजय झाला असून, महाविकास आघाडी चांगलीच चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही अनेक ठिकाणचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे.
साकोली मतदारसंघातून नाना पटोले उमेदवार होते. नाना पटोले यांना अवघ्या २०८ मतांनी विजय झाला. भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव केला. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून वरिष्ठ पातळीवर या निकालाचे विश्लेषण केले जाईल. परंतु नव्या सरकारने जनतेल्या दिलेली लाडकी बहीण योजना सुरु ठेवावी, शेतकरी कर्जमाफी, शेतीला २४ तास वीज पुरवठा, सोयाबीनला ६ हजार, कापसाला ९ हजार तर धानाला १ हजार रुपये बोनस, एमएसपीपेक्षा कमी भाव मिळाला तर फरकाची रक्कम देणे, तरुणांना नोकऱ्या, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या आश्वासवाची पूर्तता करावी तसेच महाराष्ट्राची संपत्ती विकण्याचे थांबवून राज्याची तिजोरी चांगली करावी, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.
या पराभवावर चिंतन करु व जनतेच्या प्रश्नासाठी काम करत राहू
निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या सभांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला उलट भाजपा युतीचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेलाही जनतेचा प्रतिसाद मिळत नव्हता अशा परिस्थितीत आलेला निकाल अनपेक्षित वाटतो. या पराभवावर चिंतन करु व जनतेच्या प्रश्नासाठी काम करत राहू, असे नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. एक्झिट पोल मध्येही भाजपा युती व महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह आहे. जनतेचाही या निकालावर विश्वास बसलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अत्यंत कमी मताने विजया झाला तर आठ वेळा विजयी झालेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी आपण घेत आहोत असे सांगून जनतेच्या प्रश्नासाठी व लोकशाहीच्या बचावासाठी काँग्रेस पक्ष यापुढेही अधिक जोमाने काम करत राहील, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *