मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विक्रमी बहुमत मिळूनही महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. महायुतीत भाजपा १३२ आमदारांसह सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. २०१४ सालातील मोदी लाटेपेक्षाही मोठे यश भाजपाला मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडणून आले आहेत. पण मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल असे सुत्रांनी सांगितले. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
राज्यातील तब्बल २८८ मतदारसंघांपैकी २३९ जागांवर महायुती विजयी ठरली आहे. यानंतरही २४ तास उलटल्यानंतरही महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस कायम आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत थेट सांगितलं आहे की या पदाचा निर्णय हे कुठल्याही निकषांवर नाही. हे पद कुणाला द्यायचं हे तीन पक्षांचे नेते मिळून ठरवतील. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असे मिळून निर्णय होईल. आमच्यात कुठलाही वाद विवाद नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच जो निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला राजकारणात युती आणि आघाड्यांमध्ये राबवला जातो. मात्र असा कुठलाही फॉर्म्युला यावेळी ठरलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार की नाही? हा प्रश्न अद्याप कायम आहे, कारण भाजपा किंवा महायुतीने अद्यापही कुणाचं नाव जाहीर केलं भाजपाचे १३२ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीत संख्याबळाचा विचार केला तर भाजपाचा आधीचा दावा असू शकतो.
मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहाण यांनीही एकहातीसत्ता भाजपासाठी खेचून आणली होती. पण सगळ्यांना चक्रावून सोडत मध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ फारसे कुणाला परिचित नसलेल्या डॉ. मोहन यादव यांच्या गळ्यात टाकण्या आली होती. गेल्यावेळी शिवसेनेतील बंडांनंतर महाराष्ट्रात भाजपाचे १०५ आमदार असताना अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता निर्णय घेतील याचा कोणताच थांगपत्ता लागू शकणार नाही अशी प्रतिक्रीया भाजपातील एका ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.
