खोपोली : साजगाव-ताकई येथे विठ्ठल मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीपासून बोंबल्या विठोबाची यात्रा सुरू आहे. सतत १५ दिवस चालणारी कोकण विभागातील ही एकमेव मोठी यात्रा आहे. शनिवार, रविवारी यात्रेत मोठी गर्दी होत असल्याने लाखोंची उलाढाल होत आहे.
सौंदर्य प्रसादनांची दुकाने, खाऊ गल्ली, मिठाई व सुकी मासळी खरेदीसाठी सध्या बाजारात गर्दी होत असल्याने व्यापारीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. यात्रा परिसरात येणाऱ्या भाविकांमुळे खोपोली-पेण मार्गावर संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या साजगाव यात्रेचा दुसरा आठवडा सुरू आहे. विधानसभा मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारपासून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरूंची गर्दी होत आहे. शनिवारी तर यात्रेत पाय ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती होती. रविवारीही गर्दी कायम राहिल्याने स्थानिक पोलिस प्रशासन, वाहतूक शाखेकडून खास नियोजन करण्यात आले होते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच गर्दी झाली होती. दोन दिवसांत मालाची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह होता. यात्रेतील उंच उंच पाळणे, रोमहर्षक खेळ, खाऊ गल्ली, खेळणी बाजार, मिठाई व सुक्या मासळीचा बाजार सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
मासळी खरेदीसाठी गर्दी
साजगावच्या यात्रेत सुकी मासळी खवय्यांसाठी पर्वणी ठरते. खोपोली शहर, पनवेल, पाली-सुधागड, पेण, खालापूर-कर्जत तालुक्यातील व घाटमाथ्यावरील हजारो कुटुंब व नागरिक या यात्रेत खास सुकी मासळी खरेदी करण्यासाठी येतात. यात्रेच्या शेवटच्या दिवसांत सुकी मासळी बाजारात मोठी उलाढाल होते. दरम्यान, गर्दीच्या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खोपोली पोलिस, यात्रा समिती, खोपोली नगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.