सोलापूर : एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु गेल्या २५-३० वर्षांत हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती. आता ही एकमेव जागा देखील गमावल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे. सुमारे चार दशके सत्ताकारणात राहिलेले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या उत्तराधिकारी असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या ‘उद्योगा’मुळे पक्षावर हे गंडांतर आल्याचे आता राजकीय वर्तुळात उघडपणे बोलले जात आहे.
यापूर्वी २०१४ आणि २०१९ अशा सलग दोनवेळा सोलापूर लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचे धक्के बसले होते. योगायोगाने त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर गेल्या लोकसभेत त्या निवडूनही आल्या. परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अवघ्या ७९६ इतके तुटपुंजे मताधिक्य मिळाले होते. भाजपने हे मताधिक्य रोखून धरले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी करताना शिंदे कुटुंबीयांनी पक्षाची ताकद न वाढविता उलट गुंता निर्माण केला. विशेषतः खासदार प्रणिती शिंदे यांची अपरिपक्वता दिसून आली.
एकीकडे भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग आणि दुसरीकडे एमआयएम पक्षाची घुसखोरी, यातच स्वपक्षातील नाराज मंडळींनी सोडलेली साथ काँग्रेससाठी धोकादायक ठरली. हा धोका दूर करण्याच्या दृष्टीने शिंदे कुटुंबीयांनी गांभीर्याने पावले उचलली नाहीत. भाजपकडून देवेंद्र कोठे हे मोठ्या मतफरकाने निवडून येणे ही बाब सुद्धा शिंदे कुटुंबीयांच्या दृष्टीने जखमेवर मीठ चोळणारी असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे सोलापूर दक्षिण मतदारसंघातही महाविकास आघाडीमध्ये लाथाळ्या वाढल्या. त्याची परिणती काँग्रेसचे अस्तित्वच हिरावून घेणारी ठरल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. सोलापूर लोकसभा क्षेत्रात पूर्वी सहापैकी भाजपचे चार आमदार होते. आता ते पाच झाले आहेत. एकट्या मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने थोडी इभ्रत राखली आहे.
000