कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती आणि डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हाॅल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता. २६) सकाळी ११ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.
डोबिवली पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्वेतील फ, ग आणि पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण वाहिन्यांवर गळती सुरू आहे. हे गळतीचे पाणी रस्त्यावरून वाहते. पालिकेकडून सकाळ, दुपार, संध्याकाळी पाणी पुरवठा सुरू झाला की पाणी वितरण वाहिन्यांमधून गळती असलेल्या भागातून अधिकचे पाणी वाहून जाते. काही ठिकाणी व्हाॅल्व्हमध्ये बिघाड असल्याने त्या ठिकाणाहून पाण्याचे कारंजे सतत उडत असतात. यामुळे शेकडो लीटर पाणी वाया जाते. रस्त्यांवरून पाणी वाहून जात असल्याने अनेक भागात नागरिकांना रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे चालणे अवघड होऊन जाते. दुचाकी या भागात घसरून पडतात. पाणी गळती विषयी नागरिकांच्या पालिकेतील तक्रारी वाढल्या होत्या.
गेल्या दोन महिन्यापासून विधानसभा निवडणूक कामात कल्याण डोंबिवली पालिकेचा कर्मचारी वर्ग व्यस्त होता. त्यामुळे ही पाणी गळतीची कामे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना तातडीने हाती घेणे शक्य होत नव्हते. आता निवडणुका संपल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ही दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *