प्रल्हाद पै यांचे प्रतिपादन
कर्जतच्या जीवनविद्या ज्ञानपीठात आनंद सोहोळा उत्साहात
मुंबई, : ‘माणूस आनंदी असला की शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात आणि या हॅपी हॉर्मोन्समुळे माणूस आनंदी होतो. मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी अध्यात्माची जोड महत्त्वाची असते,’ असे प्रतिपादन जीवनविद्या मिशन चे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै यांनी केले.
थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कर्जतमधील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हजारो शिष्यमंडळी सहभागी होत आहेत. दररोज दोन पर्वात विविध उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमांर्तगत करण्यात येणार आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळच्या सेशनमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, संगीत जीवनविद्या, दिव्य अनुभूती देणारी मानसपूजा, मानसिक शांतता देणारी शरीरसाधना, कृतज्ञतापूर्वक करण्यात आलेले गुरुपूजन अशा विविध उपक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनविद्या मिशन संस्थेसाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या काही खास लोकांना ‘जीवनविद्या गौरव’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. जेष्ठ नामधारक दिलीप कुलकर्णी आणि ज्येष्ठ प्रबोधक विश्वनाथ कामत यांना या वर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
दुसऱ्या सेशनमध्ये यंदा जीवनविद्या मिशनतर्फे एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पैंसोबत अनेक मान्यवर या सेशनमध्ये चर्चात्मक संवाद साधणार आहेत. पहिल्या दिवशी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात मुख्य हार्ट सर्जन असलेले डॉ. विद्याधर लाड आणि एन. एम मेडिकलच्या ब्रेस्ट रेडिऑलॉजिस्ट डॉ. शिल्पा लाड यांनी संवाद साधला. वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या या डॉक्टर दांपत्याने प्रल्हाद पै यांच्यासोबत ‘मानसिक आरोग्य कसे राखावे’ याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांनी या क्षेत्रात डॉक्टरांना पेलावी लागणारी अनेक आव्हाने तसेच अनेक जटील समस्या मांडल्या. या मुलाखती दरम्यान प्रल्हाद पैंनी सर्व जनसमुदायासमोर त्या प्रश्नांची उत्तरे देताना जणू सर्वांसाठी सुखी आणि सुदृढ आरोग्याचे गुपितच खुले केले.
प्रल्हाद पैंच्या मते सर्व शारीरिक आजार हे मानसिक आजारातून निर्माण होतात. त्याचप्रमाणे सर्व मानसिक आजार हे भवरोग म्हणजेच हवेपणातून निर्माण होतात. माणसांमध्ये असलेले हे काम क्रोधादि विकार जेंव्हा विकोपाला जातात तेंव्हा सर्व आजार निर्माण होतात. सहाजिकच तुम्ही जरी योग्य आहार घेत असला, चांगला व्यायाम करीत असला आणि पुरेशी झोप जरी घेतली असली तरी जर तुमच्या मनातील विचार चुकीचे, नकारात्मक असतील तर त्यातून हे विकार निर्माण होवू शकतात. यासाठीच सकारात्मक विचार करणे, विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण माणूस जेंव्हा पॉझिटिव्ह विचार करतो तेंव्हा त्याच्या शरीरात पॉझिटिव्ह केमिकल्स निर्माण होतात. माणूस आनंदी असला की त्याच्या शरीरात हॅपी हॉर्मोन्स निर्माण होतात आणि हॅपी हॉर्मोन्समुळे माणूस आनंदी होतो असे त्यांनी सांगितले. म्ह्णूनच आजार शारीरिक असो वा मानसिक तो बरा करण्यासाठी औषधोपचारांसोबत चांगले विचार प्रतिबंधनात्मक तसेच उपचारात्मक ठरतात. यासाठी जीवनविद्या मिशनची विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना सर्वांनी सतत म्हणावी तसेच जीवनविद्या मिशनची शरीर साधना अवश्य करावी असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे आजवर ज्यांना या प्रार्थनेचा फायदा झाला आहे अशा अनेक लोकांची उदाहरणे सांगून त्यांनी या विचारांचे महत्त्व देखील पटवून दिले.
0000