लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा

 

ठाणे : एकनाथ शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढलेला उमेदवार आता निकालानंतर शिंदेंच्याच पक्षात प्रवेश करणार आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांनी ही  घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. मनोज शिंदे हे काँगेसमधून बंडखोरी करीत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उभे राहिले होते. यामुळे शिंदे यांची काँग्रेसने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुफडासाफ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उबाठा पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा झाली. तर काँगेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता.
उबाठा पक्षाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीत उडी मारल्याने शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली. लवकरच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *