व्हीव्हीपॅट मोजणीसाठी अर्ज करा ० पवार, ठाकरेंचे पराभूत उमेदवारांना आदेश
मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अभुतपुर्व पराभवानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने देशातील इंडिया आघाडीसह ईव्हिएमविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. देशपातळीवर ईव्हिएमविरोधात जनआंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी कायदेतज्ज्ञांची फळीही उभारण्यात येणार आहे. दरम्यान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील विधानसभेत पराभूत झालेल्या आपापल्या उमदेवारांना व्हीव्हीपॅट मोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे आदेश दिले आहेत.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम मशीनविरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केलं आहे. यावेळी
विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात पाढा वाचला. यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसहीत इंडिया आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीन घोटाळाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. जिथे-जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला आहे त्या ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना केले आहेत. किमान पाच टक्के तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी, अशी सूचना देखील उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवारांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतही उमेदवारांनी केलेल्या ईव्हीएमविरोधातील तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतला आहे. राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्यात आली आहे. केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना शरद पवारांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच २८ नोव्हेंबरपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी, अशी ही सूचना देण्यात आली आहे. राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरूवात करण्यात आली, त्याचप्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार, असं शरद पवार म्हणाले. आता मागे हटायचं नाही लढायचं, असा संदेश देखील शरद पवारांनी पराभूत उमेदवारांना दिला आहे.
00000000000
