मुदत संपल्यामुळे राज्यपालांना सोपवला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ० मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम ० दिल्लीत वाटाघाटींना वेग

स्वाती घोसाळकर

मुंबई: विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी राजीनामा सुपूर्द केला. तर नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. दरम्यान महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही आज तिसऱ्या दिवशीही मुख्यंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त होते.

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भाजपाने १३२, शिंदेंच्या शिवसेनेने ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ अशा एकुण २३६ जागांवर विजय मिळविला आहे. त्याशिवाय पाच अपक्षांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाठींबा दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष २०२५ मध्ये आहे. अशावेळी मुख्यमंत्रिपद फडणवीस यांच्याकडेच असावे अशी संघाची तीव्र इच्छा असल्याचे सुत्रांने सांगितले.

दरम्यान पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईसह सर्व महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, तोवर शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी ठेवले जाईल आणि पुढची चार वर्षे फडणवीस मुख्यमंत्री राहतील, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. पण फडणवीस यांना आताच मुख्यमंत्री केले तरच महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरी उत्तम राहील आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही शिंदे या यशासाठी योगदान देऊ शकतात, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद वा महत्त्वाचे केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते. अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत महायुतीचा

मुख्यमंत्री ठरेल – दानवे

मुंबई : महायुतीच्या मुख्यमंत्री पदासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत नाव निश्चित होईल आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये शपथविधी होईल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. रावसाहेब दानवे हे दिल्लीत होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची नाही. यावर तिनही पक्षांचे नेते चर्चा करतील, असे दानवेंनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नसल्याचेही स्पष्टीकरण रावसाहेब दानवेंनी दिलं आहे.

“मुख्यमंत्रीपद आणि शपथविधीचे घोडे कुठेही अडलेले नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा गटनेता निवडला गेला, लवकरच भाजपचा गटनेता निवडला जाईल, यानंतर तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून पक्षश्रेष्ठींकडे आमदारांचे म्हणणे मांडतील, ते देतील तो निर्णय मान्य असेल,” असं  रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *