कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
अलिगड, दि.२६ नोव्हेंबर – अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्यादेवी होळकर क्रीडांगणावर सुरू असलेल्या ४३व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत मंगळवारी दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या मुले व मुली संघाने विजयी सलामी दिली.
मुलांच्या गटात झारखंड, तेलंगणा, हरियाणा गुजरात संघाने विजयाची नोंद केली. केरळ संघाला मध्य भारतकडून पराभवाचा धक्का बसला. मुलींच्या गटात ओरिसा, पश्चिम बंगाल तामिळनाडू, कर्नाटक आणि झारखंड संघाने गटातील आपले सामने जिंकले.
मुलींच्या गटात कोल्हापूर संघाने गटातील दुसरा सामना खेळताना गोवा संघाचा ६०-८ असा एक डाव ५२ गुणांनी धुव्वा उडवला. कोल्हापूर संघाकडून श्रावणी लक्ष्मण ३.१०, संगीता फाळे ३.१०, तनिष्का तुरंबेकर नाबाद २.४०, अमृता नाईक नाबाद ३.०० संरक्षण केले तर अमृता पाटीलने आक्रमनामध्ये दहा गुणांची कमाई केली.
मुलांच्या गटात कोल्हापूरने मणिपूरवर ३६-१२ असा विजय संपादन केला. कोल्हापूर संघाकडून शुभम मकोटे, विकास देशमाने, अंकुश देशमाने, राजू पाटील, उदय पाडाळकर, प्रेमनाथचंद्र पुढे यांनी संरक्षण करून विजय संपादन केला. केरळ संघाला मध्य भारतने पराभवाचा धक्का देताना ४१-३७ असा विजय संपादन केला. मध्य भारत संघाकडून ऋषिकेश हिरवे याने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत विजयात मोलाचा वाटा उचलला. केरळ संघाकडून अर्जुन दासणे चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.