ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुटुंब नियोजनात
ठाणे : कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा (Vasectomy Forthnight २०२४) राबविण्यात येत आहे.
या मोहिम कालावधीत लाभार्थींनी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत असणारे गैरसमज दूर करून कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
या मोहिमेचे घोषवाक्य, “आजच सुरुवात करुया, पती-पत्नी मिळून कुटुंब नियोजनावर बोलुया” असे आहे. ही मोहिम जिल्ह्यात २ टप्यात राबविण्यात येत आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत माहिती घेण्याकरीता आपल्या कार्यक्षेत्रातील नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
मोहिमेचा पहिला टप्पा- संपर्क आठवडा (कालावधी २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४)
पहिल्या टप्यामध्ये आशा व एएनएम, पुरुष नसबंदी पंधवड्याचा प्रचार व प्रसार कार्यक्षेत्रात करून कुटुंब नियोजनास पात्र जोडप्यांना भेटी देऊन पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याच्याशी निगडीत गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशन करुन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा स्वीकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
मोहिमेचा दुसरा टप्पा- सेवा आठवडा (कालावधी २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर)*
दुसऱ्या टप्यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस ईच्छुक लाभार्थाची पूर्व नोंदणी करून ठराविक दिवशी मार्गदर्शक सुचनांनुसार शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
00000