कोकणात महायुतीला यश मिळण्यात महत्त्वाची भूमिका
पटवर्धन यांनी फडणवीस यांना दिल्या मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा
योगेश चांदेकर
पालघरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणात महायुतीचे समन्वयक म्हणून अनिकेत पटवर्धन यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि महायुतीला कोकणात विजयी करण्याच्या त्यांच्या या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेऊन त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. दरम्यान, पटवर्धन यांनी फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेऊन महायुतीच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुख्यमंत्री होण्यासाठीही सदिच्छा दिल्या.
महायुतीचे समन्वयक म्हणून अनिकेत यांच्यावर चव्हाण यांनी मोठी जबाबदारी सोपवली होती. पटवर्धन हे चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक आहेत. राज्यातील महायुतीच्या यशाचे शिल्पकार जसे फडणवीस आहेत तसेच कोकणातील महायुतीच्या यशामागे पटवर्धन यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत.
महायुती एकसंघ ठेवण्याची जबाबदारी
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी पटवर्धन यांच्याकडे होती. रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि चिपळूण या चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी करण्यामागे समन्वयक म्हणून पटवर्धन यांचा महत्त्वाचा वाटा होता, हे विसरून चालणार नाही. महायुतीत कोणत्याही प्रकारचा बेबनाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन पटवर्धन यांनी काम केले. युती अभेद्य ठेवणे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवणे आणि चव्हाण यांच्याशी त्यांचा वारंवार समन्वय घडवून आणणे, त्याचबरोबर कोकणातील सर्व जिल्ह्यात महायुतीला मतदान होण्याच्या दृष्टीने संपूर्ण व्यूहरचना पटवर्धन यांनी केली. त्यासाठी वारंवार त्यांनी फडणवीस आणि चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतले.
संयम आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम
अतिशय संयमी पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली. कुठेही वाद निर्माण होणार नाही किंवा गैरसमज निर्माण होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. त्याचबरोबर महायुतीतील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या काही अडीअडचणी असतील, तर त्यावर चव्हाण यांच्याशी संपर्क ठेवून तोडगा काढण्याचे काम त्यांनी जागच्या जागी केले. त्याचबरोबर महायुतीला मदत करू शकणाऱ्या आणि पडद्याआड राहू इच्छिणाऱ्यांशी त्यांनी संपर्क ठेवला. पालकमंत्री चव्हाण यांच्यांशी चर्चा घडवून आणली. त्यातून महायुतीला अनेक दृश्य अदृश्य हातांची मदत झाली. त्याचा परिणाम कोकणामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळण्यात झाला.
श्रेयवाद टाळून समन्वय
चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप कोकणात काम करीत असून त्यात पटवर्धन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांची ही भूमिका अशीच राहणार आहे. अनेक नेते केलेल्या व न केलेल्या कामाचे श्रेय घेत असतात. फोटो काढून मिरवत असतात; परंतु याला अनिकेत पटवर्धन हे अपवाद आहेत. त्यांनी राज्याच्या तसेच केंद्राच्या नेतृत्वाशी आपले संबंध कायम ठेवले आहेत; किंबहुना ते वृद्धिंगत केले आहेत. नेत्यांशी चांगल्या समन्वयातून नेत्यांचा त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
पक्षहितापुढे सारे गौण
राज्यातील अनेक नेत्यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध ठेवून त्यातून भाजपचे अधिकाधिक भले कसे होईल यासाठी अनिकेत प्रयत्न करत असतात फडणवीस आणि चव्हाण यांनी अनिकेत यांच्यासारखा एक चांगला पडद्याआड राहून काम करणारा संयमी कार्यकर्ता पक्षाला दिला. शांतपणे आणि संयमीपणे काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून अनिकेत यांच्याकडे पाहिले जात असून त्यांचा पक्षाला यापुढे चांगला उपयोग होईल, असा विश्वास महायुतीच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. फडणवीस आणि चव्हाण यांच्यावर अनिकेत यांची अढळ निष्ठा असून कोणत्याही लाभासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग न करता पक्षहीत एक हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करण्याच्या पटवर्धन यांचे फडणवीस आणि चव्हाण यांनाही कौतुक आहे. पटवर्धन पडद्यामागून जरी काम करीत असले, तरी आपण पक्ष नेत्यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या व्यूहनीतीनुसार काम करतो, याची त्यांना जाणीव आहे. आपण काय काय काम केले आणि त्याचा काय काय परिणाम झाला याचा अहवाल ते सातत्याने आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांना देत असतात. त्यातून त्यांची कामावरची निष्ठा दिसते.
0000