ठाणे : बालविवाह ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविवाहविरोधी जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
27 नोव्हेंबर हा बालविवाह प्रतिबंध दिन म्हणून विविध उपक्रमाद्वारे या प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविले जाते. जिल्ह्यातील हे अभियान ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सेवा संस्था/महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (डॉ. कैलास सत्यर्थी फाऊंडेशन संलग्न भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. बालविवाह या अनिष्ट प्रथेविरुध्द जिल्ह्यात 27 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संस्थेचे अशोक पवार, देवय्या आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बालविवाह ही अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी जाणीवजागृती महत्त्वाची असून जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. तसेच समाजातील सर्व अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्याची गरज अधोरेखित केली. सुर्यवंशी यांनीही बालविवाह प्रथेमुळे समाजात होत असल्याच्या दुष्परिणाम सांगून ही प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी समाजात विशेषतः ग्रामीण भागात प्रचार प्रसिद्धी आवश्यक असल्याचे नमूद केले.
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी यासह ग्रामीण भागात चित्ररथाद्वारे बालविवाह प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी यावेळी सांगितले.