स्मारकाला संविधान दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई

 

नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ज्ञान हिच शक्ती या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित स्मारक म्हणून देशभरात ज्ञान केंद्र म्हणून नावाजले जात आहे. लक्षावधी देशी परदेशी पर्यटकांनी या ठिकाणी भेट देत येथील अद्ययावत समृध्द ग्रंथालय तसेच बाबासाहेबांचे जीवनचरित्र उलगडणारे छायाचित्र दालन व इतर सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
या वर्षीचा संविधान दिन हा अमृत महोत्सवी विशेष असल्याने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मारकास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच स्मारकातील सभागृहात संविधान उद्देशिकेच्या एकत्रित समुह वाचनाचा विशेष उपक्रम सेक्टर 15 ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील 280 विद्यार्थी व 10 शिक्षक यांच्या समवेत राबविण्यात आला. या प्रसंगी उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या समवेत शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच स्मारकातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानातील उद्देशिकेचे समुह वाचन केले.
स्मारकातील ऑडिओ व्हिज्युअल ग्रंथालयात विशेष संविधान कक्ष निर्मिती करण्यात आली असून त्याठिकाणी संविधानाच्या मूळ प्रतिची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या कक्षामध्ये संविधानाशी संबधीत पुस्तके उपलब्ध्‍ करुन देण्‍यात आली आहेत. जेणे करुन संविधान अभ्यासकांना संविधानाविषयी सखोल अभ्यास करता येईल तसेच संविधान जाणून घेण्याची इच्छा असणा-या वाचकांना संविधान विषयक सांगोपांग माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध्‍ होउु शकेल.
संविधान दिनी 1200 हून अधिक पर्यटकांनी स्मारकाला भेट दिलेली असून ग्रंथालयातील स्वतंत्र संविधान कक्ष पाहून व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे स्मारकातील विविध सुविधांचीही प्रशंसा केली आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *