मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे समोर आले. महिलेचा कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र तरीही मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री नऊ वाजता एका महिलेने फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असून त्यासाठी शस्त्र देखील तयार करण्यात आल्याचे सांगितले. या फोननंतर मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष अलर्ड झाला आणि हा कॉल कुठून आला आणि कोणी केला याचा तपास सुरू झाला. तपासादरम्यान पोलिसांना हा संशयास्पद कॉल अंधेरी भागातील एका महिलेने केल्याचे समजलं. पोलिस नियंत्रण कक्षाला महिलेचा कॉल आल्यावर पोलिसांनी फोन करणाऱ्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. यावर महिलेने कॉल कट केला.
यानंतर मुंबई गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्यानंतर आंबोली पोलिसांना महिलेची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तिला अटक केली. याप्रकरणी मुंबई पोलीस झोन नऊचे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, “आंबोली पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेची चौकशी केली आणि तिची पार्श्वभूमी देखील तपासली पण काहीही संशयास्पद आढळले नाही. कौटुंबिक समस्यांमुळे पीडित महिलेने असा फोन केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.”
पंतप्रधान मोदींना सहा वर्षात तीनवेळा जीवे मारण्याची धमकी
गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान मोदींना तीन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या पहिल्या धमकीमध्ये २०१८ साली महाराष्ट्रातील मोहम्मद अलाउद्दीन खान नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबुक पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर २०२२ मध्ये झेवियर नावाच्या व्यक्तीने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. २०२३ मध्येही हरियाणातील एका व्यक्तीने व्हिडिओ व्हायरल करत पंतप्रधान मोदींना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती.