जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न

ठाणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही, असे सांगत राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. तसेच मतदान बंद झाल्यानंतर म्हणजेच सायंकाळी ६ ते ११ यावेळेत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी आणि वाढीव मतदान येते कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी कळवा येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१४ पासूनच मी मतदान यंत्राच्या धोक्याबाबत बोलत आहे. आताही आमच्या लोकांना मी हेच सांगत होतो की, छोटी राज्य देतील आणि मोठी राज्य ताब्यात घेतील. त्याकडे आमच्या लोकांचे दुर्लक्ष झाल्याचे आव्हाड म्हणाले. मतदान यंत्र हे मानव निर्मित असल्यामुळे त्यात बदल करणे शक्य आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये मतदानाचा आकडा लगेचच उपलब्ध होतो. तरीही मतदानाची आकडेवारी देण्यास उशीर कसा काय होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत राज्यात तब्बल ७६ लाख मते वाढली असल्याचा दावाही त्यांनी केली. जास्तीत जास्त दिड ते दोन टक्के मतदान सहा नंतर वाढू शकते. मात्र काही जिल्ह्यात तब्बल १० टक्यापर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी, वाढीव मतदान येते कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते जवळपास एकसारखीच मिळाली असून एखाद्या पॅर्टनशिवाय हे शक्यच नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. नांदेडमध्ये लोकसभेची जागा आम्ही जिंकतो आणि विधानसभेच्या सहा जागांवर पराभव होतो. असे वेगळे निकाल एकाच जिल्ह्यात कसे लागू शकतात, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही. प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणुकींचे निकाल द्यायचे असतील तर संविधान आणि लोकशाहीचा काय उपयोग आहे. अशाने लोकशाही संपुष्टात येईल आणि भारताचा रशिया होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. उतरत्या वयात शरद पवार यांना आत्मक्लेश होईल अशा पद्धतीने एकटे पाडले जात आहे. मातोश्रीबाबतही तीच रणनीती आखली जात असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *