डोंबिवली : डोबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात उद्धव सेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली. या निवडणूकीत म्हात्रे यांचा पराभव झाला. हा पराभव ईव्हीएम मशीनमुळे झाला असून प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार चव्हाण यांना मिळालेली मते आणि मताधिक्य याविषयी म्हात्रे यांना संशय आहे. त्यांनी व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता निवडणूक यंत्रणेकडे ४ लाख ७२ हजार रुपये भरले आहेत.
यासंदर्भात पराभूत उमेदवार म्हात्रे यांनी सांगितले की, डोंबिवली मतदार संघाकरीता एकूण ३६० व्हीव्हीपॅट होते. डोंबिवली मतदार संघातून भाजपचे चव्हाण हे चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात म्हात्रे यांना पडलेली मते आणि चव्हाण यांना पडलेली मते तसेच त्यांना मिळालेलेे मताधिक्य हे जास्त आहे. म्हात्रे यांचा पराभव हा ईव्हीएम मशीनमुळे झाला आहे.
म्हात्रे यांनी व्हीव्ही पॅट मधील मते मोजण्याकरीता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ४ लाख ७२ हजार रुपये रक्कम भरली आहे. एकूण व्हीव्ही पॅट मशीन पैकी दहा मशीनमधील मते पुन्हा मोजली जातील. म्हात्रे यांचा ज्या मतदान केंद्रावरील मतदानविषयी संशय आहे. त्या मतदान केंद्राची नावे सांगण्यात येणार आहेत. त्याची तारीख व वेळ लवकर जिल्हाधिकारी यांच्याकडून म्हात्रे यांना कळविली जाणार आहे.
दरम्यान राज्यभरात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या विषयी महाविकास आघाडीने शंका घेत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. या आरोपापश्चात उद्धव सेनेकडून डोंबिवलीत आज विविध ठिकाणी बूथ लावण्यात आले आहे. त्याठिकाणी ईव्हीएम मशीनच्या विरोधात नागरीकांची स्वाक्षरी मोहीम घेतली जात आहे.
००००