कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खडकपाडा , वायले नगर, कल्याण पश्चिम येथील वरटेक्स सॉलिटेअर ए.१ या इमारतीला आग लागल्याची वर्दी श्री अविनाश या इसमाने भ्रमणध्वनी क्रमांक ९८९२४०९२६० द्वारे दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक १७:४८ वाजता आधारवाडी अग्निशमन केंद्रास दिली. वर्दी मिळताच आधारवाडी अग्निशमन केंद्रातील दोन अग्निशमन वाहने अधिकारी व कर्मचारी समवेत घटनास्थळी रवाना झाले. वर्दीच्या ठिकाणी पोहोचले असता, इमारतीच्या १५, १६ व १७ व्या मजल्यावरील आगीचे भीषण व रौद्ररूप पाहता आधारवाडी अग्निशमन केंद्राचे दोन ,पलावा ,ड प्रभाग, एमआयडीसी डोंबिवली पूर्व अग्निशमन केंद्रांचे प्रत्येकी एक वाहन मदतीकरता बोलविण्यात आले. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे अग्निशमन वाहन व ठाणे महानगरपालिका व अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेचे प्रत्येकी एक हायड्रोलिक प्लॅटफॉर्म वाहन मदतीकरिता बोलविण्यात आले.
आगीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीचा वीज पुरवठा बंद करून इमारतीमधील अग्निशमन पंप चालू करून स्थायी अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने अग्निशमन व विमोचन कार्य करण्यात आले. तसेच इमारतीमधील आगीच्या भक्षस्थानी अडकलेल्या ७ नागरिकांना अग्निशमन जवानांमार्फत धुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्यापैकी एक वयोवृद्ध महिलेस अग्निशमन कर्मचाऱ्याने १६ व्या मजल्यावरून पाठीवर बसून सुरक्षित खाली उतरविण्यात आले . सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही
अथक प्रयत्नांती रात्री २०:४८ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले, तसेच इमारतीच्या १५,१६ व १७ व्या मजल्यावरील इतरत्र पसरणारी आग नियंत्रणात आणून मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान वाचविण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अति उंच इमारतीमधील स्थायी अग्निशमन  यंत्रणेद्वारे शॉर्टसर्किट किंवा  इतर कारणाने निर्मित आगीवर तात्काळ नियंत्रण मिळणेकामी, सदरची यंत्रणा उपयोगी होते.  सदर यंत्रणेचा वापर कसा करावा याबाबत विविध ठिकाणी तसेच शाळा महाविद्यालय , व्यापारी संकुले व अशा सोसायटीमध्ये जनजागृती व अग्निशमन प्रशिक्षण महानगरपालिके मार्फत नियोजित आहे.
तसेच डोंबिवली येथे देखील नव्याने अद्ययावत  अग्निशमन वाहनासह सुसज्ज अग्निशमन केंद्रे उभारणे प्रस्तावित आहे.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *