राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या विद्यार्थ्यांना सूचना
मुंबई : भारतात वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी परदेशातील शिक्षणाचा मार्ग स्वीकारतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी परदेशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. या खासगी महाविद्यालये व विद्यापीठांमधील नियम राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियमांशी सुंसगत नसतात. तसेच ही खासगी विद्यापीठे आयोगाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. यामुळे ही विद्यापीठे किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय नोंदणी करताना अपात्रतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे परदेशातील खासगी वैद्यकीय महविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणे टाळा, अशा सूचना राष्ट्रीय आयुर्विज्ञान अयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षणासाठी भारतामध्ये प्रवेश न मिळाल्यानंतर विद्यार्थी रशिया, युक्रेन, कझाकिस्तान, फिलिपाईन्स, चीन या देशांमध्ये प्रवेश घेण्याला प्राधान्य देतात. देशातून दरवर्षी जवळपास २० ते २५ हजार विद्यार्थी परदेशी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. परदेशी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा भारतामध्ये वैद्यकीय सराव करण्यासाठी येतात. यापैकी अनेक विद्यार्थी भारतातून पदव्युत्तर शिक्षण घेण्यालाही प्राधान्य देतात. मात्र परदेशातील अनेक खासगी विद्यापीठे व वैद्यकीय महाविद्यालयांचे नियम हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियमांशी सुंसंगत नसतात. तसेच ही खासगी विद्यापीठे व वैद्यकीय महाविद्यालये आयोगाच्या नियमांचे पालन करीत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण किंवा आंतरवासिता यासंदर्भातील नियमांचा समावेश आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतामध्ये वैद्यकीय सराव सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) द्यावी लागते. ही परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगांतर्गत असलेल्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसेंटिएटच्या (एफएमजीएल) नियमानुसार सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण किंवा आंतरवासिता याबाबत सादर केलेल्या प्रमाणपत्रांची खातरजमा केली जाते. मात्र अनेक वेळा परदेशी खासगी विद्यापीठ किंवा वैद्यकीय महविद्यालये आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियमांमध्ये फरक असल्याने विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय नोंदणी करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय सराव करणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे परदेशातील खासगी विद्यापीठे व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी योग्य काळजी घेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.