गालच्या उपसागरातील वादळाचा थंडीवरील परिणाम

मुंबई : नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारपासून (३० नोव्हेंबर) राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. नाशिक, नगर, पुण्यात गुरुवारीही पारा ९ अंशांवर होता.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी (२८ नोव्हेंबर) स्थिर होते. या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून चक्रीवादळात रुपांतर होऊन, ते शनिवारी (३० नोव्हेंबर) तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील महाबलीपुरम् ते पुदुच्चेरीच्या किनारपट्टीवरील कराईकल दरम्यानच्या भागात धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पूर्व आणि आग्नेय दिशेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यातील थंडी काही दिवस कमी होणार आहे.

 

दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा गुरुवारीही नऊ अंशांवर कायम आहे. हवामान कोरडे असल्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. गुरुवारी नगरमध्ये ९.५, पुण्यात ९.८, नाशिकमध्ये १०.५, साताऱ्यात १२.५, सोलापुरात १४.६, औरंगाबादमध्ये ११.६, धाराशिवमध्ये १२.४, परभणीत ११.५, नागपुरात ११.८, गोंदियात ११.४, वर्ध्यात १२.४ आणि अकोल्यात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

 

विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज

 

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात रविवार (१ डिसेंबर) आणि सोमवारी (२ डिसेंबर) तुरळक ठिकाणी हलक्या ते अत्यंत हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही तुरळक ठिकाणी सोमवारी पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *