भारतीय संविधानाच्या अनुछेद 19 ते 28 पर्यंत विविध प्रकारचे स्वातंत्र्य भारतीयांना नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील पाहिलेच आणि अतिमहत्वाचे स्वातंत्र्य संविधानामध्ये नमूद करण्यात आले ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य! भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संविधानात मूलभूत हक्क मानण्यात आले आहे. भाषण, लेखन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एल्गार आपल्याला संत चळवळीत पाहायला मिळतो. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क मिळविण्यासाठी संत परंपरेला मोठी किंमत मोजावी लागली आहे. संतांच्या प्रबोधन चळवळी पूर्वी बहुतेक लेखन, साहित्य हे संस्कृत भाषेतच होते. विशेषतः ज्या प्रभावात समाज व्यवस्था चालत होती ते धार्मिक ग्रंथ तर पूर्णपणे संस्कृतमध्ये होते. त्याला पहिला धक्का चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाने महाराष्ट्रात दिला. जणू लोक भाषेत व्यक्त होण्याची पायवाट मराठीत त्यांनी सुरू केली. चक्रधर स्वामीचे शिष्य महाहिम भट आणि शिष्या म्हादंबा यांनी मराठीत लिळा लिहिल्या. महिलांना भक्ती परंपरेत स्थान देण्याची आणि लोक भाषेत साहित्य निर्मितीची पायवाट जी महानुभाव पंथाने सुरू केली. तिचा राजमार्ग करण्याचे काम वारकरी संत परंपरेने केले. म्हणजेच लोक भाषेत लिहिण्याचा हक्क स्वतः प्राप्त करून इतरांना ते स्वातंत्र्य बहाल करण्याचे काम संत परंपरेने केले. एका अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो एल्गारच होता, असे म्हणावे लागेल.
संस्कृत भाषेच्या प्रभावातून भक्ती परंपरेला मुक्ती देण्याचे काम संत चळवळीने केले. तिला मध्ययुगीन प्रबोधन चळवळ असेही म्हटले जाते. ज्ञान हे संस्कृतच्या बंधनातून मुक्त करुन जनभाषेत आणण्याची सुरुवात दक्षिणेतील संत परंपरेपासून झाली. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत तामिळनाडूमध्ये वैष्णव अळवार संत परंपरा रुजली आणि विकसित झाली. या अळवार संतांनी संस्कृतीच्या जोखडातून भक्ती परंपरेला मुक्त करीत जनभाषेचा भक्कम आधार दिला. इतकेच नव्हे तर आमची जनभाषा आम्ही ज्ञान भाषा करू, असा निर्धार अलवार संतांनी केली. तमिळ भक्ती परंपरेत चार अळवारांना विशेष मान आहे. त्यातील भूत्तम अलवार आपली मातृभाषा असलेल्या तमिळ भाषेला ज्ञान भाषा करण्याची प्रतिज्ञा करतात. त्यांनी तमिळमध्ये लिहिलेल्या काव्याचा मराठी अनुवाद असा आहे की,
प्रेम असते जळणा-या दिव्या समान
त्यातील तेल असते मनातील इच्छा
शाश्वत सुरुवात विरघळून जाणारे मन
असते त्याची वात
मी पेटविली आहे
प्रकाशमान ज्ञानज्योत तामीळ भाषेत
तिला लावले आहे कामी नारायणासाठी
तामिळनाडू मधील अलवार संतांनी जनभाषेत साहित्य निर्मितीला प्रारंभ केल्यानंतर त्याचा प्रभाव बाजूच्या कर्नाटकातील संत परंपरेवर पडला. अगोदर संस्कृत मध्ये असणारी विविध पुराणे पंपा आणि रान्ना यांनी कानडीमध्ये आणली. पुढे बसवण्णा, अक्कामहादेवी आणि अलम प्रभू या वीरशैव संतांनी आपली वचने तेथील लोक भाषेत म्हणजे कानडीत लिहिली. त्याच प्रभावातून चक्रधर स्वामींच्या शिष्यांनी मराठीत रचना करायला सुरुवात केली. अर्थात ज्यांना ज्ञान हे संस्कृतच्या कडीकुलूपात बंद ठेवायचे होते. त्यांनी अशा मराठी साहित्य निर्मितीला विरोध केला. तेव्हा चक्रधर स्वामींच्या शिष्यांनी खणखणीत मराठीमध्ये सुनावले की,
तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा :
मज चक्रधरे निरुपिली म-हाटी :
तियासिचि पुसा :
तुमचं संस्कृत मधील अस्मात कस्मात आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला चक्रधर स्वामींनी मराठी सांगितलेली आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर त्यांना विचारा.
त्या पुढे वारकरी संप्रदायाचा पाया असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी तर अमृताशी पैज लावली तर माझी मराठीचं जिंकेल असा दृढ विश्वास व्यक्त करीत साहित्य निर्मिती केली. ज्ञानेश्वर महाराज लिहितात-
माझा म-हाटाचि बोलू कवतूके l
अमृतातेही पैजा जिंके l
ऐशी अक्षरे रसिके l
मेळविनll
मराठीचा गौरव करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
हां हो नवल नोहे देशी l
म-हाटी बोलिजे तरी ऐसी l
वाणे उमटत आहे मा आकाशी l
साहित्य रंगाचे ll
म्हणजे संस्कृतध्येच लिहिण्याचे, बोलण्याचे जे बंधन होते ते ढिले करून मराठीत ज्ञान प्रवाहित करण्याचे महान कार्य संत चळवळीने केले. ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृतच्या बंधनांत अडकलेली गीता मुक्त केल्याबद्दल संत मंडळानेही ज्ञानेश्वर महाराज यांचा गौरव केला आहे. संस्कृतमधील गीतेवर भाष्य करताना मराठीतील 56 बोली भाषांचा गौरव केला असल्याचा निर्वाळा देताना नामदेव महाराज म्हणतात-
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी l
ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ll
अध्यात्म विद्येचे लाविलेसे रोपl
चैतन्याचा दीप उजळीलाll
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव l
भवार्णवी नाव उभारीली ll
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी l
एक तरी ओवी अनुभवावी ll
दुस-या एका अभंगात संस्कृताची गाठ सोडून गीता देवी मराठीत आणल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज यांचा गौरव करताना नामदेव महाराज म्हणतात
संस्कृताचि गाठी l
उघडोनी ज्ञान दृष्टी l
केलीसे मराठीl
गीता देवी ll
तर आधुनिक मुरलीधर नारायण गुप्ते ऊर्फ कवी बी यांना तर संस्कृतमध्ये बांधून ठेवलेले ज्ञान मराठीमध्ये मुक्त करणे ही बंडखोरी आहे, असे वाटते. इथल्यासामाजिक आणि धार्मिक सुधारणांवर भाष्य करणारी कवी बी यांची डंका नावाची कविता आहे. या कवितेत कवी बी म्हणतात –
त्या बड्या बंडवाल्यात
ज्ञानेश्वर माने पहिला;
मोठ्यांच्या सिद्धांतांचा
घेतला पुरा पडताळा,
डांगोरा फोलकटांचा
पिटविला अलम दुनियेला;
झजोनी देवा दैत्या
अमृतामधी न्हाणी जनता;
उजळीला मराठी माथा;
सत्तेचे प्रत्यय आले!
तेजाचे तारे तुटले!
संस्कृत भाषेत ज्ञान अडकल्यामुळे ते मूठभर लोकांच्या पुरतेच मर्यादित होते. सर्व सामान्यांना ते कळत नव्हते. अपसूकच त्यामुळे संस्कृत न कळणारांमध्ये न्यूनगंड निर्माण होत होता. तर ज्यांना ही भाषा येत होती, त्यांना अहंगंड निर्माण होत होता. मग संस्कृत येणारे उच्च समजले जात, तर न येणारे आपोआपच कनिष्ठ ठरत होते. म्हणूनच लोक भाषेत साहित्य निर्मिती झाल्याने ते ज्ञान सर्वांसाठी खुले झाले.
एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृतधील ज्ञान मराठीत आणून बंडखोरी केली तर तिकडे पंढरपूरात वारकरी संप्रदायाचे इंजिनीअर आणि विस्तारक संत शिरोमनी नामदेव महाराज यांनी “अभंग” हा काव्य प्रकार जन्माला घालून लेखन स्वातंत्र्य मिळविले, तर वारकरी कीर्तन परंपरा निर्माण करून स्वतःबरोबर ईतरांनाही अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळवून दिले.
संत शिरोमनी नामदेव महाराज यांचा मी वारकरी संप्रदायाचे इंजिनीअर असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या जाण्याची शक्यता आहे. या पूर्वी असा उल्लेख कुणीही केला नाही. तुकाराम महाराज यांच्या शिष्या बहिणाबाई यांनी जी वारकरी संप्रदायाची रचना इमारतीच्या रुपकामध्ये माडली आहे, त्यात नामदेव महाराज यांचा उल्लेख विस्तारक असा केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज यांचा उल्लेख पाया असा केलेला आहे. एकनाथ महाराज यांचा उल्लेख खांब तर तुकाराम महाराज यांचा उल्लेख कळस असा केला आहे. तो अभंग असा आहे-
संत कृपा झाली l
इमारत फळा आली ll1ll
ज्ञानदेवे रचिला पाया l
उभारिले देवालया ll2ll
नामा तयाचा किंकर l
तेणे केला हा विस्तार ll3ll
जनार्दन एकनाथ l
खांब दिला भागवत ll4ll
तुका झालासे कळस l
भजन करा सावकाश ll5ll
बहिणी म्हणे फडकती द्वजा l
निरुपण केले ओझा ll6ll
म्हणजे यात नामदेव महाराज यांचा उल्लेख विस्तारक असा केलेला आहे. काही लोक बहिणाबाई यांच्याच अभंगाच्या चालीवर नामदेवे रचिला पाया असे म्हणतात. त्यात ज्ञानेश्वर महाराज यांना नाकारून नामदेव महाराज यांना प्रोजेक्ट करण्याचा हेतू दिसतो. अर्थात एकंदर वारकरी परंपरेत नामदेव महाराज यांनी जे कार्य केले आहे, तितक्या प्रमाणात त्यांचा गौरव महाराष्ट्रात झाल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रापेक्षा नामदेव महाराज यांना पंजाबात खरी लोकमान्यता मिळाली. पंजाबात उदयास आलेल्या शीख पंथाचा धर्मग्रंथ असणा-या *गुरुग्रंथ साहेबा*मध्ये नामदेव महाराज यांच्या 61 अभंगाचा समावेश आहे. यावरून तितथल्या लोकामध्ये नामदेव महाराज यांच्या विषयी किती आदर आहे, हे दिसून येते. एका अर्थाने महाराष्ट्राने कामाच्या तुलनेत नामदेवराय यांच्यावर अन्याय झाला आहे, हे मान्य केले पाहिजे. या अन्याची जाणीव झालेले लोक मग ‘नामदेवे रचिला’ पाया असा उल्लेख करू लागले आहेत. मात्र एकदा ज्ञानेश्वर महाराज यांना “पाया” म्हणून मान्यता मिळालेली असताना ती काढून घेणे हे वारकरी परंपरेला मान्य होणारे नाही. तसे करणे योग्यही नाही. नामदेव महाराज यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज यांची एखादी मान्यता काढणे योग्य नाही. तसे केल्याने मने गढूळ होण्याचीच शक्यता असते. असे असले तरी नामदेव महाराज यांचे कार्य लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. बहिणाबाईने उभ्या केलेल्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीकडेच मग गेली अनेक वर्षे तटस्थपणे मी पाहू लागलो, विचार करू लागलो तेव्हा एके दिवशी अचानक मला नामदेवराय या इमारतीचे इंजिनीअर आहेत, असा साक्षात्कार झाला. तेव्हा पासून ही मांडणी करतो आहे.
आतां आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल की, नामदेव महाराज यांना आपण इंजिनीअर किंवा वास्तू विशारद कसे म्हणता? तर त्याचे उत्तर असे आहे की, आपण इमारत काही जाऊन कसाही पाया खोदत नाही. त्यासाठी अगोदर त्या इमारतीचा आराखडा (प्लॅन) तयार केला जातो. वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरा आणि साहित्याकडे एक अभ्यास म्हणून मी जेव्हा पाहू लागलो. तेव्हा त्यात नामदेव महाराज यांनीच ही आखणी केली असल्याचे जागो जागी दिसू लागले. त्यातील एक एक उदाहरण आपण पाहूया.
वारकरी परंपरेने प्रबोधनासाठी कीर्तन हे प्रमुख साधन मानले. आणि जगातील पहिले वारकरी कीर्तन कुणी केले असेल तर ते नामदेव महाराज यांनी केलेले आहे. या कीर्तनातून त्यांनी स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त केलेच, पण इतरांनाही आपली अभिव्यक्ती मुक्तपणे व्यक्त करण्याची सोय केली. जी आगोदरच्या कीर्तन परंपरेत नव्हती. नामदेव महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्रात कीर्तन परंपरा नव्हती असे नाही. त्यांच्या अगोदर इथे नारदीय कीर्तन परंपरा होती. ही परंपरा आजही अस्तित्वात आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये चार प्रकारच्या कीर्तन परंपरा आहेत. नारदीय, वारकरी, रामदासी आणि गुरुदेव किर्तन परंपरा. नारदीय किर्तन परंपरेमध्ये डाव्या बाजूला तबलेवाला असतो. उजव्या बाजूला पेटीवाला असतो. मध्य भागी कीर्तनकार उभे असतात. त्या कीर्तनकाराच्याच हातात झांज असते. वेगळे गायक नसतात. जे कांही सांगायचे आहे ते एकट्या कीर्तनकाराने सांगायचे बाकी सगळ्यांनी फक्त ऐकून घ्यायचं. नारदीय परंपरेत ज्ञान देण्याचा आणि ज्ञान घेण्याचा अधिकार एकाकडे केंद्रित झालेला असतो. नामदेव महाराजांनी ही एककेंद्री कीर्तन परंपरा बाजूला सारली आणि सर्व समावेशक वारकरी कीर्तन परंपरा सुरू केली. या वारकरी किर्तन परंपरेत पाच-पंचवीस टाळकरी एकाबाजूला, पाच-पंचवीस टाळकरी दुसऱ्या बाजूला असतात. एखादा कीर्तनकार आपला विषय मांडत असेल आणि त्याला अनुरूप एखादा अभंग किंवा एखादी ओवी एखाद्या टाळकऱ्याला आठवली तर ते म्हणण्याचे स्वातंत्र्य त्या टाळकऱ्याला देण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. वारकरी संप्रदायाच्या रचनेपूर्वी ज्ञान देण्याचा अधिकार सर्व सामान्यांना नव्हता, उद्धार करून घ्यायचा असेल तर तोही दुस-याच्या माध्यमातून करून घ्यावा लागत होता. मात्र नामदेव महाराज यांनी-
नाचू कीर्तनाचे रंगी l
ज्ञानदीप लावू जगी ll
असे सांगत कीर्तनातून ज्ञानाची ज्योत पाजळून प्रकाश बीजे रुजविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असा विश्वास दिला. त्याचा विस्तार होत गेला आणि मग तुकाराम महाराज यांनी दणक्यात सांगून टाकले-”
सकळाशी येथे आहे अधिकार l
कलयुगी उद्धार हरीच्या नामे ll
आता ज्ञान देण्याचा, व्यक्त होण्याचा, उद्धरून जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, असा निर्वाळाच संत परंपरेने दिला.
म्हणजे वारकरी परंपरेच्या कीर्तनाचा नवा अराखडा नामदेव महाराज यांनी केला. त्यानंतर या कीर्तन परंपरेसाठी “अभंग” हा स्वतंत्र काव्य प्रकार विकसित केला. नामदेव महाराज यांच्या अगोदर जगात कुणीही अभंग लिहिला नव्हता. तो नामदेव महाराज यांनी लिहिला. म्हणजे लेखन स्वातंत्र्य त्यांनी मिळविले. नामदेव महाराज स्वतः अभंग करून थांबले नाहीत, तर इतरांना अभंग लिहिता यावा यासाठी मार्गदर्शन केले. त्यासाठी अभंग कसा लिहावा हे त्यांनी अभंगातून मांडले. अभंगांचे एकूण तीन प्रकार आहेत. समचरणी अभंग. चौ चरणी अभंग आणि दीड चरणी अभंग. समचरणी अभंगामध्ये दोन्ही टुकेला यमक असते. नामदेव महाराज म्हणतात-
समचरणी अभंग l
नोहे ताळ छंदोभंगll
उदाहरणार्थ-
रुप पाहता लोचनी l
सूख झाले ओ साजणी ll
चौ चरणी अभंगात तीन टुकावर यमक असते तर चौथ्या टुकेला यमक नसते.
उदाहरणार्थ –
विठ्ठल जिवीचे जीवन l
अगम निगमाचे स्थान l
विठ्ठल सिद्धीचे साधन l
विठ्ठल ध्यान विसावा ll
तर दीड चरणी अभंगात दीड चरणावर यमक असते. त्याबद्दल नामदेव महाराज लिहितात-
दीड चरणाचे दीर्घ ते अक्षर l
मुमुक्षू विचार बोध केला ll
उदाहरणार्थ-
नामा म्हणे देवा चला तरा ठाया l
विश्रांती घ्यावया कल्पवरी ll
नामदेव महाराज यांनी प्रोत्सान दिल्यामुळेच 24 स्री-पुरुष संत कवी त्यांच्या काळात तयार झाले. त्यांनी अभंग रचना केली. विशेषत: यातील बहुतेक चातुर्वण व्यवस्थेने शुद्र, अतिशूद्र ठरविलेल्या विविध जातीतील होते.
ज्यात आमुचि माळीयाचि जात l
शेत लावू बागायतll
म्हणणारे सावता महाराज होते.
वारीक वारीक l
हजामत करू आम्ही बरीक l
म्हणारे सेना महाराज होते.
मन बुद्धीची कातरी l
राम नामे सोने चोरी l
म्हणारे नरहरी महाराज होते.
जोहार मायबाप जोहार l
तुमच्या म्हाराचा मी म्हारll
म्हणारे चोखोबा आणि त्यांचे कुटुंबीय होते.
चोखामेळा आणि नामदेव महाराज यांचा तर एकमेकांशी खूप जिव्हाळा होता. म्हणूनच नामदेव महाराज यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना जशी अभंग लिहिण्यासाठी प्रेरणा दिली तशीच चोखोबा महाराज यांच्या कुटुंबातील सर्वांना लिहिते केले. ज्यात चोखोबांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहिण निर्मळा, मेहुणा बंका यांच्या नावे अभंग आहेत. चोखामेळा यांच्या विषयी नामदेव महाराज यांना किती जिव्हाळा होता याचे बोलके उदाहरण म्हणजे मंगळवेडा येथे गावच्या तटबंदीच्या बांधकामावर मजुरी करीत असताना ती भिंत कोसळली. त्यात चोखोबासह अनेकजण गाढले गेले. चोखोबा यांचा त्यातच अंत झाला. ही गोष्ट नामदेव महाराज यांना कळाली तेव्हा ते खूप दु:खी झाले. पण केवळ शोक करीत बसले नाहीत, तर त्यांनी मंगळवेडा येथे जाऊन चोखोबा यांची हाडे शोधून आणली आणि थेट पाडुरंगाच्या दारात समाधी बांधली. चोखोबांचे दर्शन घेऊन चोख झाल्याशिवाय पाडुरंगाचे दर्शन पावणार नाही, असा संकेत दिला. गावकुसाबाहेर अस्पृश्य म्हणून राहिलेल्या चोखोबांना पाडुरंगाच्या दारात उभे करून आणि सर्वांना त्यांचे दर्शन घेण्याचे संकेत देणे हे सामाजिक समतेसाठी केलेली मोठी क्रांतीच म्हणावी लागेल.
ज्यांना व्यक्त होण्याचे कोणतेही माध्यम नव्हते. ज्यांच्या भावभावना हजारो वर्षे मुक्या झाल्या होत्या त्यांना आवाज मिळाला. आपली मते मांडता येऊ लागली, ही केवढी मोठी क्रांती होती.
जे नारदीय कीर्तन एक व्यक्ती सांगत होती आणि बाकी सगळे ऐकत होते, तिथे सामोहीक कीर्तन परंपरा सुरू करून नामदेव महाराज यांनी अध्यात्मिक लोकशाहीचा पाया घातला. वारकरी गात असलेला अभंग हा काव्य प्रकार त्यांनी लिहिला. जगातली पहिली आरती –
युगे अठ्ठावीस विठेवरी उभा
ही नामदेव महाराज यांनी लिहिली. बहुतेक सर्व देवाच्या जन्माचे अभंग त्यांनी लिहिले. त्यांच्या समकालिन अनेक संतांचे चरित्र नामदेव महाराज यांनी लिहिले. म्हणजे सर्व वारकरी परंपरांची आखणी त्यांनी केली आहे, हे सिद्ध होते. म्हणूनच मी नामदेव महाराज यांना वारकरी संप्रदायाचे इंजिनिअर किंवा रचनाकार म्हणतो.
कीर्तनाला सामोहीक रूप देऊन, अभंग लिहिण्यासाठी शुद्र, अतिशुद्रांना अभंगातून अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य वारकरी परंपरेतून मिळू लागले तेव्हा वर्चस्ववादी व्यवस्थेला हे सहन होणे शक्य नव्हते. गावकुसाबाहेर राहणारे चोखोबा, दासीचं काम करणारी जनाबाई भगवंताचे अभंग लिहितात, या अभंगातून देवाशी सलगी करतात. आपल्या व्यथा वेदना मांडतात, हे वर्चस्ववादी व्यवस्थेला पचने अवघड होते. म्हणूनच मग कधी जनाबाईवर भगवंताचा शेला चोरल्याचा तर कधी चोखोबांवर हार चोरल्याचा आळ घेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. चोखोबांना मारहाण होतहोती तेव्हा त्यांनी विठ्ठलाचा धावा केला.
धाव घाली विठू आता चालू नको मंद l
बडवे मज मारिती
काय ऐसा अपराध ll
विठोबाचा हार तुझ्या
कंठी कैसा आला l
म्हणती म्हारा कारे देव बाटविला ll
चोखोबा यांना झालेल्या मारहाणीमुळे सर्व कुटुंबियांना खूप दु:ख झाले होते. पण त्याचा खोलवर परिणाम त्यांचा मुलगा कर्ममेळा यांच्यावर झाला. मग अस्पृश्य म्हणून समाजात मिळणारी हीन वागणूक , अपमान हे कर्ममेळा अनुभवत होते. त्या वेदनांना त्यांना अस्वस्थ करीत होत्या. कर्ममेळा यांनी या अस्वस्थतेला आपल्या अभंगातून वाट करून दिली. चोखोबा यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या अभंगात अस्पृश्य जातीत जन्मल्याची खंत आहे. पण कर्ममेळा यांच्या अभंगात विद्रोह आहे. हीन जातीत जन्माला घालून आपल्यावर देवाने अन्याय केले आहे, या भावनेतून कर्ममेळा संतप्त होतात. सर्वांचा निर्माता हा देव आहे, असे म्हणतात. निर्माता म्हणजे बाप. तो जर सर्वांचा बाप असेल तर मग तो असा पक्षपाती कसा वागतो. त्याची काही लेकरे त्याची पूजा करू शकतात, आम्हाला मात्र मंदिरात प्रवेश नाही. याची काही लेकर गावात महालात राहतात मात्र आम्हाला गावकुसाबाहेर झोपडीत रहावे लागते. या देवाची काही लेकर चांगले अन्न खातात आणि आम्हाला मात्र उष्ट्यावर जगावे लागते. असे का? असे प्रश्न कर्ममेळा यांच्या मनात निर्माण होतात. त्याबद्दल ते देवाला केवळ जाब विचारत नाही तर देवाची लाज काढतात.
कर्ममेळा लिहितात-
आमुचि केली हीन याती l
तुज ना कळे श्रीपती ll
जन्म गेला उष्टे खाता l
लाज न ये तुझ्या चित्ता ll
आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच सातशे वर्षांपूर्वी कर्ममेळा देवालाही थेट सवाल करू शकले. अशा प्रकारे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुळे आपल्याला संत साहित्यात पहायला मिळतात.
समता आणि स्वातंत्र्याचा संत परंपरेत आलेला विचार आपण आतापर्यंत पाहिला. पुढील भागात बंधुत्व आणि संविधानातील कर्तव्याशी असणारे संत विचाराचे नाते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहो.
संपर्क: 9892673047.
9594999409