Month: November 2024

ट्रम्पशाहीचे प्रस्तावित अधिक-उणे

लष्करी ताकद, जागतिक व्यापारावरील भक्कम पकड आणि जगाचा विरोध दुर्लक्षून प्रत्येक महत्वाकांक्षा तडीस नेणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर आता जागतिक शक्तींचे संतुलन होते…

अल्पवयीन मुलाने केला अपघात,

आरोपी मुलासहित वडिलांवर गुन्हा दाखल  सुनिल इंगळे उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलाने भरघाव वेगाने स्कूटर चालवून वृद्ध इसमाला धडक दिल्याने सदर वृद्ध गंभीरित्या जखमी झाला आहे. यासंदर्भात उल्हासनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या वडिलांनी स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी आरोपी मुलासहित त्याच्या वडिलांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर _1 परिसरातील सी ब्लॉक या परिसरात असलेल्या कोणार्क रेसिडेन्सी या ठिकाणी  बुधवारी रात्री 10  वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. कोणार्क रेसिडेन्सी मध्ये राहणारे निरंजन हरेशलाल ठाकूर ( 62) हे रस्ता ओलांडून घराकडे जात असतांना सुझुकी बर्गमन या स्कूटरने भरघाव वेगाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार्तिक याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व स्कूटरने निरंजन यांना धडक दिली,या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी निरंजन यांचा मुलगा नितेश ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी कार्तिक गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात कार्तिक हा अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच मुलगा अल्पवयीन असून देखील तिच्या वडिलांनी त्याला स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरोधात सुद्धा या अपघातात सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील हे करीत आहेत.  

नाशिक जिल्ह्यातील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता अवघ्या जिल्हावासीयांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, शनिवारी (दि. २३) सकाळी ८ पासून पंधराही मतदारसंघांत मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यंदा जिल्ह्यातील ६९.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त झाले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. बुधवारी (दि. २०) मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या-त्या मतदारसंघात उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षितरीत्या जतन करण्यात आले आहे. शनिवारी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता या स्ट्राँगरूम उघडल्या जाणार आहेत. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जिल्ह्याला नव्याने कोणते १५ आमदार लाभणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र नांदगाव : अतिरिक्त प्रशासकीय इमारत, नवीन तहसील कार्यायल इमारत, नांदगाव मालेगाव मध्य : शिवाजी जिमखाना, संगमेश्वर, मालेगाव मालेगाव बाह्य : शासकीय वखार महामंडळ गोदाम, मालेगाव बागलाण : मराठा हायस्कूल, स्काउट-गाइड हॉल, बागलाण कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण चांदवड : नवीन प्रशासकीय इमारत, आयटीआय रोड, चांदवड येवला : पैठणी क्लस्टर गोदाम औद्योगिक वसाहत, एमआयडीसी, अंगणगाव, येवला सिन्नर : तहसील कार्यालय, सिन्नर निफाड : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, निफाड दिंडोरी : मविप्र कॉलेज, दिंडोरी नाशिक पूर्व : मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक नाशिक मध्य : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक नाशिक पश्चिम : राजे छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, सिडको, नाशिक देवळाली : जिल्हा निवडणूक गोदाम, सय्यदपिंप्री, ता. नाशिक इगतपुरी : शासकीय कन्या विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सीबीएस, नाशिक

महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर मालवाहू वाहनाला आग

वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांगा पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे (महालक्ष्मी ) येथील उड्डाण पुलावर एका वाहनाला आग लागली लागल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वा. गुजरात वरून मुंबई दिशेला नवीन चारचाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये आंतरिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. गुजरात कडून मुंबई दिशेला नवीन चार चाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती चालकाने दिली आहे. वाहनात विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असून आग लागल्याचे समजताच चालकाने वाहन बाजूला करून स्वतःचा जीव वाचवला आहे. अगदी काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले असून अग्निशामक दल पोहोचण्यासाठी वेळ झाल्यामुळे ट्रक आणि आतील नवीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावरील महामार्ग पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ढिसाळ नियोजन अभावी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या जवळपास पाच किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्याही मार्गावर वाहने विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे सहा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी असल्याने संध्याकाळच्या वेळी जाणाऱ्या कामगारांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

झोपुचे संकेतस्थळ अद्ययावत

– आतापर्यंत १७३६ योजनांना मंजुरी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे संकेतस्थळ अद्ययावत व सहजगत्या हाताळण्याजोगे असून आता झोपडीवासीयांना सदनिका हस्तांतरण वा भाडेविषयक तक्रारींसाठी प्राधिकरणात हेलपाटे घालावे लागणार नाहीत. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रणालीद्वारे घरबसल्या हस्तांतरण तसेच तक्रारी करता येणार आहेत. आतापर्यंत १७३६ योजनांना परवानगी देण्यात आली असून या प्रत्येक योजनेचा सविस्तर तपशीलही संकेतस्थळावर नव्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शिवाय प्राधिकरणाच्या मुख्यालयात अंतर्गत बदल करून झोपडीवासीयांंसाठी सुलभ व्यवस्था निर्माण करून देण्यात आली आहे. झोपु योजनांसाठी पात्रता यादी वेळेत मंजूर होणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी मोठा कालावधी तसेच भ्रष्टाचार होत होता. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी या प्रक्रियेत सुधारणा करूत सर्व सक्षम प्राधिकरणांना एकाच छत्राखाली आणले. त्यामुळे पात्रता यादीसाठी लागणारा विलंब कमी झाला. त्यासाठी कालमर्यादाही आखून देण्यात आली. याशिवाय रखडलेल्या भाड्याच्या वसुलीसाठी २१० क्रमांकाचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार दोन वर्षांचे आगावू भाडे आणि पुढील वर्षासाठी धनादेश दिल्याशिवाय झोपु योजनेचे काम सुरु करण्यावर निर्बध आणले गेले. त्याचा परिणाम होऊन झोपडीवासीयांचे रखडलेले भाड्याची वसुली मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत भाड्यापोटी ७०० कोटी रुपये प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत. प्राधिकरणाकडून संबंधित झोपडीवासीयांना भाड्याचे परस्पर वितरण केले जात आहे. नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी संकेतस्थळावरच भाडे न मिळाल्याबाबत तक्रारी करण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे झोपडीवासीयाला संकेतस्थळाद्वारे भाड्याच्या तक्रारी करता येऊ लागल्या. या तक्रारींचा दररोज मुख्य कार्यकारी अधिकारी वा सचिवांमार्फत आढावा घेतला जात असल्यामुळे उपनिबंधक विभागाला या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करून त्याबाबतचा अहवाला संकेतस्थळावरच उपलब्ध करून देणे बंधनकारक झाले आहे. याचा परिणाम म्हणजे भाडेविषयक तक्रारी कमी होऊ लागल्या आहेत. आता नवी योजना सुरु करण्यापूर्वीच विकासकाला दोन वर्षांचे आगावू भाडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिवाय सदनिका हस्तांतरणही आता ऑनलाईन करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करून आवश्यक ते शुल्क अदा केल्यानंतर ऑनलाईनच हस्तांतरण करण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे हस्तांतरणासाठी दलालांकडून सहन करावा लागणारा त्रास कमी झाला आहे. ही सर्व प्रक्रिया ज्यांना ऑनलाईन करता येत नाही त्यांच्यासाठी प्राधिकरणातच मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राद्वारे संबंधितांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय २२८ योजना विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पूर्ण करून घेऊन त्याद्वारे येत्या तीन वर्षांत दोन लाख झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यापैकी घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय म्हाडा व पालिकेमार्फतही काही योजना कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली आहे.

कळवा-मुंब्रामध्ये वाढलेले मतदान महाविकास आघाडीला अनुकूल

ठाणे : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघात मतदानाची वाढलेली टक्केवारी ही महायुतीच्याच पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. या मतदार संघात गेल्या 15 वर्षात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकासकामांमुळे कळव्यातील बहुतांश मतदारांचा कल मतदानापूर्वीसुद्धा महाविकास आघाडीकडेच होता. त्यामुळे मतदानात देखील हा कल उतरण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे लोकसभेतील भाजपने मुस्लिम विरोधातील घेतलेली भूमिका, रामगिरी महाराजांचे वक्तव्य आणि मुस्लिम चेहरा असूनही मात्र महायुतीचा चेहरा म्हणून मुंब्रामध्ये नजीब मुल्लांना किती मतदारांनी पसंती दिली हे मुद्दे देखील या मतदारसंघात प्रभावी ठरले आहेत. ठाणे महागनरपालिका क्षेत्रात असलेला परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडत नसलेला मतदारसंघ म्हणजे कळवा-मुंब्रा मतदारसंघ. 2009 पूर्वी हा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघात मोडत होता. तेव्हा गणेश नाईक यांनी बरीच वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु, 2009 ला मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने कळवा-मुंब्रा नवा मतदारसंघ निर्माण झाला आणि तेव्हापासून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा मतदारसंघ आहे. आधी गणेश नाईक आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी निवडणूक पाहायला मिळाली. संपूर्ण कळवा पश्चिम, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. भूमिपुत्र आगरी-कोळी बांधव आणि मुस्लिम समाज असे मिश्र मतदार येथे राहतात. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. गेल्या पंधरा वर्षांत जितेंद्र आव्हाडांनी येथे खूप कामे केली आहेत. म्हणून मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडून आले होते. महायुतीकडून मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. तसेच घड्याळ चिन्हावरच येथे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हाचा फटका पडू नये यासाठी महाविकास आघाडीकडून पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. केलेल्या विकासकामांमुळे पारसिक, खारेगाव, कळवा परिसरात मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे दिसून आला. तर मुंब्य्रात लोकसभेतील भाजपची मुस्लिम विरोधातील भूमिका, मुस्लिम असूनही महायुती म्हणून नजीब मुल्ला यांचा असलेला चेहरा, रामगिरी महाराजांचे वक्तव्य आणि पारंपरिक मुस्लिम मतदार हा महाविकास आघाडीच्या आणि पर्यायाने जितेंद्र आव्हाड यांच्याच बाजूने राहण्याची जास्त शक्यता असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीला अनुकूल होण्याची शकतात आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड 1 लाख 9 हजार 283 मतानी जिंकले होते. तर, शिवसेनेच्या दीपाली सय्यद 33 हजार 644 मतांनी आणि आम आदमी पक्षाचे अबू फैजी यांना 30 हजार 520 मते मिळाली आहेत. नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात या निवडणुकीच्या काळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नजीब मुल्ला यांच्यासाठी या मतदार संघात प्रचारसभा घेतली. मुंब्य्रात 65 टक्के मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने होण्याची शक्यता असा अंदाज या मतदार संघातील जाणकारांचा आहे. त्यामुळे मुस्लिम बहुल मतदार संघ असलेला मुंब्रा कळवा मुस्लिम समाजातील उमेदवाराला संधी देतात की पारंपरिक आमदाराला पुन्हा निवडून आणतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सिव्हील रुग्णालयात बालकांसाठी आरोग्यदायी खाऊचा कोपरा !

ठाणे : लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाऊ घालून पालक वर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळत असला तरी ठाणे सिव्हील रुग्णालयात येणार्‍या बालकांसाठी खाऊचा कोपरा ही नाविण्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली आहे. रुग्णालयातील छोट्या जागेत मुलांना पोष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून, विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस त्यासोबत फळे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे, भुलतज्ञ डॉ. प्रियांका महंगाडे, डॉ. अर्चना पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, डॉ गोपणपल्लिकर, विनोद जोशी, अधिसेविका प्रतिभा बर्डे आदी उपस्थित होते. खाऊचा कोपर्‍यात काय असणार रुग्णालयातील वॉर्डच्या एका कोपर्‍यात सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला आहे. मुलांना त्याच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाणे शक्य होईल. खाऊच्या कोपर्‍यात विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस भरले व त्यासोबत फळेही ठेवण्यात येणार आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतो. काहीवेळा या रुग्णांबरोबर छोटी मुलं देखील असतात. या लहान मुलांना भूक लागलीच तर बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊ घातले जातात. मात्र असे खाद्य पदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबवली असल्याची माहिती आहार तज्ज्ञ डॉ.शीतल नागरे यांनी दिले. रुग्णालयात फिरताना अनेकदा लाहान मुलांच्या हातात वडापाव, चायनीज किंवा अस काही तरी खाताना दिसून आली. यावेळी राऊंड घेताना रुग्णालयाच्या आहार तज्ञ डॉ शितल नागरे यांच्या लक्षात आले व जेवणा व्यतिरिक्त मुलांना पौष्टिक आहार मधल्या वेळेत खाऊच्या कोपरा माध्यमातुन देता येईल आणि ही माहिती डॉ. कैलास पवार यांना सांगताच त्यांनी खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली.

अनियमित पाणी पुरवठ्यामुळे लाडक्या बहिणींकडून संताप

डोंबिवली एमआयडीसीसह ग्रामीण पट्ट्यात पाणी टंचाई डोंबिवली : निवडणुका झाल्या…मतदान झालं…विषय संपला…आता पाण्यासाठी झगडावे आम्हालाच लागणार, अशी परिस्थिती डोंबिवली एमआयडीसीसह ग्रामीण पट्ट्यात निर्माण झाली आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पाण्याचे वितरण पुरेशा दाबाने सुरू होते. मात्र प्रचार संपून मतदान पाणी वितरणावर परिणाम झाला. सद्या पाण्याचा दाब कमी केल्याने गरजेपुरते देखिल पाणी मिळेनासे झाले आहे. परिणामी रहिवाशांत, विशेषतः गृहिणींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात रहिवाशांनी समाज माध्यमांवर आपला रोष व्यक्त करताना प्रशासनासह राजकारणी आणि लोकप्रतिनिधींचा खरपूस समाचार घेतला आहे. मतांपुरते मतलबी असल्याचा आरोप करत नेत्या/पुढाऱ्यांना जबाबदार धरले आहे. एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असते. सदर गळती थांबविण्यासाठी एमआयडीसीकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. शिवाय लाईनला छिद्रे पाडून त्याद्वारे पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यावर उपायोजना करण्यात एमआयडीसी प्रशासनाला अपयश येत आहे. निवडणुकीत सर्व राजकिय पक्षांनी पाणी पुरवठ्या संदर्भातील योजनांची अंमलबजावणी आम्ही कशी केली आणि पुढे सर्वांना मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्तता होईल तेव्हा होईल. पण आत्तापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी गृहिणींकडून करण्यात येत असल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले. निवासी आणि औद्योगिक परिसरात काही वर्षांपूर्वी मुबलक पाणी उपलब्ध असायचे. आता मात्र आमचे पाणी अन्यत्र ठिकाणी वळविले आहे का ? जर पाणी पुरवठा करण्याची क्षमता नसेल तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या महुमजली इमारतींना परवानगी देता कामा नये, याकडे मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडिक यांनी शासन/प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ००००

सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!

– सहज आठवण करून द्यावी म्हटलं, बाकी काही नाही! मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून एक्झिट पोल बाजूला ठेवत बहुमत मिळवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, नक्की काय होणार याचे उत्तर मात्र शनिवारी सकाळी दहावाजेपर्यंतच मिळणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. समविचारी पक्षांना आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांना सोबत घेण्यासाठी दोन्हीकडून फोनाफोनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या निकालानंतर काय स्थिती असेल याबाबत चांगलीच उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, निकालापूर्वीच एकमेकांना डिवचण्याचा देखील उद्योग सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचे जुने वक्तव्य समोर आणलं असून त्या वक्तव्यावरून त्यांना सहज आठवण करून द्यावी, असं म्हटलं आहे. बाकी काही नाही असे म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण ट्विट करून दिली आहे. त्यामुळे निकालापूर्वीच सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीकडून रणनीती आखण्यास सुरुवात दरम्यान, राज्यामध्ये एक्झिट पोलमध्ये बरीच संभ्रमावस्था असली तरी महायुतीला कौल दिला आहे. मात्र. यामध्ये शिंदे यांच्या अपेक्षेनुसार जागा येत नसल्याचे चित्र एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. दुसरीकडे अजित पवार गटालाही अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे. एक्झिट पोलमध्ये काही जरी असले तरी महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर तातडीने मुंबईला येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

क्रिकेटमध्ये सराव आणि सातत्य महत्वाचे – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता, सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असा संदेश आमदार संजय केळकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या ४८ वी एन.टी.केळकर स्मृती आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी सकाळी ठीक. ९.३० वाजता स्टार स्पोर्टस् क्लब आयोजीत ४८ वी एन.टी.केळकर स्मृर्ती आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगर पालिका पुरस्कृत,डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या सयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मढवी व भारत सरकार एनटीपीसी चे मा.संचालक ,टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व बाळाराम खोपकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा पासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यावेळेला  शालिग्राम टूर्नामेंट म्हणून सुरू होती. मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेअर, क्रिकेट मधील इतर दिगजनांना वाटले की ही स्पर्धा सूरु राहिली पाहिजे. येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टूर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. ४८ वर्षांपूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे.  या टूर्नामेंटचे वैशिष्ट्य असे आहे की आत्तापर्यंत साडेसातशे हुन अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे असेही केळकर म्हणाले. यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेले आहेत. नवीन खेळाडूंना आवाहन करेन की विकेटवर टिकता आले पाहिजे. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल असेही संजय केळकर म्हणाले.