Month: November 2024

मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ

 प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास मुरबाड : मुरबाड व बदलापूरकरांनी आमदार किसन कथोरे यांना अनेक संधी दिली. पण त्यांना मतदारसंघातील प्रश्न सोडविता आले नाहीत. बदलापूरातील `त्या’ घटनेनंतर तेथील मतदारांनीही किसन कथोरेंना बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे ठरविले आहे. मुरबाड मतदारसंघात परिवर्तनाची भूमिका असून, आता परिवर्तन अटळ आहे, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाड येथील संतोषी माता मंदिरासमोरील मैदानात भव्य सभा झाली. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. या वेळी लोकनेते गोटीराम पवार, कॉंग्रेसचे कर्नाटकातील आमदार इवान डिसोझा, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आप्पा घुडे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, रश्मी निमसे, कल्याण तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रवक्ते महेश चौघुले, जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआय (सेक्यूलर) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. या धोरणामुळेच मुरबाड मतदारसंघातही एमआयडीसीतील अनेक उद्योग बाहेर गेले. तर रोजगारनिर्मिती न झाल्यामुळे बेरोजगारी वाढली. मुरबाडमधील प्रश्न सोडविण्यात किसन कथोरे सपशेल अपयशी ठरले, अशी टीका करीत असतानाच जयंत पाटील यांनी आजच्या सभेच्या गर्दीने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे म्हटले. भाजपा हा संकटात आला असून, बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देऊन महाराष्ट्राला १८ व्या शतकात नेले जात आहे. पण शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी हे सहन करणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात ४८ ठिकाणी सभा घेतल्यानंतर राज्यातील जनतेने पक्षफुटीबद्दल भाजपाला शिक्षा करण्याचे ठरविले असल्याचे भाकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी घणाघाती भाषणात आमदार किसन कथोरे यांच्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड मतदारसंघातील केळेवाडी येथील रस्त्याचे काम १५ वर्षात झाले नाही. या भागाला हेतुपुरस्सर टार्गेट करण्यात आले. काळू धरणाला विरोध असल्याचे सांगून, त्यांच्या बगलबच्च्यांकडून काळू धरणक्षेत्रातील गावांमध्ये घरपट्टीच्या पावत्या घेतल्या जात आहेत. जोता नसतानाही घर दाखवून लूट केली जात आहे. मुरबाड तालुक्याचा संबंध नसलेला समृद्धी महामार्ग हा अहवालात छापला गेला. वडोदरा एक्सप्रेसवेच्या बोगद्यात जाऊन फोटो काढले गेले. खोटे बोला पण रेटून बोला, अशी त्यांची कार्यपद्धती आहे, असा आरोप सुभाष पवार यांनी केला.मुरबाड मतदारसंघातील १५ वर्षांचा आमदार निधी हा उद्यान सुशोभिकरण व बाकड्यांमध्ये खर्च झाला. १५ वर्षांपासून अरेरावी व दादागिरी सुरू असून, बघून घेण्याची भाषा केली जात आहे. तब्बल १५ वर्ष आमसभा न घेण्याचा पराक्रमही नोंदविला गेला, अशी टीका सुभाष पवार यांनी केली. जनसेवा शिक्षण मंडळाला आपण तीन लाख रुपयांची अनामत रक्कम दिली असताना, माझ्याविरोधात संस्थेकडून पैसे घेतल्याचा खोटा प्रचार केला. त्यांना संस्थेचा कारभार माहिती नाही, असा टोला सुभाष पवार यांनी मारला. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही सेम नावाचा उमेदवार उभा केला गेला. मात्र, आताची निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. जनतेसह कार्यकर्त्यांनीही परिवर्तनासाठी लढाई सुरू केली आहे. त्यामुळे परिवर्तन नक्कीच होईल, असा विश्वास सुभाष पवार यांनी व्यक्त केला. चौकट `सरकारचे शेवटचे पाच दिवस राहिलेत’ बदलापूर शहरासह मुरबाड मतदारसंघात बड्या माफियांच्या माध्यमातून दमबाजी करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी निष्पक्ष व समान भूमिका घ्यावी, असे आवाहन करतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांना आता या सरकारचे पाच दिवस राहिले आहेत, असा हसत हसत इशारा दिला.

मुलुंडमध्ये सर्वाधिक गृहमतदान नोंदणी

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघामध्ये गृहमतदानाला सर्वाधिक पसंती मुलुंड विधानसभा मतदारसंघात मिळाली असून येथे तबल ४९८ अर्ज आले होते. या अर्जांपैकी गुरुवारपर्यंत २३६ मतदारांची गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासंदर्भात स्थानिक आमदार आणि मुलुंडचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा म्हणाले की, दिलेल्या कालावधीत उपनगरामध्ये सर्वाधिक गृहमतदानाचे नोंदणी माझ्या मलुंड या मतदारसंघातून झाली आहे. आमच्या भाजपच्या चमूचे हे सर्वस्वी यश आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गृहमतदानासंबंधी येथील ज्येष्ठ मतदारांमध्ये जागृती केली होती, त्याचा हा परिणाम आहे, असे कोटेचा म्हणाले. गुरुवारपर्यंत मुलुंडमध्ये २३६ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी गृह मतदान प्रक्रिया पूर्ण केली होती. गृहमतदानाचा कालावधी १३ ते १६ नोव्हेंबर, २०२४ असा आहे. मुलुंडमधील ४९८ गृहमतदारांमध्ये ४७४ ज्येष्ठ मतदार असून २४ दिव्यांग मतदार आहेत. मुलुंडनंतर दुसऱ्या करमांची गृह मतदानाची नोंदणी वांद्रे (पश्चिम) मतदारसंघात झाली असून ती ४९५ आहे. उपगरांमध्ये एकुण ४३४९ नागरिकांनी गृहमतदानाची नोंदणी गेली होती. गुरुवापरपर्यंत ३५३३ गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ८५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक, दिव्यांग मतदार कोविड संसर्ग रुग्ण आणि अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांना गृह मतदानाचा लाभ घेता येतो. मुलुंडने गृह मतदानासाठीच्या नोंदणीत अव्वल स्थान प्राप्त केले आहेच. गृहमतदानाच्या संख्येतही मुलुंड मतदारसंघ उपनगर जिल्ह्यात अव्वल राहील, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मुलुंडचे आमदार व भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी‘ रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

मतदान केंद्र, परिसर, रस्ते, पदपथ यांच्या स्वच्छतेला प्राधान्य

 कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम   ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि त्याच्या परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत, शनिवारी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रे, १०० मीटरचा परिसर, नजिकची सार्वजनिक शौचालये, पदपथ, मतदान केंद्राकडे येणारे रस्ते, चौक, दुभाजक यांची साफसफाई करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी कळवा येथील मतदान केंद्र परिसरात साफसफाई केली. तसेच, यावेळी मतदान करणे आणि स्वच्छता राखणे याची शपथही घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी, प्रभाग समिती मधील स्वच्छता निरीक्षक यांनी या सफाई मोहिमेत सहभाग घेतला. एकूण ३६७ ठिकाणी १५२८ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी १३९० कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. उद्या, रविवार, १७ नोव्हेंबर रोजी मानपाडा-माजिवडा, वर्तकनगर, उथळसर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. तर, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी नौपाडा-कोपरी, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर- सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. 00000

वाघबीळ येथील उबाठा गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत विकासकार्याचा डोंगर मतदारसंघात उभा केला आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात  आमदार प्रताप सरनाईक यांच्या विकासकामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन, मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. आतापर्यंत उबाठा गटाचे, काँग्रेस व इतर अनेक पक्षाचे पदाधिकारी, शेकडो कायकर्ते यांनी गेल्या काही दिवसात शिवसेनेत प्रवेश केला असून त्यामुळे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कामगिरीवर विश्वास ठेऊन वाघबीळ येथील उबाठा गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून पाठिंबा दर्शविला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्यावर असलेला विश्वास दाखवून शिवसेना पक्षात  पक्षप्रवेश होत असल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची ताकद अजून बळकट होत आहे, याचा मला आनंद आहे असे  प्रताप सरनाईक म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक संजय तांडेल, ओवळा-माजिवडा विधानसभा समनव्यक साजन कासार, विभागप्रमुख रवी घरत, शिवसैनिक मंगेश शिंगे उपस्थित होते.

आघाडी बनवुन महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा-जे.पी.नड्डा

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धरतीवर अवतरला आहे. तर, विरोधक आघाडी बनवुन सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करीत आहेत. तेव्हा, येत्या २० तारीखला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बसवावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जगतप्रकाश (जे.पी.) नड्डा यांनी केले. ठाण्यातील एम.एच. हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी.नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्चशिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा- माजिवडयाचे उमेदवार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार ॲड. निरंजन डावखरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, रिपाई (आ) भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुनानक जयंतीचे औचित्य साधुन जे.पी.नड्डा यांनी ठाण्यातील गुरुदवारामध्ये दर्शन घेतले. त्यानंतर विशेष सभेला उपस्थिती दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. आधी राजकारण म्हटले की घराणेशाही, तुष्टीकरण होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालुन राजकारणाची परिभाषा बदलुन टाकली आहे. या आधी नेहरूंनी तीन वेळा विजय मिळवला तेव्हा, विरोधक कमजोर होते. पण नरेंद्र मोदींनी मजबुत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आल्याचे सांगून जे.पी.नड्डा यांनी, हे तुष्टीकरणाचे राजकारण करून समाजासमाजात फूट पाडतात. याऊलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशानाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात…जग आमच्या असहमतीचाही आदर करत आहे. भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलला आहे.तर दुसरीकडे विरोधक एनडीएचा व मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचे नड्डा म्हणाले. देशातील आणि राज्यातील विकास कामे आणि विविध योजनांचा उहापोह करून नड्डा यांनी, करोडो युवांचा हा भारत देश आहे. सबका साथ सबका विकास करीत असताना पदपथावरील प्रत्येक गरीबासाठी राहण्याची भोजण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिनच्या सरकारमुळे विकास धरतीवर उतरला आहे. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो ते अटल सेतु असे सर्वच प्रकल्प त्यांनी रोखले. लाडकी बहिण योजने विरोधातही ते न्यायालयात गेले. ही मंडळी आघाडी म्हणवतात आणि पिछाडीचे काम करतात. म्हणुन २० नोव्हे. ला यांना रोखण्याचे काम करून घरी बसवा. असे आवाहन नड्डा यांनी केले. ००००

नजीब मुल्ला यांना निवडून दिल्यास मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईन – उपमुख्यमंत्री अजित पवार

अनिल ठाणेकर ठाणे : १५ वर्षे एकाला संधी दिलीत त्याने वीज चोरी केली आता पाच वर्पे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या, मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईल, हा माझा वादा आहे, टोरन्ट मुक्त व ड्रग्ज मुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखवणार, हे माझे वचन आहे, अशी जाहीर घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केली. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ मेक कंपनी समोरील पटांगणात, मुंब्रा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसत होती..यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, डाॅ अलतमाज फैजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, डाॅ मुमताज शहा, माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, वहिदा खान, नासिर खान, नजिमुद्दीन मलिक, मुख्तार अन्सारी, मोहसीन शेख, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किणे, राजा सूर्यवंशी, नसीम खान, सिजर सोनी, विष्णू भगत, मयुर सारंग, ऐय्याज हसन,स्मीता खैरे, नाजीया तांबोळी, नंदा शिंदे, माया कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते. शिवफुलेशाहूआंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस आहे.यामुळेच विधानसभा निवडणुकीत १० टक्के मुस्लिम उमेदवारांना संधी दिली.मागील एका वर्षात अनेक निर्णय झाले. यात राज्यातील अल्पसंख्याक समाज वंचित राहू नये म्हणून मार्टी ची स्थापना केली आहे.संभाजी नगर येथे अल्पसंख्यांक आयुक्तालय उभारले आहे.अल्पसंख्याक समाजातील मुलांनी अधिकचे शिक्षण घ्यावे  यासाठी प्रत्येक मुलाला परदेशी शिक्षणाकरीता ५ लाखावरुन ३० लाख शिष्यवृत्ती दिली आहे. वक्फ बोर्ड च्या कार्यालयाची संख्या वाढवण्यासाठी जागेचे प्रावधान करत आहे. मागील ३ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे व मी मिळून कळवा मुंब्रा मतदासंघांच्या विकासासाठी २०० कोटीचा चा निधी दिला. १५ वर्षे एकाला संधी दिलीत त्याने वीज चोरी केली आता पाच वर्पे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या, घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा मी मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईल,  हा माझा वादा आहे, तसेच टोरन्ट मुक्त न ड्रग्ज मुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखविन, हे माझे वचन आहे, घड्याळला मत म्हणजे राज्याच्या विकासाला मत असे सांगत मी वचन देतो ते पूर्ण करतो, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 0000

नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार-संदीप पाटील

पनवेल : पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेल मधून मताधिक्य देवून बहुमताने निवडून आणणार असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सेक्टर १८ मधील सिडको विनायक  मंदिरातील श्री गणेशाचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली.  यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी बोलताना सांगितले कि, पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर विजयी होणे गरजेचे आहे. तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे आत्ता या योजनेचे पैसे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे गतीमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा असेही त्यांनी यावेळी सांगितले. पनवेल विधानसभा मतदार संघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, जगदीश घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, अॅड. चंद्रकांत मढवी,  गंगाधर भगत, महेश तांडेल, मयूर कदम, गिरीश खरिवले, पप्पू साळवी, अमोल भगत, पप्पू वाघमारे,  आदी उपस्थित होते. 00000

नितीन गडकरी यांची आज ठाण्यात सभा

ठाणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ठाण्यातील गावदेवी मैदानावर रविवारी  सायंकाळी ६ वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्ताने ठाणेकरांना शहराच्या विकासाचे व्हिजन ऐकावयास मिळेल. भाजपाचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केळकर यांच्यासह कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवडा मतदारसंघातील प्रताप सरनाईक, मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा होत आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. या सभेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, आरपीआयचे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे,यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांबरोबरच महायुतीचे  कार्यकर्तेही उपस्थित राहतील. या सभेसाठी महायुतीकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे. 0000