Month: November 2024

ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरपीएफने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमे’ अंतर्गत एकूण ४१४ मुलांनं त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आहे. या मुलांमध्ये ३०६ मुले आणि १०८ मुलींचा समावेश आहे. देशभरातील अनेक मुला- मुलींना शहराचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ४१४ मुलांची सुटका करून त्यांची घरवापसी केली. या मुलांना सुरक्षित घरी पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि चाइल्डलाइन केंद्र समन्वयक एकत्रितपणे काम करत असून हरवलेल्या मुलांचे संगोपन, त्यांच्या आई-वडिलांचा शोध, त्यांचे समुपदेशन, त्यांचे जेवण सर्व गोष्टींची काळजी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. ००००

डोंबिवलीत फडके रोडवरील वाहन कोंडीने प्रवासी त्रस्त

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके रस्त्यावर दररोज संध्याकाळी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. अनेक वाहन चालक फडके रोडवर वाहने उभी करून खरेदीसाठी बाजीप्रभू चौक, नेहरू रोड भागात खरेदीसाठी जातात. फडके रोड हा एक दिशा मार्ग असताना उलट दिशेने या रस्त्यावरून वाहने धावतात. त्यामुळे दिवसेंदिवस दररोज संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर वाहन कोंडी होते. बापूसाहेब फडके रस्त्यावर जवाहिर, गृहपयोगी वस्तू, वस्त्रप्रावरणे अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. हाॅटेल्स या रस्त्यावर आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने दुकानासमोर उभी करून ठेवतात. या जागेत अगोदरच दुकान मालकांची वाहने उभी असतात. हाॅटेल्ससमोर घरपोच खाद्यपदार्थ पुरवठादार वितरकांची दुचाकी वाहने घोळक्याने उभी असतात. फडके रोड गणपती मंदिर, टिळक रस्त्याने येऊन डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला आहे. या एक दिशा मार्गावर रेल्वे स्थानकाकडून येणारी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने घुसखोरी करतात. या रस्त्यावर कोंडी करतात. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर फडके रोडवर नवी मुंबई, ठाणे परिसरातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी वाहने येतात. केडीएमटीच्या बस याच रस्त्यावरून धावतात. या रस्त्याच्या दुतर्फा फळ, भाजीविक्रेते बसलेले असतात. पदपथांवर दुकानदारांनी आपल्या वस्तू ठेऊन पदपथ अडविलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना फडके रस्त्यावरून चालताना वाट काढत जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत नोकरदार वर्ग घरी परतत असतो. त्यांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकाकडून, के. बी. वीरा शाळेकडून येणारे बहुतांशी वाहन चालक फडके रोडवरील एक दिशा मार्गिकेचे उल्लंघन करून वाहने चालवितात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. नेहरू रस्ता, के. बी. वीरा शाळा आणि बाजीप्रभू चौकाकडून गणेश मंदिराकडे जाणारी उलट दिशेची वाहने रोखण्यासाठी वाहतूक विभागाने फडके रस्त्यावर अंबिका हाॅटेल भागात संध्याकाळच्या वेळेत एक वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत. केडीएमटीच्या बस संध्याकाळी टिळक रस्त्याने फडके रस्त्यावरून बाजीप्रभू चौक भागात जातात. मदन ठाकरे चौकात या बसना वळण घेताना रस्त्यावरील दुचाकी, फेरीवाल्यांचा अडथळा येतो. अनेक वेळा बस या चौकात अडकून पडतात. वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे. वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, डोंबिवली शहरात वाहन कोंडी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन केले आहे. रस्त्यावर नियमबाह्य उभी केलेली वाहने टोईंग व्हॅनच्या माध्यमातून उचलली जातात. फडके रोडवरील वाहनांनावर नियमित कारवाई केली जाते. कोट डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. पादचाऱ्यांना रस्ते, पदपथ मोकळे राहतील यादृष्टीने फेरीवाले नियंत्रण पथक कारवाई करते. फडके रोडवर पालिका आणि वाहतूक विभागाची संयुक्त मोहीम राबविण्याचा विचार आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

मतदान बंद झाल्यानंतर मतटक्केवारीत वाढ होते कशी?

जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न ठाणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही, असे सांगत राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. तसेच मतदान बंद झाल्यानंतर म्हणजेच सायंकाळी ६ ते ११ यावेळेत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी आणि वाढीव मतदान येते कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी कळवा येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१४ पासूनच मी मतदान यंत्राच्या धोक्याबाबत बोलत आहे. आताही आमच्या लोकांना मी हेच सांगत होतो की, छोटी राज्य देतील आणि मोठी राज्य ताब्यात घेतील. त्याकडे आमच्या लोकांचे दुर्लक्ष झाल्याचे आव्हाड म्हणाले. मतदान यंत्र हे मानव निर्मित असल्यामुळे त्यात बदल करणे शक्य आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये मतदानाचा आकडा लगेचच उपलब्ध होतो. तरीही मतदानाची आकडेवारी देण्यास उशीर कसा काय होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत राज्यात तब्बल ७६ लाख मते वाढली असल्याचा दावाही त्यांनी केली. जास्तीत जास्त दिड ते दोन टक्के मतदान सहा नंतर वाढू शकते. मात्र काही जिल्ह्यात तब्बल १० टक्यापर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी, वाढीव मतदान येते कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते जवळपास एकसारखीच मिळाली असून एखाद्या पॅर्टनशिवाय हे शक्यच नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. नांदेडमध्ये लोकसभेची जागा आम्ही जिंकतो आणि विधानसभेच्या सहा जागांवर पराभव होतो. असे वेगळे निकाल एकाच जिल्ह्यात कसे लागू शकतात, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही. प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणुकींचे निकाल द्यायचे असतील तर संविधान आणि लोकशाहीचा काय उपयोग आहे. अशाने लोकशाही संपुष्टात येईल आणि भारताचा रशिया होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. उतरत्या वयात शरद पवार यांना आत्मक्लेश होईल अशा पद्धतीने एकटे पाडले जात आहे. मातोश्रीबाबतही तीच रणनीती आखली जात असल्याचे ते म्हणाले.

गायमुख घाट रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा –  सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत. घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी  महापालिकेसह विविध यंत्रणा, जस्टीस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दूचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात, भविष्यात कॉंक्रिटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही. त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, असे आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितले.घाट रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा कार्यादेश तयार असून वन विभागाच्या मान्यतेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. डिसेंबरअखेरपर्यंत ही परवानगी मिळाल्यास जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.कापूरबावडी आणि कॅडबरी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर, कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात त्यावर बोलणी सुरू असून तेही काम लवकरच पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले.घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, मेट्रो आदी यंत्रणा दक्ष आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने बऱ्याच समस्या दूर झाल्या आहेत. चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया बैठकीच्या सुरुवातीला जस्टीस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपायुक्त मनीष जोशी, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुंभागी केसवानी, घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम, वृक्ष अधिकारी केदार पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांच्या सहाय्यासाठी नेमण्यात आलेले वॉर्डन आणि बस चालक यांचे सध्या रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले. आवश्यकता असल्यास आणखी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वॉर्डनना काही ठिकाणी त्रास दिला जातो, वाहन चालक त्यांचे ऐकत नाहीत, अशी निरिक्षणे नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली.स्थानिक अवजड वाहने, मुंबईकडून येणारी अवजड वाहने यांची वर्दळ बंदीच्या काळातही सुरू असते. तसेच, बाहेरील वाहने रोखून ठेवण्यावरही मर्यादा येत असल्याने या अवजड वाहनांबाबत कोणती व्यवस्था करायची यावर वाहतूक पोलीस विचार करत असल्याची माहिती उपायुक्त शिरसाठ यांनी दिली. आनंद नगर सिग्नल येथे एकूण ११ ठिकाणी रस्ते ओलांडले जातात. त्यामुळे सिग्नल असूनही वाहतूक संचलन नीट होत नाही. त्याकरता सिग्नलची जागा बदलावी अशी सूचना नागरिकांच्या वतीने करण्यात आली. त्यासंदर्भात, पालिकेचा विद्युत विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तोडगा काढावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी केले. रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या बेवारस वाहनांची मोठी समस्या घोडबंदर परिसरात आहे. त्यावर उपाय करण्यासाठी महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही वाहने हटविण्यात यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद

गळणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात पाणी पुरवठ्यातील समस्यांवरून निवडणुकीआधी बराच गदारोळ उडाल्यामुळे आचारसंहिता संपताच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पाणी वितरणाशी संबंधित विविध कामे शनिवारी करण्यात येणार असून त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नाशिक स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणी पुरवठा वितरण विभाग यांच्यातर्फे विविध जलशुध्दीकरण केंद्र आणि सहायक केंद्रांवर प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे यासह इतर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रात उच्चदाब खांब स्थलांतरीत करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात प्रवाह मीटर बसविणे, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे, शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या शिवाय सहायक जलशुध्दीकरण केंद्रात याच स्वरुपाची कामे केली जातील. सातपूर विभागातील मुख्य वाहिनीवर व्हॉल्व्ह आणि पाणी मापक मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्रमांक नऊमधील कार्बन नाका येथील वाहिनीची गळती थांबविणे, प्रभाग १० मधील अशोकनगर येथे गळती लागलेल्या ९०० मिलिमीटर वाहिनीची दुरुस्ती, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील जलवाहिनीची दुरुस्ती, पाथर्डी फाटा येथील व्हॉल्व्ह दुरुस्ती, कशिश हॉटेलजवळील जलवाहिनीवरील व्हॉल्व्हची गळती बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर कुंभाच्या वाहिनीवरील गळती बंद करणे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत वासन नगर, राणेनगर, पाथर्डी फाटा येथील जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविणे व तत्सम कामे केली जातील. नाशिकरोड विभागातील उपनगर येथील संजय गांधी नगर वाहिनीतील गळती आणि पवारवाडी जलकुंभ भरणाऱ्या वाहिनीची जेलरोड सिग्नलजवळ गळती बंद करण्याची कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन व्यापक स्वरुपातील कामांमुळे शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत शहरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाहूी. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. शनिवारी दिवसभर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 000

शहापूरमध्ये बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील गावांमध्ये सौरकुंपण,

शहापूर वनविभागाचा पथदर्शी प्रकल्प कल्याण : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याचा अधिकप्रमाणात वावर असलेल्या एकांतांंमधील घरांमधील कुटुंबीय, पशुधन यांना बिबट्यापासून धोका आहे. अशा संवेदनशील एकांतात असलेल्या शेतशिवार, माळरानांवरील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने तयार केला आहे. शासन मंजुरीच्या आवश्यक त्या पूर्तता झाल्यावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, माळेशज, कसारा घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. जंगलात लाकूडफाटा, वनोपज गोळा करणे, शेतकरी, गायी, शेळ्यांच्या गोरक्षकांवर यापूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्या आणि मानवी वस्तीमधील हा संघर्ष वाढत चालला आहे. भक्ष्य शोधण्यासाठी अनेक वेळा रात्रीच्या वेळेत बिबटे गाव हद्दीतील गोठ्यांमध्ये येऊन पशुधन, भटक्या श्वानांवर हल्ले करतात. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी मनुष्य, पशुधन हानी रोखण्यासाठी शहापूर वन विभागाने शहापूर तालुक्यातील बिबट्यांचा वावर, चलत मार्ग असलेल्या काही गावांंमधील एकांतात असलेली घरे निश्चित केली आहेत. बिबट्याचा वावरामुळे या घरांचा परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे. अशा एकांत वस्तीत बिबट्याने शिरकाव केला तर त्याला वेळीच सुरक्षितपणे, कोणत्याही प्रकारचा त्रास न होता अटकाव व्हावा या उद्देशातून वन विभागाने संवेदनशील घरांंभोवती सौरकुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वन विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. सौरकुंपण प्रस्ताव सौरकुंपण प्रस्तावाप्रमाणे एक एकर शेती परिसरात घर, गुरांचा गोठा असेल तर त्याला संरक्षित करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. या निधीतील ७५ टक्के रक्कम शासकीय अनुदानातून शेतकऱ्याला दिली जाईल. उर्वरित २५ टक्के रक्कम शेतकऱ्याने स्वता उभारून हा प्रकल्प आकाराला आणायचा आहे. या प्रकल्पासाठी देखभाल दुरुस्तीसाठी नियमितचा खर्चही असणार नाही. बिबट्याचा वावर असलेल्या एकांतामधील घर, गोठ्याला कुंपण घातले जाईल. त्या कुंपणाच्या आतील भागात सौरपट्ट्या बसविल्या जातील. सौरपट्यांमधून तयार होणारी सौर वीज विजेरीमधून (बॅटरी) कुंपणात सोडण्यात येईल. अचानक दिवसा, रात्री अन्य वन्यजीव किंवा बिबट्या एकांतामधील घर परिसरात भक्ष्यासाठी आला. त्याचा स्पर्श सौरकुंपणाला झाला की वन्यजीव किंवा बिबट्याला शाॅक बसेल आणि त्याचवेळी सौर यंत्रणेवर चालणारा भोंगा वाजण्यास सुरुवात होईल. शाॅक बसल्याने बिबट्या पळून जाईल आणि भोंग्यामुळे शेतकरी जागा होईल. या प्रकल्पामुळे बिबट्या पण सुरक्षित आणि शेतकऱ्याचे कुटुंब, पशुधन एकांतात असले तरी सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे, असे वनाधिकाऱ्याने सांगितले. या पथदर्शी प्रकल्पामुळे बिबट्या किंवा वन्यजीवांस कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही. त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होणार नाही याची विशेष काळजी या प्रकल्पात घेण्यात आली आहे. अलीकडे एकांतामधील घर परिसरात लोखंडी जाळीचे कुंपण करण्यासाठी दोन ते अडीच लाख खर्च येतो. त्याच जागी सौरउर्जेच्या माध्यमातून सौर कुंंपण उभारण्याचा प्रयत्न केला तर शासकीय आर्थिक साहाय्याने तीस हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे बिबट्या, मानवातील संघर्ष थांबविण्यासाठी राबविण्यात येणारा शहापूर वनविभागाचा हा प्रस्ताव आदर्शवत ठरण्याची शक्यता आहे.  

photo-6 ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनंसपर्क) उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

डोंबिवलीत कोपरमधील बेकायदा बांधकामावर कारवाई

डोंबिवली : येथील पश्चिमेतील कोपर गाव हद्दीतील चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील बाजूस दोन महिन्यांपासून काही बांधकामधारक कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, रस्ता अडवून एका बेकायदा बांधकामाची उभारणी करत होते. यासंदर्भात तक्रारदाराने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशावरून बुधवारपासून ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सुरू केली. डोंबिवली पश्चिमेत चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागे अधिकृत कृष्णा संकुलाच्या बाजुला तीन महिन्यांपासून बांधकामधारकांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता, एका बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली होती. या बेकायदा इमारतीच्या तक्रारी तक्रारदार विनोद जोशी यांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधुत तावडे, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केल्या होत्या. आयुक्त डॉ. जाखड यांनी विहित कार्यवाही करून हे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी या बांधकामाच्या विकासकांना तातडीने बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणि अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त झाल्याने या बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिका अधिकाऱ्यांना शक्य झाले नव्हते. पालिकेचा स्थगिती आदेश असताना बांधकामधारकांनी इमारतीचे काम सुरूच ठेवले असल्याची माहिती तक्रारदार जोशी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिली होती. निवडणूक संपताच तक्रारदार जोशी यांनी पुन्हा अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त तावडे यांची भेट घेऊन कोपर येथील बेकायदा इमारतीवर कारवाईची मागणी केली. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी तातडीने कोपरचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. आयुक्त, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त सावंत यांनी बुधवारपासून तळ अधिक एक मजल्याची नव्याने उभी राहत असलेली बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले. अतिक्रमण, फेरीवाला नियंत्रण पथकाचे कामगार, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सुरू करण्यात आली. बुधवारी या बेकायदा इमारतीचा काही भाग तोडल्यानंतर गुरुवारीही इमारतीचा उर्वरित भाग तोडण्याची मोहीम साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सुरू ठेवली आहे. या इमारतीवर थातुरमातूर कारवाई न करता, ही इमारत भुईसपाट करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार जोशी यांनी केली आहे. कोट कोपर येथील चरू बामा म्हात्रे शाळेमागील नव्याने उभी राहत असलेली एक बेकायदा इमारत तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू केले आहे. या बांधकामाला यापूर्वीच स्थगितीचे आदेश दिले होते. आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून ही इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर देयकांचा भरणा करता यावा म्हणून पालिका प्रशासनाने १ डिसेंबरपासून पालिकेची दहा प्रभाग हद्दीतील नागरी सुविधा केंद्रे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेसारखी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका हद्दीतील बहुतांशी करदाता हा नोकरदार, व्यावसायिक आहे. त्यांना कामाच्या दिवशी पालिकेत येऊन मालमत्ता कर भरता येत नाही. त्यामुळे नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक करदात्यांचा विचार करून प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके मालमत्ता करधारकांना पालिकेकडून वितरित करण्यात आली आहेत. मालमत्ता कराची चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीची कराची रक्कम ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी पालिकेत भरल्यास चार टक्के आणि ऑनलाईन भरणा केल्यास दोन टक्के सवलत देण्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे. ज्या मालमत्ता करधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेले नाही. त्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कर भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर पालिकेकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. मालमत्ता कराच्या थकित रकमेवर दोन टक्के रकमेची दंडात्मक कारवाई करणे, इमारत, चाळी, आस्थापनेला असलेल्या नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. एवढ्या कारवाया करूनही थकबाकीदार मालमत्ता कर भरणा करत नसेल तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. विहित प्रक्रिया पार पाडून त्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. या दंडात्मक कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी मुदतपूर्व मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. मालमत्ता कराच्या देयकावरील क्युआर कोड स्कॅन करून, पालिकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही नागरिक मालमत्ता कर भरणा करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.