Month: November 2024

आमदार निकोले यांचा गाठीभेटीवर भर योगेंद्र यादव, अशोक ढवळे, उल्का महाजनांच्या सभा

विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केल्याची टीका   योगेश चांदेकर पालघरः डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी आपल्या मतदारसंघातील गाव व पाड्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन प्रचार मोहीम राबवण्यावर भर दिला…

राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा – २०२४ सुर्या थात्तु, पूजा दानोले महाराष्ट्र संघाचे कर्णधार

चेन्नई : तामिळनाडू येथे १५ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान ७६वी सिनीअर, ५८ज्युनिअर आणि ३९वी सब ज्युनीअर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या महराष्ट्र संघाच्या…

 महापालिकेतून थेट आमदारकीचे वेध

 नाशिकचे अकरा माजी नगरसेवक उतरले रिंगणात   हरिभाऊ लाखे नाशिक : राज्याच्या जाण्यासाठी विधिमंडळात महापालिकेतील नगरसेवकपद ही पहिली पायरी समजली जाते. त्यामुळे ही पायरी उत्तीर्ण झालेले अनेक नगरसेवक सध्या आमदारकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापालिका हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांमध्येही आमदार होण्यासाठी स्पर्धा आहे. शहरातील चारही मतदारसंघाचे विधिमंडळात नेतृत्व करणाऱ्या आमदारांचा राजकीय प्रवास ‘व्हाया नगरसेवक आमदार असा राहिला आहे. त्यामुळे आताही चार मतदारसंघांत तब्बल अकरा माजी नगरसेवक आमदारकीसाठी आपले नशीब आजमावत आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघांसह देवळाली मतदारसंघाचा अर्धा भाग येतो. त्यामुळे या तीनही मतदारसंघांवर शहरी प्रभाव आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून रोजगारासाठी स्थायिक झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघांसाठी होणाऱ्या बहुतांश आमदारांचा प्रवास हा व्हाया नगरपालिका, महापालिका असा झालेला आहे. नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द गाजवल्यानंतर आणि लोकांशी संपर्क वाढल्यानंतर थेट आमदारकीवरच दावा केला जातो. महापालिकेचा प्रभाग मोठा असल्यामुळे येथून जनसंपर्क वाढवून पदाधिकारी आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात पोहचतात. चार सदस्यीय प्रभाग हा मिनी विधानसभेचाच मतदारसंघ होतो. त्यामुळे विधानसभेत जाण्यासाठी नगरसेवक ही आता पहिली पायरी बनली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, प्रचाराला जोर आला आहे. येत्या २० तारखेला मतदान होत असून, त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यंदा या चार मतदारसंघांमध्ये पालिकेत काम केलेले नगरसेवकच प्रचारात दिसत आहेत. शहरातील चारही मतदारसंघांमध्ये दहा माजी नगरसेवक आमदार होण्यासाठी प्रचारात फिरत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील लढती चुरशीच्या बनल्या आहेत. वावरे, काठे, ढिकले, बच्छावही होते नगरसेवक नाशिक महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी म्हणून काम केलेल्या अनेक दिग्गजांनीही नगरसेवकांनंतर आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदावर काम केलेले आहे. चांदवडचे विद्यमान आमदार व उमेदवार डॉ. राहूल आहेर यांनीदेखील नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून उमेद्वारी केल्यानंतरच ते आमदार झाले. शांतारामबापू वावरे, अॅड. उत्तमराव ढिकले, गणपतराव काठे, डॉ. शोभा बच्छाव यांनीही नगरसेवक पदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. शांताराम बापू वावरे यांनी तर नगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर प्रथम आमदार व नंतर महापौरपदही भूषविले. गणपतराव काठेदेखील नगरसेवक झाल्यानंतर आमदार अन् पुन्हा महापालिकेत नगरसेवक झाले. अड. उत्तमराव ढिकलेची राजकीय कारकिर्द तर लक्षवेधक ठरली आहे. भूतपूर्व नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, महापालिकेत नगरसेवक, महापौरपद भूषविल्यानंतर थेट लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आमदारकीसाठी नशीच आजमावत निवडूनही आले. धुळ्याच्या विद्यमान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा राजकीय प्रवासदेखील नगरसेवक, महापौर, आमदार आणि त्यानंतर राज्यमंत्रिपदापर्यंत राहिला आहे. बाळासाहेब सानप यांनी नगरसेवक, उपमहापौर व महापौर व आमदार अशी चढत्या भाजणीची पदे भूषविली आहेत. डॉ. हेमलता पाटील, रामदास उर्फ बाबा सदाफुले, शशी जाधव, अशोक दिवे, शाहू खैरे, अजय बोरस्ते, विनायक खैरे, पंडितराव खैरे आदी अनेक नगरसेवकांनीही प्रसंगोपात आमदार व्हायचे स्वप्न बघितले; परंतु त्यांना यशाने हुलकावणी दिली. पैकी अशोक दिवे व पंडितराव खैरे यांनी तर महापौरपदही भूषविलेले आहे. मतदारसंघनिहाय उमेदवार… नाशिक पश्चिम: सवांधिक चार माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गट: सुधाकर बडगुजर (माजी सभागृहनेते) भाजप: सीमा हिरे (विद्यमान आमदार, माजी नगरसेविका) मनसे: दिनकर पाटील (माजी सभागृहनेते) स्वराज्य पक्ष: दशरथ पाटील (माजी महापौर) नाशिक मध्य मतदारसंघ एक महापौर आणि उपमहापौर समोरासमोर भाजप: प्रा. देवयानी फरांदे (विद्यमान आमदार, माजी उपमहापौर) ठाकरे गट: वसंत गिते (नगरसेवक, माजी महापौर व माजी आमदार) समाजवादी पक्ष मुशीर सैय्यद (माजी नगरसेवक) नाशिक पूर्व नगरसेवक, स्थायी समिती सभापतीत सामना भाजप: अॅड. राहुल ढिकले (विद्यमान आमदार, माजी नगरसेवक, माजी सभापती) राशप: गणेश गिते (स्थायी समिती माजी सभापती) देवळाली: राष्ट्रवादी अजित पवार सरोज अहिरे (विद्यमान आमदार, माजी नगरसेवक) ०००००

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा

मुरबाड : ग्रामीण रुग्णालयात बुधवारी पाच खाटांचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले.  ट्रॉमा केअर सेंटरचे इमारतीमध्येच हे केंद्र सुरू झाले आहे. या ठिकाणी दररोज वीस रुग्णांना डायलिसिसची सेवा मोफत देण्यात येईल,…

‘तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही’

 मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन   पालघर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच तिकीटावरून विविध पक्षांमध्ये झालेले वाद सर्वांनी पाहिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनेक उमेदवारांची नावे जाहीर झाली नव्हती. तिकीटावरून एवढा वाद सुरू असताना अनेक नेत्यांची तिकिटे कापली जाणार हे निश्चित होते. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा “कधी कधी आपल्याला थांबावं लागतं कधीकधी गणितं असतात. परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं. म्हणून मी दिलेला शब्द पाहणारा माणूस आहे. काही लोकांना लोकसभेला उमेदवारी देऊ शकलो नाही पण त्यांना मी ताबडतोब विधान परिषदेमध्ये सदस्य बनवलं आणि आमदार बनवलं हा इतिहास आपल्या समोर आहे. श्रीनिवास माझ्यासोबत होता. मी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला त्याने काहीही विचारलं नाही. मुलाचा वाढदिवस देखील त्याने बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास राजेंद्र गावित यांच्यासाठी स्टेजवर आला आहे. श्रीनिवास यांचे चांगले होणार आहे कल्याण होणार आहे. त्याला कुठे बघण्याची गरज लागणार नाही,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ,

 एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक नारायण पवार यांची घेतली भेट   ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येताच उमेदवारांनी राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केली असून अशाचप्रकारे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची घेतली. या भेटीची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यानिमित्ताने मतांच्या जोगव्यासाठी विचारे यांनी भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार संजय केळकर, शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासह इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. असे असले तरी या तीन उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. या तिरंगी लढतीमुळे येथे अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, प्रभाग फेरीदरम्यान मतदारांच्या भेटी घेणे, स्थानक परिसरात प्रचार फेरी काढणे, प्रचार रॅली काढणे, पक्षातील नेत्यांच्या चौक आणि जाहीर सभा घेणे, यावर तिन्ही उमेदवारांकडून भर देण्यात येत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने तिन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला असून त्याचबरोबर राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे.अशाचप्रकारे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची घेतली असून त्याचे चित्रफित समाजमाध्यांवर प्रसारित झाली आहे. पाचपाखाडी येथील सिद्धेश्वर तलाव परिसरात ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा प्रभाव रहिला आहे. पॅनल पद्धतीमध्ये हा परिसर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या चंदनवाडी परिसराला जोडण्यात आला आहे. २०१७ च्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनलने विचारेंचे पुतणे मंदार विचारे यांचा पराभव केला. तसेच नारायण पवार हे पूर्वी पाच वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले असून गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढली आणि या निवडणुकीत ते निवडून आले. नारायण पवार हे काँग्रेस पक्षात होते, तेव्हापासून पवार आणि विचारे यांच्यात राजकीय वैर आहे. हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले आहेत. असे असतानाच, विचारे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतल्याने मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात राजन विचारे यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कोंट ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार फेरी रायगड गल्ली परिसरातून जात होती. त्यावेळी मी कार्यालयात बसलेलो होतो. अचानकपणे विचारे हे माझ्या कार्यालयात आले आणि त्यांनी माझी भेट घेतली. परंतु आम्ही आमचे उमेदवार संजय केळकर यांचा जोरदार प्रचार करीत असून ते चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. – नारायण पवार, माजी नगरसेवक,

आमदार प्रताप सरनाईक यांना विविध समाजाचा पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार – शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था , समाज घटक , सामाजिक संस्था यांचा पाठींबा दरदिवशी वाढत आहे. गेल्या १५ वर्षात झालेली प्रचंड विकासकामे आणि पुढील ५ वर्षाचे संकल्प पत्र पाहता आमदार सरनाईक यांचा विजय निश्चित असून त्यांना ठाणे – मीरा भाईंदर मधील यादव समाज तसेच , अल्पसंख्याक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे , असा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास’ हे सूत्र घेऊनच आमदार सरनाईक यांनी आजवर विकासाची कामे सर्वाना सोबत घेऊन केली असल्याने त्यांना व्यापक जन समर्थन मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यादव समाज या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राहतो. विशेष म्हणजे ‘फेक नॅरेटिव्ह’मुळे यातील काही लोक लोकसभा निवडणुकीत हे महाविकास आघाडीसोबत गेले होते. पण आता त्यांनी शिवसेना – भाजप महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची विकासकामे दिसत आहेत आणि त्यांची प्रभावी कार्यशैली , मतदारसंघातील जनतेशी त्यांचा असलेला थेट संपर्क यामुळे आम्ही त्यांना समर्थन देत आहोत व त्यांच्या सक्रिय प्रचारात उतरायचे ठरवले आहे , आमचे प्रत्येक मत हे आमदार प्रताप सरनाईक यांना मिळणार आहे , असे यादव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.प्राचीन काळात माणसाच्या जीवनात गायीचं अद्वितीय महत्त्व होतं. वैदिक काळात गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे गायीला कामधेनूही म्हटलं गेलं. राज्यातील विविध भागात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आला व तसा शासन निर्णयही लगेच प्रसिद्ध करण्यात आला होता. भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतल्याने यादव समाज हा खुश आहे. या निर्णयाने यादव समाज आणखी प्रभावित झाला. राज्य सरकार व आमदार सरनाईक यांच्या विकासकामांचा धडाका यामुळे आम्ही यादव समाज आमदार सरनाईक यांना एक गठ्ठा मतदान करणार , असेही पदाधिकारी म्हणाले.आमदार प्रताप सरनाईक यांनी मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम केले आहे. कोणताही भेद त्यांनी केला नाही. सर्व समाजघटकांसाठी त्यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत.  त्यामुळे सर्व समाजातून त्यांना समर्थन , पाठींबा मिळत आहे. गेल्या १५ वर्षात आमदार प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण मतदारसंघात चौफेर विकास केला आहे. ठाणे – मीरा भाईंदर मेट्रो , सूर्या पाणी योजना , नाट्यगृह , कॅशलेस हॉस्पिटल , सिमेंट काँक्रीटचे रस्ते , विविध समाज भवने , चांगली उद्याने ,  चौपाटी विकास यासह असंख्य विकास कामे झाली आहेत. प्रत्येक समाज घटकासाठी झालेली विकासकामे व त्यांचा दांडगा जनसंपर्क या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे. अल्पसंख्याक बांधवांसाठीही विकासाची कामे झालेली आहेत. त्यामुळे विविध अल्पसंख्याक समाजाच्या संघटनांनी आमदार सरनाईक यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी नजीब मुल्ला यांना विजयी करा – धनंजय मुंडे

अनिल ठाणेकर ठाणे : कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीबभाईला विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी मतदारांना केले. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ शमशाद नगर, मुंब्रा येथे मंत्री धनंजय मुंडे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही महिलांची संख्या लक्षणीय दिसत होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किणे,राजा सूर्यवंशी, नसीम खान, काळूराम पाटील, दत्तुमामा आदी मान्यवर उपस्थित होते. जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे.कळवा मुंब्र्याची ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप बरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती. सही करताना विधान परिषदेची मागणीही आव्हाड यांनी केली होती. पण नंतर दादाच्या भितीने सही केली अशी पलटी मारली. टोरन्ट कंपनीकडून इलेक्ट्रिकचा पैसा खाणाऱ्याला पराभूत करा मग मीही टोरन्ट कंपनीला ठेवणार नाही असे वचन देतो. लाडक्या बहिणींना महायुती सरकारने मासिक १५०० मानधन सुरु केल्यावर त्याविरोधात बोलणारे महाविकास आघाडीने आता महिलांना तीन हजार रुपये देम्याचे जाहीर केले आहे.पण ज्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथून ही कल्पना आणली तेथील निवडणूका संपल्यावर तीन हजार रुपये देण्याची योजना बंद झाली आहे.महाराष्ट्रतही माताभगिनींची महाविकास आघाडीकडून अशीच फसवणूक होवू शकते. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा, असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. चौकट जितेंद्र आव्हाड म्हणतात मला निवडून द्या, मी महिन्याभरात टोरन्ट पाॅवर घालवतो. मंत्री, आमदार असताना टोरन्ट का घालवले नाहीत उलट टोरन्टला चार्ज देतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. मुंब्रा कळव्यातील मतदारांच्या मतांवर आमदार होऊनही थोड्याश्या पैशासाठी मतदारांचे पाकिट मारुन जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे घर भरले आहे. यामुळेच टोरन्ट पाॅवर हटविण्यासाठी विद्यमान आमदाराचा पराभव करून मला निवडून द्या असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले. 0000

संजय केळकरांना तेली व नामदेव शिंपी समाजाचा पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : संजय केळकर यांनी समाजातील सर्व घटकांसाठी आजवर भरीव कार्य केले असून ते एकनिष्ठ व एकवचनी आमदार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या या कार्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेली समाजसह नामदेव शिंपी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक करण्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून संजय केळकर रिंगणात उतरले आहे. मॉर्निंगवॉक, चौक सभा, प्रचार दौरे यामध्ये केळकर यांनी खऱ्या अर्थाने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना समर्थन देणाऱ्या संस्था आणि नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. त्यानुसार ठाणे शहर विधानसभेचे आमदार म्हणून काम करत असताना केळकर यांनी सर्व सामान्यांमधील अगदी कुठल्याही समाजाच्या किंवा अतिसामान्य व्यक्तिला तसेच कुणासही तितक्याच तन्मयतेने महत्व देता व त्याला कुठल्याही प्रकारे मदत करण्यास तत्परतेने अगदी घरातीलच व्यक्ती असावी असे रात्री अपरात्री सुध्दा धावून जात असतात. केळकर यांच्या याच कार्यशैलीमुळे व पक्षासोबत एकनिष्ठ, एकवचनी दोनवेळा विधानसभा आमदार म्हणून निवडून आला आहात. तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून विधासनसभेत पाठविण्यासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे ठाणे शहरातील सर्व समाज व ज्ञातीमधील सर्व बंधू-भगिनी आपणास पाठिंबा व्यक्त करून या लेखी निवेदनाद्वारे आपणांस सुयश चिंतून आपण पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून यावेत म्हणून शुभेच्छा प्रकट करीत असल्याचे पाठिंबा पत्रात म्हंटले आहे. तर दुसरीकडे तेली समाजाने देखील केळकर यांचे समाजातील कार्याची दखल घेत, त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

 विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त

 उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई   योगेश चांदेकर पालघरः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागातील भरारी पथकाने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तलासरी तालुक्यात केलेल्या तपासणीत विदेशी मद्याच्या मोठया आकाराच्या ३६४ बाटल्या जप्त केल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक तालूके हा गुजरात, दीव दमण  तसेच दादरा-नगर हवेलीला लागून असल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्य  महाराष्ट्रात येत असते. विधानसभेच्या निवडणुकीत पालघर जिल्ह्यातही अशा मद्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असतो. पाठलाग करून साडेदहा लाखांचा ऐवज जप्त गेल्या दोन महिन्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारच्या अवैध मद्याची वाहतूक, साठा व विक्री प्रकरणी कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे  तलासरी तालुक्यात अशा प्रकारची मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनांची तपासणी केली. वाहन तपासणी होत असल्याने दादरा नगर हवेली पासिंग असलेल्या डीएन ०९/४७३ क्रमांकाच्या स्विफ्ट मारुती कारचालकाने वेगात गाडी नेली. तिचा पाठलाग करून पोलिसांनी मारुती मोटारीसह दहा लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यात साडेतीन लाख रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. यामधील आरोपी मात्र फरार झाला आहे. यांनी केली कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक ए. एस चव्हाण, विश्वजीत आभाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विकास आबनावे, ए. एम. शेख, कमलेश पेंदाम आदींनी तलासरी तालुक्यातील ठाकरपाडा रोड, कुर्झे डॅम जवळ ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुद्ध विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे अधीक्षक सुधाकर कदम,  बी. एन. भुतकर आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे हे करीत आहेत. 00000