उल्हासनगर : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चुरशीचं होतांना दिसत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ४ मधील मराठा सेक्शनमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ एक भव्य चौक सभा आयोजित करण्यात आली होती. उत्साहाने भरलेली ही सभा शिवसेना नेते अनंत गीते आणि उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांच्या धारदार भाषणांनी गाजली. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार करत, जनतेला जणू महाराष्ट्राच्या भविष्याची शपथ दिली. सभेच्या सुरवातीलाच शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. “लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केलेली फसवणूक आहे. या योजनेतून राज्यातील महिलांची फसवणूक होत आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जणू आरसा दाखवला. त्यांच्या या रोखठोक टीकेने श्रोत्यांत एकच खळबळ उडाली. कल्याण पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी त्यांच्या भाषणात उल्हासनगरातील मूलभूत समस्यांना हात घातला. पाणी, वीज, रस्ते आणि वाढती गुन्हेगारी हे मुद्दे मांडून त्यांनी तीन वेळा आमदार राहूनही विद्यमान आमदारांनी या क्षेत्रात कोणताही विकास न केल्याचे ठणकावून सांगितले. “येथील जनतेला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास संपवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी येथील लोकांच्या मनाला हात घातला. शिवसेना नेते अनंत गीते यांनी आपल्या सडेतोड भाषणातून राज्यातील “नीच राजकारण” आणि फोडाफोडीच्या खेळीवर संताप व्यक्त केला. “महाराष्ट्राची संस्कृती नाती जोडण्याची आहे, ती फोडण्याची नाही. परंतु सध्याच्या सरकारने पक्ष, घर, आणि नाती तोडून महाराष्ट्राला एक विषारी झाडासारखे फोडण्याचे काम केले आहे. या झाडाला मुळासकट उपटावे लागेल, आणि हे काम महाराष्ट्रातील जनतारूपी भीम करतील,” असे ते ठामपणे म्हणाले. अनंत गीते यांनी पुढे सांगितले की, “धनंजय बोडारे म्हणजे जनतेचा भीम आहे, जो महाराष्ट्रातील बकासुराचा नाश करणार आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये जणू नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांना विधान भवनात भगवा फडकवण्यासाठी त्यांनी मतदारांना मनःपूर्वक आवाहन केले आहे. अनंत गीते म्हणाले, “आज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने निर्धार केला आहे की यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात निवडून यावं. आमच्या हक्काचे सरकार सत्तेत आणण्यासाठी कल्याण पूर्व मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांना मतदान करावे. त्यामुळे विधानभवनात भगवा फडकेल आणि शिवसेनेचा आवाज बुलंद होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या सभेला शिवसेना संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याणचे शहरप्रमुख शरद पाटील, दिलीप मालवणकर, प्रकाश तरे, शेखर यादव, रोहित साळवे, अंजली साळवे, वसुधा बोडारे, सुरेंद्र सावंत, राजेंद्र शाहू, कैलास तेजी, जया तेजी, बापू सावंत, मंगला पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपास्थित होते. परिसरातील सर्व शिवसैनिकांनी सभा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. शिवसैनिक, महिला आघाडी व हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सभेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. सभेच्या अखेरीस जनतेने धनंजय बोडारे यांना विधानसभेत पाठवण्याची शपथ घेऊन निश्चय व्यक्त केला.