Month: November 2024

१० नोव्हेंबरची शिक्षक पात्रता परिक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न- डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत रविवारी शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ केंद्रांवर परीक्षा पार पडेल. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी आढावा घेण्यात आला. रायगड जिल्ह्यात शिक्षक पात्रता परिक्षा पनवेल तालुक्यातील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकुर विद्यालय या तीन केंद्रांवर पार पडेल. सदर परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत. परिक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी आणि तेलगू माध्यमाचे परिक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

मच्छिमार बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :बुधवार, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतदान संपन्न होणार असून रायगड जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांनी, नौका मालकांनी, नौकेच्या तांडेल, नौकेचे खलाशी, ओली व सुकी मासळी विक्री करणाऱ्या महिला-भगिनी, जाळे विणणारे मच्छिमार, हाताने मासे पकडणारे मच्छिमार, गावातील सर्व मत्स्य संवर्धक व जलाशयात मासेमारी करणारे सर्व मच्छिमारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघवारे, सहायक आयुक्त, मस्त्यव्यवसाय संजय पाटील, तहसीलदार सा.प्र. डॉ. शीतल रसाळ आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, रायगड जिल्ह्याला १२२ किलोमिटरची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा हा चांगल्या पर्जन्यमानाचा जिल्हा असल्यामुळे येथे गोड्या पाण्याची तळी, तलाव, जलाशय इत्यादी अस्तित्वात आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान करुनच नौका मासेमारीसाठी समुद्रात नेण्यात यावी, त्याचप्रमाणे सागरी मासेमारी सफरीचे नियोजन करावे. मच्छिमारी हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय असून जिल्ह्यात ४ हजार ५०० नौका आहेत. यामुळे २५ हजारपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार मिळत आहे. गावातील सागरी मासेमारीसाठी गेलेल्या नौका मतदानाच्या दिवशी बंदरात आणाव्यात जेणेकरुन त्यावरील तांडेल, खलाशी इत्यादींना मतदान करता येईल. मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाही बळकट व्हावी, याकरिता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावुन लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे. 0000

 कल्याण, डोंबिवलीतील बंडखोरांचे पाठीराखे प्रचारातून गायब

बंडखोर, अपक्षांचा एकला चलो रे मार्गाने प्रचार   कल्याण : कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवलीत ज्या पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठबळावर शिंदे शिवसेना, भाजपमधील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ते सर्व जोरकस कार्यकर्ते, पदाधिकारी आता बंडखोरांच्या प्रचारातून गायब झाल्याचे चित्र आहे. शिवसेना, भाजपने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचा फटका आपणास आणि येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये आपणास बसू नये म्हणून सुरुवातीला बंडखोरांना पाठबळ देणारे भाजप, शिवसेनेतील कार्यकर्ते आता बंडखोरांच्या प्रचारातून गायब झाल्याचे समजते. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेतून महेश गायकवाड दोन वर्षांपासून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकारानंतर वातावरण बदलले. कल्याण पूर्व भागातून शिंदे शिवसेनेतून नीलेश शिंदे, विशाल पावशे, प्रशांत काळे यांची नावे विधानसभेसाठी चर्चेला होती. या गटाने लोकसभा अधिवेशन सुरू असतानाच्या काळात दिल्लीत जाऊन खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन विधानसभेची व्यूहरचना आखली होती. यात शिंदे, पावशे उमेदवारीसाठी आघाडीवर होते. भाजपने कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात अचानक सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिंदे शिवसेनेतील महेश गायकवाड यांच्यासह निष्ठावान गट तीव्र नाराज झाला. या गटाने सुरूवातीला सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून जोरदार फडफड केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. शिंदे यांनी या नाराज निष्ठावान शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिल्यानंतर ते शांत झाले. ही नाराजाची ताकद आपणास मिळेल या आशेने महेश गायकवाड निवडणूक लढविण्याच्या विषयावर ठाम राहिले. महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांना आव्हान देण्यासाठी आपला उमदेवारी अर्ज कायम ठेवला. शिवसेनेकडून झालेल्या हकालपट्टीच्या कारवाईला त्यासाठी ते सामोरे गेले. आता महेश गायकवाड कल्याण पूर्वेत जोरदार प्रचार करत आहेत. यासाठी स्थानिकांसह भिवंडी भागातून त्यांनी तगडी फौज कल्याण पूर्वेत प्रचारात उतरवली असल्याचे समजते. या प्रचारात सुरुवातीला महेश यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे निष्ठावान शिवसैनिक मात्र त्यांच्या प्रचारातून गायब असल्याचे चित्र आहे. डोंबिवलीत ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी गणेशोत्सव काळात आगरी समाजातील माजी नगरसेवक, समाजाला संघटित करून भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत दीपेश यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर त्यांचा वाढदिवस इतर विषयांवरून व्यक्तिगत पातळीवर टीका केल्याने हा विषय चिघळला. दीपेश यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले. त्यांचे समर्थन करणाऱ्या एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाला तडीपाराची नोटीस बजावण्यात आली. या कारवायांमुळे दीपेश यांच्या पाठीशी असलेला आगरी समाजासह इतर नाराज गट त्यांची साथ सोडून पुन्हा मूळ स्थानी आला. आता दीपेश म्हात्रे प्रदेश काँग्रेसचे नेते संतोष केणे यांच्या साथीने प्रचारात उतरले आहेत. कल्याण पश्चिमेत माजी खा. कपिल पाटील यांचे नातेवाईक वरूण पाटील निवडणूक लढवित आहेत. भाजपने त्यांची हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काम न केल्याच्या रागातून शिवसेनेला उपद्रव देण्यासाठी ही खेळी पाटील गटाकडून खेळण्यात आल्याचे समजते. 00000

रीगन, शर्वेय, मुक्ता, अनन्या अंतिम फेरीत

 जेव्हीपीजी-टीएसटीटीए टेबलटेनिस स्पर्धा मुंबई,  8 नोव्हेंबर: द सबर्बन टेबलटेनिस असोसिएशनच्या (टीएसटीटीए) मान्यतेने जेव्हीपीजी-टीएसटीटीए फाईव्ह स्टार जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत रेगन अल्बुकर्क, शर्वेय सामंत तर मुक्ता दळी आणि अनन्या चांदेने अंतिम फेरीत धडक मारली. जेव्हीपीजी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत रीगनने विनीत दीपकचा ११-७, ११-७, ११-६, ११-६ असा पराभव केला. शर्वेया सामंतने युवराज यादववर ५-११, ११-६, ११-३, १४-१२, ११-६ असा विजय मिळवला. महिला एकेरीत मुक्ताविरुद्ध संपदा भिवंडकरवरने दुखापतीमुळे पहिल्या गेमनंतर माघार घेतली. त्यावेळी मुक्ता ही १-०(११-५) अशी आघाडीवर होती. अन्य लढतीत अनन्याने सिया हिंगोराण्यावर ११-८, ११-६, ११-८, ११-७ अशी मात केली. निकाल (उपांत्य फेरी) – 17 वर्षांखालील मुली: मायरा सांगलेकर विजयी वि. वैष्णवी जैस्वाल 11-7, 11-2, 11-1; निवा चौघुले विजयी वि. उर्वी चुरी 11-6, 8-11, 11-9, 11-13, 11-8. 17 वर्षांखालील मुले: अक्षांश साहू विजयी वि. झैन शेख 11-5, 13-11, 11-7; ध्रुव शहा विजयी वि. अर्णव क्षीरसागर 11-8, 10-12, 6-11, 13-11, 12-10. 19 वर्षांखालील मुली: अनन्या चांदे विजयी वि. श्रावणी लोके 6-11, 11-13, 11-4, 13-11, 11-8; उर्वी चुरी विजयी वि. मुक्ता दळवी 7-11, 11-5, 11-5, 11-7 .…

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीपर उपक्रम

अशोक गायकवाड नवी मुंबई :महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक कार्यालये तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने मतदार जागरुकतेच्या स्वीप कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत आज बिंदू माधव नगर दिघा येथील महिला बचत गटांना एकत्रीत करीत मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली व २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. महिला बचत गटातील सदस्यांनी आपल्या परिचितांना मतदान करण्याचे आवाहन करावे असेही सूचित करण्यात आले.* अशाचप्रकारे दिघा विभाग कार्यालयातील कर्मचारी व स्वच्छता मित्र यांनीही एकत्रीत येत मतदान करण्याचा निर्धार केला व मतदानाची प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली.ऐरोली येथील चिंचपाडा भागातही मागील निवडणूकीत कमी प्रमाणात मतदान झाले अशा मतदान केंद्रांच्या परिसरात गृहभेटी देत जनजागृती करण्यात आली व मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले.वाशी येथे सेक्टर १६ येथील मुख्य चौकात उपस्थित नाका कामगारांशी संवाद साधण्यात आला व त्यांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करण्यात आले.६ नोव्हेंबर रोजी नेरुळ रेल्वे स्थानक, नेरुळ बस डेपो, सेक्टर १५ अभ्युदय बँके समोरील रिक्षा स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना एकत्र करुन मतदाना विषयी जनजागृती करण्यात आली तसेच मतदानाची प्रतिज्ञाही घेण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात ठेवलेल्या मतदार जनजागृती सेल्फी स्टँडीवर अनेक नागरिकांनी छायाचित्रे काढून आपण मतदान करणार असल्याची ग्वाही दिली व इतरांनीही मतदान करावे असे आवाहन केले.रबाळे गाव येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित डॉक्टर, कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत मतदार जागरुकता प्रतिज्ञा घेण्यात आली व सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.त्याचप्रमाणे गोठीवली गाव येथील विश्वास बहुउद्देशीय विकास संस्थेमधील महिला सदस्यांशी सुसंवाद साधत त्यांना मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, १५० ऐरोली व १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, ऐरोलीच्या स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे व बेलापूरचे स्वीप नोडल अधिकारी सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

 ‘कालनिर्णय’तर्फे आयोजित ‘पाकनिर्णय २०२४’  आणि लघुकथा या स्पर्धांचे पारितोषिक वितरण

 ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन,   मुंबई : जागतिक पातळीवरील सर्वाधिक खपाचे प्रकाशन ‘कालनिर्णय’ने अलीकडे आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले तर त्यांच्या कालनिर्णय सांस्कृतीक दिवांळी अंकाला ३६ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय पाकनिर्णय’ पाककला स्पर्धा तसेच ‘लघु लघुकथा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संगीत मैफिलीचे आयोजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे करण्यात आले. यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी कालनिर्णयचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्या आईबाबांकडे मराठी कालनिर्णय असते तर सासूबाईकडे तमिल कालनिर्णय असते, असा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की, कालनिर्णयचे सर्वसामान्यांशी शतकानुशतकांचे नाते आहे, अशीच सर्वांची भावना आहे. “कालनिर्णयला ५० वर्षे झाली आहेत, पण मला ते खरे वाटत नाही. कालनिर्णय त्याआधी नव्हते तर मग हे जग चालले कसे, असें प्रश्न पडतो आणि कालनिर्णय शतकानुशतके होते, अशीच आमची भावना आहे. कालनिर्णयने कोविडचा काळ सुखकर केला, आमच्या घरात आई-बाबा नातेविकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लिहून ठेवण्यासाठी आणि त्यानुसार शुभेच्छा देण्यासाठी कालनिर्णयचा वापर करतात. तारखांच्या मागचा मजकूर वाचनीय असतो आणि ते वाचत आम्ही मोठे झालो.” त्या म्हणाल्या. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, पाककलेबरोबर आपण पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करतो , हेद्धा महत्वाचे असते. “काहीवेळा नको तेवढे पदार्थ ताटात वाढून ठेवलेले असतात. पाहुण्यांना काय खावू आणि काय नको असे होते. त्याऐवजी मोजके आणि नेटके पदार्थ असतील तर त्याची रंगत काही और असते. प्रख्यात विदुषी आणि भाषांतरकार रेखा सबनीस यांच्या घरी जेवायला गेले असताना मला असा अनुभव आला,” त्या म्हणाल्या. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, पाककलेबरोबर आपण पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करतो , हेद्धा महत्वाचे असते. “काहीवेळा नको तेवढे पदार्थ ताटात वाढून ठेवलेले असतात. पाहुण्यांना काय खावू आणि काय नको असे होते. त्याऐवजी मोजके आणि नेटके पदार्थ असतील तर त्याची रंगत काही और असते. प्रख्यात विदुषी आणि भाषांतरकार रेखा सबनीस यांच्या घरी जेवायला गेले असताना मला असा अनुभव आला,” त्या म्हणाल्या. कालनिर्णय दिवाळी अंकाचे संपादक जयराज साळगावकर म्हणाले, “दीवाळी अंकाचे अर्थकारण आणि वाचकांची मानसिकता या दोन्ही गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. त्याच्याशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रकाशक आणि संपादकांपुधील एक मोठे कोडे आहे. दिवाळीतील उटणे, झेंडू फुले, मोती साबण यांप्रमाणे दिवाळी अंक एक कमॉडीटी झाली आहे. सुसंस्कृत वाचक कमी झाले आहेत. चांगला मजकूर देवूनही लोक हल्ली वाचत नाहीत. आणि हे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. दिवाळी अंक बंद पडतील असे नाही पण ते बंद पडू नयेत म्हणून आपण या अंकांचा फॉर्म मात्र बदलायला हवा. म्हणूनच आम्हीं यंदाच्या दिवाळी अंकात लघुकथा द्यायचे ठरवले. पूर्णि टके बंद पडत होती, पण त्या क्षेत्रात काही चांगले प्रयोग झाले आणि नाटके सर्व्हाइव्ह झाली आहेत.” साळगावकर पुढे म्हणाले, “वाचाकाशिवाय लेखकाला किंमत नाही. वाचक हा खऱ्या अर्थाने चालक असतो. अपनील मराठी संस्कृती अशी की आर्थिक अद्चानिठी उत्साहाने नवनवीन दिवाळी अंक येतात. ते एक व्यासपीठ आहे आणि ते जिवंत राहिले पाहिजे आणि तसे होईल याची मला पूर्ण खात्री आहे. गेली  ३६ वर्षे आम्ही कालनिर्णय दिवाळी अंक काढतो आहे. खर्च खूप होतो पण तोटा होत नाहीत, नफा कमी प्रमाणात होतो, अशी परिस्थिती आहे.” कालनिर्णय प्रकाशनच्या शक्ती साळगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले, “आमचे परीक्षक आणि  स्पर्धक यांच्याकडून अम्हालाक खूप प्रेम मिळाले आणि त्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. हेतू पाककृती शोधणे आणि त्यातील उत्कुष्ट पाककृतींचा गौरव करणे यासाठी हे आयोजन आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत इंस्टंट मिक्सेस खूप लोकप्रिय झाली. युध्यात गेलेल्या पुरुषांच्या गैरहजेरीत मुले व स्त्रियाना घराबाहेर पडावे लागत होते आणि त्यामुळे स्वयाम्पाकाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. त्यामुळे इंस्टंट फूडकडे घरांचा कल वाढू लागला. प्रत्येक पाककृती ही त्या त्या वेळच्या संस्कृतीचा अभ्यास करते. खाद्यसंस्कृती ही त्यावेळच्या सामाजीक, वैचारिक आणि आर्थिक परीस्थितीचा आढावा घेत असते. या खाद्यसंस्कृतीचे आणि आमचं पाककृती स्पर्धेचे कर्तेधर्ते स्पर्धक आणि परीक्षक आहेत.” ‘कालनिर्णय’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या ‘कालनिर्णय पाकनिर्णय २०२४’  तसेच ‘लघु लघुकथा’ या स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ या सोहळ्यात आयोजित करण्यात आला. तसेच  ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२४’चे प्रकाशनही यावेळी झाले. यावेळी  ‘स्वरांच्या हिंदोळ्यावर’ ही मराठी भावगीतांची सांगीतिक मैफिल पार पडली. त्यालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सांगीतिक मैफलीमध्ये मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे या गायक कलाकारांनी गाणी सादर केली. कुणाल रेगे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. 00000

 ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

दिवाळीनंतर पालिकेचे निघाले दिवाळे   ठाणे : यंदा दिवाळी सणापुर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह एक महिन्याचे आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तु व सेवा करापोटी मिळालेले ९५ कोटी आणि इतर रक्कम असे जेमतेम १०० कोटी रुपये शिल्लक आहेत. या रक्कमेतून पुढच्या म्हणजेच डिसेंबर महिन्याचे वेतन देण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तसेच निवडणुक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने पालिकेची कर वसुली ठप्प झाली आहे. यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षाचा म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ५ हजार २५ कोटी रुपयांचा आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना पालिकेने कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. याशिवाय, शहर विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागांकडून पालिकेला चांगले उत्पन्न मिळते. यामुळे या विभागांची कर वसुली महत्वाची मानली जाते. मालमत्ता विभागाने ८९३ कोटीपैकी ४२१ कोटींची, अग्निशनम दलाने १०० कोटींपैकी ५० कोटी ५८ लाख, शहर विकास विभागाने ७५० कोटींपैकी ३३० कोटी आणि पाणी पुरवठा विभागाने २२५ कोटींपैकी ४११ कोटी रुपयांची कर वसुली केली आहे. राज्य शासनाकडूनही पालिकेने विविध प्रकल्पांसाठी मोठ्याप्रमणात अनुदान मिळालेले आहे. यामुळे करोना काळानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेची आर्थिक स्थिती काहीशी रुळावर येताना दिसून येत होते. याशिवाय, पालिकेने मार्च २०२३ पर्यंतची ठेकेदारांची देयकेही दिली आहेत. यामुळे पालिकेचे दायित्वही काही प्रमाणात कमी झालेले आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिकेने सानुग्रह अनुदानासह एक महिन्याचे आगाऊ वेतन दिले आहे. ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना २४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच सहा हजार रुपयांची दिवाळी भेट दिली. याशिवाय, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे. तसेच स्वच्छता कामांचे देयके, कर्मचाऱ्यांची देणी असे एकूण २३२ कोटी रुपये पालिकेने खर्च केले. यामुळे पालिकेच्या तिजोरीत दिवाळीनंतर ख़डखडाट झाला आहे. पालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तु व सेवा करापोटी मिळालेले ९५ कोटी आणि इतर अशी जेमतेम १०० कोटी रुपये आहेत. वस्तु व सेवा कराच्या रक्कमेतून अधिकारी आणि कमर्चाऱ्यांचे वेतन देण्यात येते. यामुळे ही रक्कम नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासाठी वापरली जाणार आहे. मालमत्ता कराची दिवसाला ५० लाख ते एक कोटी रुपयांची करवसुली होती. पंरतु निवडणुक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने पालिकेची कर वसुली ठप्प झाली आहे. यामुळे पालिकेची आवक बंद झाल्याने दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. ०००००

 ठाण्यातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची फसवणूक

‘धर्मराज्य पक्षा’ची आरटीओ आणि वाहतूक विभागाकडे तक्रार   ठाणे : ज्या रिक्षाचालकांकडून अशाप्रकारे मीटरमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करुन, प्रवाशांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे, अशा समाजकंटकीप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांचा शोध घेऊन, त्यांच्या रिक्षातील मीटर तपासण्यात यावेत आणि त्यात एखादा रिक्षाचालक दोषी आढळल्यास, त्याचा वाहन परवाना आणि रिक्षा-बॅच कायमस्वरुपी रद्द करुन, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नरेंद्र पंडित यांनी केली आहे. ठाणे शहरातील काही रिक्षाचालक आपल्या मीटरमध्ये फेरफार करुन, प्रवाशांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून, रिक्षाचालकांच्या विरोधात ‘धर्मराज्य पक्षा’कडे मोठ्याप्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत. यासंदर्भात, प्रवाशांनी रिक्षाचालकांस विचारणा केल्यास, जाब विचारल्याचा राग येऊन, काही गुंडप्रवृत्तीचे रिक्षाचालक तर, थेट प्रवाशांशी अरेरावी करणे, असभ्य वर्तणूक करणे; तसेच, शिवीगाळ करणे यासारखे अशोभनीय प्रकार करीत असतात. रिक्षा-व्यवसाय हा, खासगी स्वरुपातील मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रकार असल्याने, समाजातील सर्व घटक, विशेषतः नोकरदारवर्ग रिक्षा वाहतुकीला प्राधान्य देतात. असे असतानाही, स्वतः कष्टकरीवर्गाचे प्रतिनिधित्व करीत असूनदेखील, सकाळ-संध्याकाळ अशा गर्दीच्या वेळी आणि ठिकाणी, खास करुन ठाणे स्टेशन परिसरात, काही रिक्षाचालकांकडून सरळ-सरळ भाडी नाकारली जातात. संतापजनक बाब म्हणजे, अशावेळी महिला, ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा मिळविण्यासाठी अक्षरशः रिक्षाचालकांपुढे हात जोडावे लागतात. त्यातही अनेक विनवण्या केल्यानंतर किंवा वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर, एखादा रिक्षाचालक भाडे स्वीकारतो; मात्र, लांबचे भाडे असल्यास, हातचलाखीने आपल्या हँडलवर किंवा सीटखाली गुप्त पद्धतीने बसवलेली कळ दाबून, आधीच मीटरमध्ये फेरफार करण्यात आलेले असल्यामुळे, मीटर वाऱ्याच्या वेगाने पळते आणि नियमबाह्यपद्धतीने प्रवाशांकडून प्रवासी-भाडे उकळले जाते. काही दिवसांपूर्वी, समाजमाध्यमांद्वारे एका वाहतूक पोलिसामार्फत, एक व्हिडिओ-क्लिप प्रसारित करण्यात आली होती. त्यामध्ये मीटरच्या डाव्याबाजूला, (आणि प्रवाशाच्या उजव्या हाताला) जिथे आकडे बदलत असतात, त्याठिकाणी कोपऱ्यात एक छोटा लाल रंगाचा ठिपका, सतत बंद-चालू (Blink) होत असल्यास, मीटरमध्ये नक्कीच फेरफार झालेला असल्याचे समजावे, अशी माहिती संबंधित वाहतूक पोलिसाने आपल्या व्हीडिओ-क्लिपद्वारे दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपायुक्त आणि ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धा १० नोव्हेंबरला

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत  शंभराव्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन १० नोव्हेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे बालदिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही – किरेन रिजिजु

अनिल ठाणेकर ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही. असे वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक तथा संसदिय कामकाज मंत्री किरेन रिजिजु यांनी केले असुन त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश  केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मविआ आघाडीची पोलखोल करण्यासाठी ठाण्यात भाजप मिडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिजिजु बोलत होते. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजप प्रदेश प्रवक्ते सागर भदे,माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदीसह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात महायुतीसाठी उत्तम वातावरण असल्याचे सांगुन केंद्रीय मंत्री रिजिजु यांनी, राहुल गांधींनी नागपुर येथील कार्यक्रमात संविधानाच्या नावाखाली कोऱ्या लाल रंगाच्या पुस्तिकेचे ढोंग रचल्याचे सांगितले. राहुल गांधी आणि काँग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केले. त्यामुळेच १९५१ साली बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संविधानात देखील काँग्रेसने बदल केले, हा संविधानावरील पहिला हल्ला होता. १९७५ मध्ये आणीबाणी लागु करून संविधानाचा पायाच काँग्रेसने उध्वस्त केला.१९९० मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेतुन  पायउतार झाल्यावर आलेल्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला, त्यात भाजपचाही समावेश होता. तर दुसरीकडे २६ नोव्हे. रोजी संविधान दिन साजरा करून तसेच देशभरात संविधान मंदिरे उभारून भाजप संविधानाचा सन्मान करीत आहे. आणि, काँग्रेस केवळ संविधान बदलण्याचा बागुलबुवा उभा करून देशात फेक नॅरेटीव्ह पसरवत असल्याचे मंत्री रिजिजु यांनी सांगितले.नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जगात देशाची प्रतिमा उंचावली. महाराष्ट्रात २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर बदल झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपुर समृद्धी महामार्ग हा जागतीक दर्जाचा महामार्ग उभारला आहे. राज्यात लाडकी बहिण सारख्या योजना लोकप्रिय होत आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र एक प्रकारे डबल इंजिनचे काम करीत आहे.तेव्हा,हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली असुन जातीजातीत विभागले जाऊ नका असे आवाहन मंत्री रिजिजु यांनी केले. आजवर काँग्रेसने मुस्लिमांसह एससी, एसटी आणि दलित समाजाची मते घेतली. पण त्यांना न्याय दिला नाही. याउलट भाजपने सबका साथ सबका विकास या अनुसार सहा अल्पसंख्यांक समाजाना समान दर्जा दिला आहे. तर हिंदु समाजात फूट पाडून इतकी वर्षे काँग्रेसने मुस्लिमांना मुर्ख बनवले. मुस्लिम समाजाची व्होट बँक खिशात ठेवूनही काँग्रेसने मुस्लिमांना कोणताच लाभ दिला नसल्याचे सांगुन मंत्री रिजिजु यांनी, काँग्रेसची फोडा आणि राज्य करा …ही निती आता चालणार नसल्याचे स्पष्ट केले.