Month: November 2024

बोगस शिक्षणसंस्थांवर कारवाई करा

ठाणे : शहरात सुरू असलेल्या बोगस शिक्षण संस्थांकडून सामान्य व गरीब कुटुंबातील तरुण व तरुणींची फसवणूक होत आहे. त्यामुळे याची चौकशी करून संबंधित शिक्षण संस्थांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ठाणे रेल्वे स्टेशन, राम मारुती रोड, नौपाडा परिसरासह शहरातील महत्त्वाच्या गजबजलेल्या भागात काही बोगस शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध विद्यापीठातील अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच, अभ्यासक्रमाचे शुल्क कर्जरूपाने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची कागदपत्रे मिळवून त्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. या तरुण-तरुणींची भविष्यातही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप या निवेदनातून केला आहे.

‘अमर ज्योतीने’ शहिदांना आदरांजली

विरार : श्रमजीवी संघटनेचे मुख्यालय असलेल्या उसगाव डोंगरीत मंगळवारी सायंकाळी अभिनव पद्धतीने संविधानचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शहीद स्मारकाचे तसेच संविधानात अंतर्भूत असलेले ‘राज्य’ अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेता यावे, यासाठी विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून बैलगाडीच्या माध्यमातून उभारलेले स्मारकाचेही उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर वीरपत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते अविरत तेवत राहणाऱ्या “अमर ज्योतीचे” प्रज्वलन करत शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उसगाव येथे श्रमजीवी संघटना आयोजित संविधान अमृत महोत्सव सोहळा झाला. यावेळी २६/११ हल्ल्यात वीरमरण असलेले विजय साळसकर यांच्या वीरपत्नी स्मिता साळसकर यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. सोबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महापालिका आयुक्त डॉ. अनिल पवार आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या आणि देशाचे रक्षण करताना सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहणारी अखंड तेवणारी अमरज्योत वीर पत्नी स्मिता साळगावकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. २६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस, जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. अमर ज्योतीसाठी योगदान देणाऱ्या कैलास बिश्नोई यांचा या वेळी सन्मान जिल्हाधिकारी आणि विवेक पंडित यांनी केला. तसेच वसईच्या एकाधिकारशाहीला टक्कर देत विजयश्री मिळवलेल्या श्रमजीवी कन्या आणि भाजपच्या नवनिर्वाचित आमदार ॲड. स्नेहा दुबे पंडित यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष श्रामभाऊ वारणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलिस उपायुक्त जयंत भजबले, शरद पाटील व श्रमजीवी संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 अभय योजनेत 27717 थकबाकीदारांना लाभ;

24.40 कोटी घरपट्टी वसूल हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी राबविलेल्या अभय योजनेत दोन महिन्यात २७, ७१७ मिळकतधारकांनी लाभ घेतला. यातून २४.४० कोटी रुपयांची घरपट्टी अदा केली, तर महापालिकेने १२.५१ कोटी रुपयांचा दंड माफ केला. महापालिकेला शासनाच्या माध्यमातून जीएसटी प्राप्त होतो. जवळपास ९८५ कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून शासनाकडून प्राप्त होतो. जीएसटीनंतर महापालिकेला घरपट्टीतून अधिक उत्पन्न मिळते. वार्षिक अडीचशे कोटी रुपये महसूल घरपट्टीच्या माध्यमातून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एक एप्रिल २०१८ नंतर शहरातील नवीन मिळकतींना दुप्पट घरपट्टी लागू करण्यात आल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ३०० कोटीपर्यंत थकबाकीची रक्कम पोचली आहे. महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने देयकांचे वाटप होत नाही. त्यामुळे आता घरपट्टी बिलांचेदेखील आउटसोर्सिंग करण्यात आले आहे. महापालिकेकडून उत्पन्नात वाढ करण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी आगाऊ घरपट्टी अदा केल्यास सवलत योजना राबविली जाते. त्यानंतर मात्र मुदत संपल्यानंतर घरपट्टी अदा न करणाऱ्यांना जुलै महिन्यापासून घरपट्टीच्या थकबाकी वर मासिक दोन टक्के शास्ती केली जाते. एक एप्रिल २०१८ नंतर महापालिकेच्या रेकॉर्डवरील मिळकतींना दुप्पट दराने घरपट्टी लागू करण्यात आल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. घरपट्टीची मूळ थकबाकीची रक्कम १७३ कोटी रुपये आहे. त्यावरील दंडाची रक्कम ही २७२ कोटी रुपये आहे. त्यामुळे महापालिकेने दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी १ ऑक्टोंबर २०२४ पासून अभय योजना लागू केली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थकबाकीची रक्कम अदा केल्यास दंडाच्या रकमेत ९५ टक्के माफी, डिसेंबर महिन्यात ८५ टक्के, तर जानेवारी २०२५ मध्ये ७५ टक्के शास्ती माफी असे योजनेचे स्वरूप आहे. १ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या दोन महिन्यांत २७,७१७ थकबाकीदारांनी लाभ घेतला. असा मिळाला लाभार्थ्यांना लाभ सातपूर विभागात ३,४४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांच्याकडून २. ५२ कोटी रुपये थकबाकी जमा झाली असून, ९० लाखांची दंडमाफी देण्यात आली. पश्चिम विभागात १, ७८७ थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेत ३.२२ कोटी रुपये थकबाकी अदा करून १. १४ कोटी शास्तीचा लाभ घेतला. पूर्व विभागात ४, ९५०, पंचवटी विभागात ६,२१०, सिडको विभागात ७,०९१, नाशिक रोड विभागात ४,२३९ याप्रमाणे लाभ घेण्यात आला. कोट ”थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली असून, थकबाकीदारांनी एकरकमी थकबाकी अदा करून दंड माफीचा लाभ घ्यावा.” – श्रीकांत पवार, कर उपायुक्त, महापालिका. ००००

 नोव्हेंबर महिन्यात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई

 लाख 60 हजार दंड तसेच 62 किलो प्लास्टिक जप्त नवी मुंबई : ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहचून एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असून दुस-या बाजुला प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करुन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दिवाळीच्या आधीपासूनच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्यात 25 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करीत 1 लाख 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच 62 किलो 100 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे. यामध्ये बेलापूर विभागात 18 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करत 1 लाख 25 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे, तसेच 42 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. अशाचप्रकारे नेरुळमध्ये एका दुकानावर कारवाई करत 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 1.5 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. वाशी विभागातही 1 दुकानदाराकडून 1 किलो एकल वापर प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली आहे. कोपरखैरणे विभागातही 1 दुकानदाराकडून 500 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंड वसूली करण्यात आली आहे. याशिवाय परिमंडळ 1 मधील भरारी पथकाने 15 किलो प्लास्टिक जप्ती व 5 हजार दंड वसूली आणि परिमंडळ 2 मधील भरारी पथकाने 3 दुकानदारांवर कारवाई करुन 2 किलो 100 ग्रॅम प्लास्टिक साठा जप्ती तसेच 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. अशाप्रकारे नोव्हेंबर महिन्यात नमुंमपा क्षेत्रात 1 लाख 60 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 62 किलो 100 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिकमुळे निर्सगाला व मानवी जीवनाला होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला दैनंदिन वापरातून पूर्णपणे हद्दपार करावे व स्वच्छ सुंदर पर्यावरणशील शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक वृध्दींगत करत रहावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

– ठाणे महापालिकेत घेण्यात आली बालविवाह मुक्त भारताची शपथ

– ठाण्यातील बचत गटांच्या महिला, अधिकारी आणि कर्मचारी यांचा कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग ठाणे : बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला. त्यात देशभरातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकही सहभागी झाले. बालविवाह मुक्त भारत या पोर्टलचेही याप्रसंगी अनावरण करण्यात आले. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात, अतिरिक्त आयु्क्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते. यावेळी, ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी  बालविवाह मुक्त भारताची सामुहिक शपथ घेतली. तसेच, शाळा, आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली.

महात्मा जोतीराव फुले

भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई…

फडणवीसांची पदाकांक्षा शिंदेंनी सोपी केली !

  राज्याचे सध्याचे काळजीवाहू आणि राज्याचे २० वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फार मोठे राजकीय पाऊल उचलताना भाजपाच्या, म्हणजेच देवेन्द्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त केला आहे. फडणवीसांना या पदाची कांक्षा…

आजपासुन बोरीवलीत रंगणार राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२४-२५

मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उद्या पासुन २८, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी बिमानगर एज्युकेशन सोसायटी शाळा, एलआयसी कॉलनी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४००१०३ येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर या ८ विभागातील १९२ खेळाडू, १६ मार्गदर्शक, व्यवस्थापक, ३० पंच व अधिकारी, २५ स्वयंसेवक असा एकूण २६३ जणांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धेची पूर्व तयारी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आणि मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे कौशल्य, कसब पाहण्याची संधी मुंबईतील क्रीडा प्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांनी केले आहे. 0000

यातायाती धर्म नाही विष्णूदासा

वारकरी संप्रदाय कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नाही आषाढीला पंढरपूरच्या दिशेने सर्व संतांच्या दिंड्या निघतात. तेव्हा जात-धर्म, गरीब-श्रीमंत, स्री- पुरुष असा कोणताही भेद उरत नाही. सर्वजन एकाच पातळीवर आलेले दिसतात.…

 मुलांमध्ये सरस्वती मंदिर हायस्कूल विरुध्द श्री गणेश विद्यालय अंतिम फेरीत लढणार

सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी स्पर्धा मुंबई : सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी मुलांचे सामने झाले. स्पर्धेतील दोन्ही उपांत्यफेरीत उत्कंठावर्धक लढती पाहायला मिळाल्या. या सामन्यांमधून  सरस्वती मंदिर हायस्कूल आणि श्री गणेश विद्यालय यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले. पहिला उपांत्य फेरी सामना: पहिल्या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा ३०-११ असा एक डाव व १९ गुणांनी पराभव केला. सरस्वती कडून प्रभावी खेळ: या सामन्यात सरस्वतीकडून हर्ष प्रजापती (१ मिनिटे संरक्षण व आक्रमणात ४ गडी), शिवम झा (आक्रमणात ४ गडी) व श्रेयस जावळे (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेल्या खेळामुळे सरस्वती मंदिर हायस्कूलचा संघ अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. तर पराभूत अहिल्या विद्या मंदिरच्या विश्वेश गुलगुले (आक्रमणात ५ गुण), मुझम्मील शाह (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेली खेळी त्यांना पराभवापासून वाचवू शकली नाही. दुसरा उपांत्य फेरी सामना: दुसऱ्या सामन्यात श्री गणेश विद्यालयाने  वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलचा ३३-२२ असा एक डाव व ११ गुणांनी पराभव केला. श्री गणेश कडून उत्कृष्ट खेळ: या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या मानस पोस्टरे (२:३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात १ गुण), संयम धाडवे (आक्रमणात ७ गुण), अमेय मोहिते (आक्रमणात ६ गुण) यांनी विजयात मोठी कामगिरी करत श्री गणेश विद्यालयाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले तर पराभूत वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलच्या प्रविण गुप्ता (आक्रमणात ३ गुण), ऋषी ठाकूर (आक्रमणात २ गुण) यांनी चांगला खेळ केला पण त्यांना इतरांची साथ लाभली नाही त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ०००००