रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट
ठाणे : रिक्षातील इलेक्ट्रॉनिक मीटरमध्येही फेरफार करून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या महिन्यात मुंबईत घडलेल्या घटनेची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. अशाच प्रकरणांमध्ये गेल्या महिन्याभरात ठाणे उपप्रादेशिक विभागाकडे तीन तक्रारी दाखल झाल्या असून त्याची दखल घेत परिवहन विभागाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड आकारला. रिक्षा प्रवासात अनेकदा प्रवाशांना चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. काही वेळा मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांब अंतरावरून रिक्षा घेऊन जाणे कमी अंतरासाठी अधिकचे भाडे आकारणे, अकारण वितंडवादांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असते. ऑक्टोबरमध्ये मुंबईत यासंदर्भातील एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. असाच प्रकार आता ठाणे शहरातही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांत ऑक्टोबरमध्ये ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तीन तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर रिक्षाचालकांवर कारवाई केली. बाळकुम ते कापुरबावडी २३ रुपये मीटर होते, मात्र फेरफारीमुळे ४० रुपये होत असल्याचे प्रिया पार्टे म्हणाल्या. मीटर फेरफार असे… मीटरचा वेग वाढवण्यासाठी रिक्षाच्या हँडलमागे असलेले बटण रिक्षाचालकाने सुरू केल्यास मीटरचा वेग वाढतो. तर बंद केल्यास मीटरचा वेग पूर्ववत होतो. अशा वेळी चालकाने बटण सुरू करताच मीटरवरील शेवटच्या आकड्यानंतर एक छोटा पॉइंट बंद-चालू (ब्लिंक) होताना दिसतो. मीटरवर २३.०० सहसा असे मीटर भाडे दिसते, परंतु बटणाच्या साह्याने चालकाने त्यात फेरफार केल्यास मीटरवर दिसणाऱ्या रकमेच्या म्हणजेच २३.०० या रकमेच्या शेवटी एक पॉइंट दिसतो. म्हणजेच ही रक्कम मीटरवर २३.००. अशी दिसेल. असे आढळल्यास नागरिकांनी संबंधित रिक्षाचालकाची तक्रार त्याच्या रिक्षाच्या क्रमांकासहित जवळच्या प्रादेशिक विभागामध्ये करावी, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांब अंतरावरून रिक्षा घेऊन जाणे कमी अंतरासाठी अधिकचे भाडे आकारणे, अकारण वितंडवादांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असते. मीटरच्या संदर्भात काही संशयित आढळल्यास वा चालक भाडे जास्तीचे घेत असल्यास ९४२०४७३९६९ या क्रमांकावर वा mh04 rikshawcomplaint@gmail. com या मेल आयडीवर संपर्क साधावा. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी 0000
उल्हासनगरात पंकजा मुंडेच्या सभेला लाडक्या बहिणीची गर्दी
उल्हासनगर : उल्हासनगर म्हणजे युएसए हे उघोगाचे माहेरघर असून लहानपणी येथील वस्तू खरेदी केल्याची आठवण पंकजा मुंडे यांनी सभेत केली. तसेच उधोगशील शहर गुंडा मुक्तीसाठी कुमार आयलानी यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन लाडक्या बहिणीना यावेळी केले. उल्हासनगर टाऊन हॉल मध्ये गुरुवारी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन केले होते. हॉल मध्ये लाडक्या बहिणीने एकच गर्दी केली होती. तुम्हच्या आत्मसन्मानसाठी लाडली बहीण योजना सुरु राहणार असल्याचे मुंडे यांनी सभेत सांगितले. उल्हासनगर हे उघोगशील शहर असून युएसए नावाने प्रसिद्ध आहे. याच शहराच्या वस्तू आम्हच्या घरात लहानपणी येत असल्याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र शहर गुंडा मुक्त करण्यासाठी कधी पाठीमागे राहणाऱ्या कुमार आयलानी यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. सभेला कुमार आयलानी, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, भाजप नेते नरेंद्र राजांनी, शिंदेसेनेचे पक्ष प्रवक्ता किरण सोनावणे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, भाजपचे लाल पंजाबी, डॉ प्रकाश नाथानी, लाल पंजाबी यांच्यासह रिपाई व पीआरपी पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई
मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्याोग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम तसेच इतर आस्थापनांमध्ये कार्यरत कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांच्या मालकांविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी दिला. भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या सूचनांनुसार मुंबई शहर व उपनगरांत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांतील मतदारांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विविध नियम जारी करण्यात आले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत गगराणी यांनी आदेश दिले आहेत. सर्व उद्याोग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्याोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना हा नियम लागू होणार आहे. लोक प्रतिनिधीत्व अधिनियमानुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असल्यास मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही. सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनांच्या मालक वा पदाधिकाऱ्यांविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे उद्याोग विभागांतर्गत येणारी सर्व महामंडळे, उद्याोग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशही गगराणी यांनी दिले. वेतनात कपात करता येणार नाही… अपवादात्मक परिस्थितीत कामगार, कर्मचारी, अधिकारी आदींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. मात्र, अशा सवलत प्रकरणांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. दरम्यान, सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही आस्थापनाच्या मालकांनी उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी
अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेची मागणी पनवेल : अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे महेश बालदी याना दिला आहे. यापूर्वी अखिल आगरी समाज परिषद यांनी देखील महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी अशी मागणी केली होती. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, काही लोकांच्या आशिर्वादाने सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आतापर्यंत आगरी समाजाबद्दल जी विधाने केलीत, त्यांतून आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्या आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले, त्यानांच कमी लेखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्ही वारंवार केला आहात. “ही काही आगरी समाजाच्या संघटनेची निवडणूक नाही.” या विधानातून तुमचा समाजाला एकप्रकारे कस्पटासमान लेखण्याचा इरादा दिसून आला आहे. अशा प्रकारे सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा महेश बालदी यांच्याकडून तोडल्या गेल्या आहेत. याचा समस्त आगरी समाज जाहीर निषेध करीत आहे. बालदी यांच्याकडून ही गोष्ट पहिल्यांदाच अनवधानाने घडलेली आहे, असेही म्हणता येणार नाही. बालदी हे आगरी समाजाला तुच्छतेच्या भावनेने पहात असल्याचेच त्यांच्या देहबोलीतून आतापर्यंत दिसून आले आहे. यापूर्वी महेश बालदी यांनी माझी जात बघायला, तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी” अशी वायफळ बडबड करुन येथील माता-भगिनींचा अपमान केला आहे. आमच्या आयाबहिणी काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत. हे आपण ध्यानात घ्यावे. असा सूचक इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने दिला आहे. एकीकडे स्थानिक भूमिपुत्र नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करीत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केली, आणि दुसरीकडे मात्र या विमानतळाचा उल्लेख जाणीवपूर्वक “आदाणी विमानतळ” असा करुन बालदी यांनी स्थानिकांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. अशा प्रकारे अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने मागणी केली आहे. 00000
सुशोभीकरण म्हणजेच विकास असे समजणाऱ्यांना खरा विकास कळलाच नाही – सुधाकर घारे
मतदार माता भगिनी मलाच निवडून देणार; सुधाकर घारेंना विश्वास राज भंडारी पनवेल : कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी या मतदार संघात खरी लढत ही तिरंगी होणार असून यामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत आणि राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुधाकर घारे यांच्यात ही काटे की टक्कर होणार आहे. यावेळी अपक्ष लढत असतानाही आपण कसे निवडून येवू शकतो हा विश्वास व्यक्त करताना मतदार आणि कार्यकर्ते यांचे आपल्यावरील प्रेम काय आहे हे २३ तारखेला सर्वांनाच कळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाचे मुद्दे समोर आणत आपला मोठेपणा गाजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. सुशोभीकरण म्हणजेच विकास असे समजनाऱ्यांना खरा विकास कळलाच नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावले. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सन २०१४ साली राष्ट्रवादीकडून सुरेश लाड हे आमदार होते. त्यानंतर सन २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप तत्कालीन युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सुरेश लाड यांच्यावर मात करून विजयी झाले. मात्र गेल्या पाच वर्षातील कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात झालेला विकास आणि विकासकामे याच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे हे आपली दुसरी टर्म लढत आहेत. त्यांच्या या लढतीवर विरोधी पक्ष तसेच अपक्ष उमेदवार यांनी विकास म्हणजे काय हेच आमदारांना कळले नसल्याचा आरोप करीत कर्जत – खालापूर येथील नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. गेले अनेक वर्षे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील नागरिकांना पुणे, पनवेल, वाशी, कल्याण, उल्हासनगर किंवा मग ठाणे गाठावे लागत आहे. मात्र इतके वर्षे याठिकाणी आमदारकी भोगणाऱ्यांनी एकही रुग्णालय या मतदार संघात दिले नाही, येथील जनतेचा रोजगाराचा प्रश्नही त्यांनी सोडविला नाही. असे अनेक मुद्दे समोर असल्यामुळे आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी समोर आणत जनतेच्या विकासाचे वारे म्हणजेच सुधाकर घारे हे समीकरण डोळ्यासमोर ठेवले आहे. सुधाकर घारे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रातील जनता ही आपल्याला मानणारी जनता आहे. त्यांच्या प्रत्येक शंकेचे निराकरण करण्यासाठी आम्ही मंडळी कटिबद्ध असतो. रात्री अपरात्री कोणालाही काहीही मदत असुदे आम्ही सर्वच जण त्यावेळी वेळ काळ याचे भान न ठेवता त्यांच्या मदतीसाठी धावत असतो, त्यामुळे या मतदार संघातील जनता ही आताच्या प्रचार दौऱ्यामध्ये आमच्यासोबत मोठ्या संख्येने सामील होत आहे. मला खात्री आहे की, मला येथील जनता या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रवादी घोषणापत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन
मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे घोषणापत्र येत्या तीन दिवसात जाहीर केले जाईल – आनंद परांजपे अनिल ठाणेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ या जाहिरनाम्याचे प्रकाशन व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. लाडकी बहीण योजनेची रक्कम रुपये २१०० पर्यंत वाढवणार, शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, २.५ दशलक्ष नोकर्या, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून मतदारसंघनिहाय जाहिरनामा आणि राज्यव्यापी आश्वासने ही जाहीरनाम्याची वैशिष्टे असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन ते तीन दिवसात १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघासाठीचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. यावेळी महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला हे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने निवडणूक लढवीत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघासाठी आपला जाहिरनामा जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईत तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदियात जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या रुपये १५०० वरुन प्रति महिना रुपये २१०० पर्यंत वाढवणार असल्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मासिक डीबीटी हस्तांतरण असेल जे २.३ कोटी महिलांना प्रतिवर्षी रुपये २५ हजाराचा लाभ देईल. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने आहेत. ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन रुपये १५०० वरुन रुपये २१०० प्रति महिना वाढविण्यात येणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रति वर्ष रुपये १२ हजारावरुन रुपये १५ हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे.शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, एमएसपी अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्ध पिकांसाठी २० टक्के अतिरिक्त अनुदान, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून ग्रामीण कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ही सर्वात मोठी योजना आहे. २.५ दशलक्ष नोकर्या, प्रशिक्षणाद्वारे १ दशलक्ष विद्यार्थ्यांना रुपये १० हजार मासिक स्टायफंड प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे. अंगणवाडी व आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांना रुपये १५ मासिक वेतन, सौर आणि अक्षय उर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३० टक्के कमी करण्याचे वचन. सरकार स्थापनेच्या १०० दिवसात नवीन महाराष्ट्र व्हिजन सादर करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर अंकुश ठेवण्यात येईल, असे वचन महाराष्ट्रवादी घोषणापत्रात देण्यात आले आहे. ०००००
सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करा – सुहास देसाई
अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विनधान करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्ष सुजाता घाग यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले आहे. आ. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. या टीकेच्या अनुषंगाने ही तक्रार करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी , प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, माधुरी सोनार ताई , कोपरी पाचपाखाडी विधान सभा अध्यक्ष विक्रांत घाग, भिषण सिंग जोहर, इक्बाल शेख, राहुल बर्वे, फुलबानो पटेल, ज्योती निम्बर्गी, रेश्मा भानुशाली, हाजी बेगम , मल्लिका पिल्ले, आशिष खाडे आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महिला धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण, युवा धोरण, क्रीडा धोरण निश्चित केले आहे. याबाबत शासन दरबारी नोंद आहे. असे असतानाही विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने शरद पवार यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले, असे विधान केले. त्यांचे हे विधान म्हणजे जनतेला मूळ मुद्यापासून भरकटवून टाकण्याचा प्रकार आहे. जनतेची दिशाभूल करून जनतेच्या मनात शरद पवार यांच्याबाबत रोष निर्माण करून माथेफिरूंकडून शरद पवार यांचे जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रकार हा गंभीर गुन्हा असून आदर्श आचारसंहितेचा भंग देखील आहे. तसेच, सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्रक्रियेबाबतही अनुचित वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या तोंडाबाबतही लाजीरवाणी विधाने करून आमच्या तसेच शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी लोकांना चिथावणी देऊन शरद पवार यांच्या जीविताला धोका निर्माण करणे, जनतेची दिशाभूल करून आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, तसेच आमच्या भावना दुखावणे असे प्रकार केल्याने सदाभाऊ खोत यांच्यावर संबधित प्रकरणाचे योग्य त्या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश – किशन जावळे
अशोक गायकवाड रायगड : सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवार २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड किशन जावळे जारी केला आहे. भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार, २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अधिनियम, १८६२ चे कलम ५ (ग) मधील तरतुदीनुसार या विधानसभा मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पडणे याकरिता बुधवार २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद राहणार आहेत.
उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे तपासणीकरिता सादर करावीत- प्रकाश सकपाळ
अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण ०९ अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक खर्चाची प्रमाणके व उपप्रमाणके, रोख रक्कम तपशील इत्यादी व निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खालीदिलेल्या तारखांना निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे. या खर्चाच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या लेख्यांची तपासणी, निवडणूक खर्चावर देखरेख सूचनांचा सारसंग्रह २०२४ मधील भाग-क (एक) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार प्रचार कालावधीत किमान तीन वेळा होणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक, १८९-कर्जत विधानसभा रमेश कुमार हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी पुढील नमूद वेळापत्रकानुसार करणार आहेत. मा.निवडणूक खर्च निरीक्षक, १८९-कर्जत विधानसभा यांच्यामार्फत उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- प्रथम, १० नोव्हेंबर वेळ दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.३०, द्वितीय, दि.१४ नोव्हेंबर २०२४ वेळ दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.३०, तृतीय, दि.१८ नोव्हेंबर २०२४ वेळ दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.३०, स्थळ:- प्रशासकीय भवन, पोलीस ग्राऊंडच्या शेजारी कर्जत, ता.कर्जत सदर तपासणीवेळी उमेदवाराने आपले खर्च रजिस्टर नोंदवही विहित पद्धतीने सादर न केल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७७ व भारतीय दंडसंहितेच्या कलम १७१-१ अन्वये पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी. ०००००
