रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांच्या घरंदाज गायकीने श्रोते मंत्रमुग्ध
पनवेल : देशभरात शास्त्रीय गायनाची छाप पाडणारे रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनी दीपसंध्या संगीत महोत्सावात आपल्या सुमधूर घरंदाज गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या सौजन्याने व संगीत कलामंच, डोंबिवली आयोजित दोन दिवसीय कार्यक्रम “दीपसंध्या संगीत महोत्सव” डोंबिवली मधील टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात पार पडला. हा महोत्सव शास्त्रीय संगीतावर आधारित होता. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी प्रथम अम्रीता मोरे यांचे सुश्राव्य सतारवादन झाले. त्यांनी जयजयवंती हा राग सादर केला. त्यानंतर योगेश हुन्सवाडकर यांनी राग पूर्वी सादर केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रूपक पवार यांचे तबलावादन झाले. त्यांनी ताल तीनताल पेशकारी केली. त्यानंतर पं. उमेश चौधरी यांनी केदार रागातील ख्याल गायकी सादर केली. त्यांच्या “अबीर गुलाल ” या अभंगाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. “त्यांनी “स्वामी कृपा कधी करणार’ या सुंदर भैरवीने पहिल्या दिवसाची सांगता केली. दुसऱ्या दिवशी महेश कुलकर्णी यांच्या पुरीया कल्याण या रागातील पेशकारीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर हिंदुस्थानी संगीत अकादमीचे संचालक विनायक नाईक यांचे तबलावादन झाले. त्यांनी ताल तीनताल ची पेशकारी केली. त्यांची विद्यार्थिनी कु. भक्ती जाधव हिने सहवादन केले. विदुषी पंडीता शुभदा पराडकर यांच्या जयजयवंती रागाने कार्यक्रमाची सांगता झाली. ठुमरी, कजरा, टप्पा गायनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शुभदाताईंनी उपस्थित श्रोत्यांच्या आग्रहास्तव शेवटी भैरवी रागातील टप्पा सादर केला. या महोत्सवात तबल्यावर निशाद पवार, नितीन डेगवेकर, गिरीश आठल्ये, प्रवीण करकरे, आणि विनायक नाईक यांनी हार्मोनियमवर वासुदेव रिसबुड, मंदार दिक्षित, या कलाकारांनी साथसंगत दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तनुश्री जोग यांनी केले.