Month: November 2024

तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य

 मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात   मुंबई – दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातून सातत्याने होत आहे. मात्र, नव्या डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेचा पर्याय मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग ग्राऊंड बंद करणे तूर्तास अशक्य असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले. या डम्पिंग ग्राऊंडचा करार २०२७ मध्ये संपत आहे. त्यामुळे हा करार संपण्यापूर्वी नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. गोराई भागातील डम्पिंग ग्राऊंड काही वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली असून तेही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. सध्या त्या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबवण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. मात्र, हा प्रकल्प अजून कागदावरच आहे. याच डम्पिंग ग्राऊंडच्या एका भागात धारावीतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर पालिकेची भिस्त आहे. त्याव्यतिरिक्त विविध भागात कचरा संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्या-त्या भागातील कचऱ्यावर या केंद्रांवर प्रक्रिया केली जात आहे. या सगळ्या भागातील कचरा  डम्पिंग ग्राऊंडवर जाऊ नये, स्थानिक स्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट  लागावी असा पालिकेच्या घनकचरा विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात कचरा संकलन केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. बंदीसाठी न्यायालयात धाव कांजूर डम्पिंग ग्राऊंडविषयी स्थानिक पातळीवर प्रचंड असंतोष आहे. हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी कायम आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे यासाठी विक्रोळी विकास मंच  न्यायालयात गेला आहे.  डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी  दिले होते. मात्र, या डम्पिंग ग्राऊंडच्या कराराची मुदत २०२७ सालापर्यंत   आहे.  तत्पूर्वी ते बंद होण्याची शक्यता नाही.  कराराचे नूतनीकरण करून दिले जाणार नाही, असेही आश्वासन राजकीय पक्षांनी दिले आहे. जागेची चाचपणी सुरू डम्पिंग ग्राऊंडसाठी पालिका नव्या जागेचा शोध घेत आहे. तळोजा येथील जागेचा पर्याय निवडण्यात आला होता. मात्र मुंबईतील कचरा तेथे आणण्यास स्थानिकांचा विरोध आहे.  त्यामुळे हा पर्याय  जवळपास बारगळला आहे. आता अंबरनाथ येथील जागेच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.

महाराष्ट्राची घोडदौड; दोन्ही संघांचा बाद फेरीत प्रवेश

 कुमार व मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड : महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने 43व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीत महाराष्ट्राच्या मुली छत्तीसगडबरोबर तर मुले कोल्हापूरबरोबर लढतील. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भरतसिंग वसावेने (2.10 मि. 4 गुण) व आशिश गौतम (2.40, 1.40 मिनिटे व 4 गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राच्या मुलांनी पुद्देचरीवर 39-24 असा एक डाव राखून 15 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. जितेंद्र वसावे व सोत्या वळवी यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी 8 गडी बाद करीत त्यांना साथ दिली. पुद्देचरीकडून स्टेफनन 6 गडी बाद केले. महाराष्ट्राच्या मुलींच्या शेवटच्या साखळी सामन्यात यजमान उत्तरप्रदेशचा 28-5 असा एक डाव 23 गुणांनी धुव्वा उडविला. स्नेहा लामकाने (3.40 मिनिटे नाबाद संरक्षण), प्रतीक्षा बिराजदार (3.10 मि. व 6 गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उत्तरप्रदेशच्या मानसीने (1.30 मिनिटे व 2 गुण) अष्टपैलू खेळी करीत लढत दिली. बाद फेरीचे सामने: मुलींचे: महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड मुलांचे: महाराष्ट्र विरुद्ध कोल्हापूर कोल्हापूर व विदर्भ संघांचा सुध्दा बाद फेरीत प्रवेश कोल्हापूरच्या मुले व मुली आणि विदर्भच्या मुले व मुलींच्या संघानेही बाद फेरी गाठली आहे. मुलीमध्ये कोल्हापूर विरुद्ध विदर्भ आणि मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र आणि विदर्भ विरुद्ध ओडीसा असे बाद फेरीचे सामने होतील.

करावे येथे अतिक्रमण विरोधात धडक कारवाई               

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामांस नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

बाल विवाह मुक्त भारत अभियानाचा जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : बालविवाह ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविवाहविरोधी जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. 27 नोव्हेंबर हा बालविवाह प्रतिबंध दिन म्हणून विविध उपक्रमाद्वारे या प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविले जाते. जिल्ह्यातील हे अभियान ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सेवा संस्था/महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (डॉ. कैलास सत्यर्थी फाऊंडेशन संलग्न भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. बालविवाह या अनिष्ट प्रथेविरुध्द जिल्ह्यात 27 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संस्थेचे अशोक पवार, देवय्या आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बालविवाह ही अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी जाणीवजागृती महत्त्वाची असून जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. तसेच समाजातील सर्व अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्याची गरज अधोरेखित केली. सुर्यवंशी यांनीही बालविवाह प्रथेमुळे समाजात होत असल्याच्या दुष्परिणाम सांगून ही प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी समाजात विशेषतः ग्रामीण भागात प्रचार प्रसिद्धी आवश्यक असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी यासह ग्रामीण भागात चित्ररथाद्वारे बालविवाह प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

 संविधान दिनानिमित्त ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात उद्देशिकेचे समुहवाचन

 स्मारकाला संविधान दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई   नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ज्ञान हिच शक्ती या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित स्मारक म्हणून देशभरात ज्ञान केंद्र म्हणून नावाजले जात आहे. लक्षावधी देशी परदेशी पर्यटकांनी या ठिकाणी भेट देत येथील अद्ययावत समृध्द ग्रंथालय तसेच बाबासाहेबांचे जीवनचरित्र उलगडणारे छायाचित्र दालन व इतर सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. या वर्षीचा संविधान दिन हा अमृत महोत्सवी विशेष असल्याने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मारकास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच स्मारकातील सभागृहात संविधान उद्देशिकेच्या एकत्रित समुह वाचनाचा विशेष उपक्रम सेक्टर 15 ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील 280 विद्यार्थी व 10 शिक्षक यांच्या समवेत राबविण्यात आला. या प्रसंगी उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या समवेत शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच स्मारकातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानातील उद्देशिकेचे समुह वाचन केले. स्मारकातील ऑडिओ व्हिज्युअल ग्रंथालयात विशेष संविधान कक्ष निर्मिती करण्यात आली असून त्याठिकाणी संविधानाच्या मूळ प्रतिची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या कक्षामध्ये संविधानाशी संबधीत पुस्तके उपलब्ध्‍ करुन देण्‍यात आली आहेत. जेणे करुन संविधान अभ्यासकांना संविधानाविषयी सखोल अभ्यास करता येईल तसेच संविधान जाणून घेण्याची इच्छा असणा-या वाचकांना संविधान विषयक सांगोपांग माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध्‍ होउु शकेल. संविधान दिनी 1200 हून अधिक पर्यटकांनी स्मारकाला भेट दिलेली असून ग्रंथालयातील स्वतंत्र संविधान कक्ष पाहून व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे स्मारकातील विविध सुविधांचीही प्रशंसा केली आहे. ००००

भारतीय संविधान दिनानिमित्त आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, महासचिव प्रमोद इंगळे, प्रभाकर जाधव, ठाणे शहर अध्यक्ष  ओबीसी नेते सुरेश पाटील खेडे जिल्हाधिकाऱ्यांना अशोक शिंगारे यांना संविधान फेम देऊन शुभेच्छा दिल्या.

 वैमानिक तरूणीची मुंबईत आत्महत्या

पवई पोलिसांनी केली मित्राला अटक   मुंबई : दिल्लीतील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय वैमानिक तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी पवई पोलिसांनी २७ वर्षीय मित्राला अटक केली आहे. अंधेरीमधील मरोळ येथील राहत्या घरात सृष्टी विशाल तुली (२५) या तरूणीने आत्महत्या केली होती. आरोपीने मृत तरूणीचा मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मृत तरूणीच्या कुटुंबियांनी तिची हत्या करून ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलीस कॅम्पमागील कानाकिया रेन फॉरेस्ट येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या या तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मित्र आदित्य पंडितनेही वैमानिक बनण्यासाठी परीक्षा दिली होती. पण तो अपयशी ठरला होता. प्राथमिक तपासानुसार, तुली रविवारी गोरखपूरहून परतल्यावर तिचे पंडितसोबत भांडण झाले. पंडित रात्री १ वाजता दिल्लीला निघून गेला. तुलीने त्याला दूरध्वनी करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे पंडित परत तिच्या घरी आला, पण दार आतून बंद होते. त्याने किल्लीवाल्याला बोलवून दरवाजा उघडला तेव्हा तुलीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. पंडितने तिला मरोळमधील सेवन हिल्स रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. कुटुंबीयांचे आरोप तुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, पंडित तिच्यासोबत सर्वांसोबत भांडण करायचा. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. तसेच तिच्या खाजगी आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच तो तिच्यावर मानसिक दबाव आणत होता. पंडितने तुलीला औषध देऊन मारले असावे आणि नंतर आत्महत्येचा बनाव केला असावा, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी पंडीतला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तुलीचे काका विवेककुमार यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तुली गोरखपूरमधली पहिली महिला वैमानिक होती. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही तिला सन्मानित केले होते. तिच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तुलीच्या कुटुंबाचा लष्करी वारसा होता; त्यांचे आजोबा नरेंद्रकुमार तूली १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झाले होते.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले

मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली. बुधवार, २७ नोव्हेंबरपासून…

 ठाण्यातील १३०० घरांसाठी ५ हजारांहून अधिक अर्ज

 PM आवास योजनेतील घरांना प्रतिसाद नाही   मुंबई – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने सुमारे ११ हजार घरे विक्रीसाठी काढण्यात आली आहेत. यामधील १५ आणि २० टक्के योजनेंतर्गत १३०० घरे होती. ठाण्यात असलेल्या  १३०० घरांना १०० टक्के प्रतिसाद असून, या घरांसाठी सुमारे पाच हजारांहून अधिक अर्ज आले होते. ही सगळी घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या गटातील आहेत. मात्र, पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता या घरांची विक्री व्हावी म्हाडाकडून सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेमधील १० ते ११ हजार घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. विरार, बोळींज, शिरढोण येथे असलेली घरे दूर आहेत. मात्र, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आता ही घरे विकली जावीत म्हणून या घरांची अधिकाधिक जाहिरात केली जाणार आहे. लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे. सोशल मीडियाचा यासाठी वापर केला जाणार आहे. दुसरीकडे कोकण मंडळाची २२०० घरे लॉटरीसाठी आहेत. या घरांनाही कमी प्रतिसाद आहे. निवडणुका संपल्या असून, लोकांपर्यंत या घरांची माहिती पोहोचविली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत अर्जदार अपात्र ठरण्याचे प्रमाण कमी असते. कारण यात अटी-शर्ती नाहीत. त्यामुळे अर्जदाराने मुदतीत पैसे भरले नाही तरच तो अपात्र ठरतो. अशावेळी प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराला प्राधान्य दिले जाते. पहिला कोण ? एका घराला चार अर्ज आले असतील तर त्यातील पहिल्या अर्जदाराला संबंधित घर दिले जाते. यात दिवस, वेळ पाहिला जातो. उदा. सोमवारी तीन लोकांनी अर्ज केला. मंगळवारी एकाने अर्ज केला तर सोमवारचा अर्ज गृहीत धरला जातो. यातही कोणी किती वाजता अर्ज केला हे पाहिले जाते. हे सगळे पाहून यामध्ये सगळ्या अर्थाने जो पहिला असेल त्याला घरासाठी प्राधान्य दिले जाईल. २५ टक्के रक्कम भरा संबंधित अर्जदाराला पात्र असल्याचे कळविले जाईल. त्याने घराचे पैसे भरल्यानंतर म्हाडाकडून घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल. एकूण घराच्या किमतीपैकी २५ टक्के रक्कम संबंधिताने भरणे अपेक्षित असते. सर्व प्रक्रिया ऑनलाइन आता स्वीकृती पत्र देण्याची पद्धत नाही. म्हाडाकडून आता संबंधितांना पात्र ठरल्याचे मेसेज पाठविले जातात. आता कोणतीच प्रक्रिया ऑफलाइन नाही. सगळ्या प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी दलालांची मदत घेऊ नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे. 0000

‘स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!’

 पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन   ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर भावनिक बुध्दिमत्ता महत्त्वाची आहे. सर्व परीक्षार्थींनी या परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जावे आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन मुंबई लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींसाठी नुकतेच डॉ. रवींद्र शिसवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी डॉ. शिसवे यांचे स्वागत केले. सन २००१च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले डॉ. रवींद्र शिसवे यांनी यावेळी ठाणे आणि मुंबईतून स्पर्धा परीक्षांना बसलेल्या परीक्षार्थींशी संवाद साधला.  अभ्यासाबाबत संवेदनशीलता, सकारात्मकता महत्त्वाची आहे. त्याचवेळी, समाजातील नकारात्मक लोकांपासून दूर राहणे, अभ्यासाचे योग्य पध्दतीने नियोजन करणे, त्यासाठी वेळेची आखणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. केलेल्या  अभ्यासाची पेन्सिल उजळणी करणे, विचार करण्याची पद्धत कशी विकसित करायची, महत्त्वाचे मुद्दे कसे काढायचे याच्याबद्दलही डॉ. शिसवे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, अभ्यासाच्या नोट्स काढताना शॉर्ट हॅण्ड कौशल्याचा वापर करण्याचीही सूचना त्यांनी केली. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा, सातत्य, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, असेही डॉ. शिसवे म्हणाले. विविध उदाहरणे देत डॉ. शिसवे यांनी हा संवाद साधला. परीक्षार्थींच्या प्रश्नोत्तरांनी या सत्राची सांगता झाली. संस्थेचे गिरीश झेंडे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.