अनिल ठाणेकर ठाणे : कोणत्याही दहशतीला न घाबरता उत्तर भारतीय नेते पंकज पांडे आणि त्यांच्या सहका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नेहमी उत्तर भारतीयांचे शोषण केले. कळवा पूर्व परीसरामध्ये स्मशानभूमी उभारु शकले नाहीत. छटपूजा घाटाची निर्मिती करु शकले नाहीत. कायम सनातन धर्माचा अपमान करायचे काम जितेंद्र आव्हाडांनी केला. पंकज पांडे आणि त्यांच्या सहका-यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणखी ताकद वाढली आहे असे मत प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षामधील कळवा (पूर्व) परीसरातील असंख्य उत्तर भारतीय पदाधिका-यांनी रविवारी पंकज पांडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंकज पांडे, राजू राजभर, अतुल शेडगे, संतलाल सिंह, अरविंद दुबे, राजेश सिंग, रोहीत यादव, सुरज सहानी, राकेश वर्मा, मिरा पाठक यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. अहंकाराच्या विरोधात आम्ही करीत असलेले काम बघून पंकज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचे मी स्वागत करतो. कळव्यामध्ये आव्हाडांकडून हिंदु मुस्लिम चे राजकारण करुन जातीवाद पसरवला जात असल्याचे देखिल प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यावेळी आव्हाडांचे नाव न घेता म्हणाले.जितेंद्र आव्हाडांना उत्तर भारतीयांची मते पाहीजेत पण उत्तर भारतीय नको, हा कुठला न्याय ? आव्हाडांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेत १५ वर्षे आव्हाडांना साथ दिली पण, त्यांनी उत्तर भारतीय लोकांसाठी काहीही केलेले नाही. १५ वर्षे आमदार असून देखिल कळवा (पूर्व) परीसरामध्ये छठ पूजा घाटाची निर्मिती आव्हाड करु शकले नाहीत. फक्त आम्हांला आश्वासन दिले गेले. १५ वर्षात कळवा पूर्व परिसरासाठी स्मशानभूमीची निर्मिती जितेंद्र आव्हाड करु शकले नाहीत. केवळ भाषणात आणि पुस्तकात आम्हांला आश्वासन दिले गेले. असे वक्तव्य उत्तर भारतीय नेते पंकज पांडे यांनी केले.