मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याने आता प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी करण्याच्या एकमेव उद्देशाने आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा भिंडे याने प्रकरणातून दोषमुक्तीची मागणी करताना केला आहे.
भिंडे याने अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते व अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही केली होती. उच्च न्यायालयाने मात्र, त्याची अटक कायदेशीर ठरवून त्याची याचिका फेटाळली होती. त्यानंतर, भिंडे याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात त्याला जामीन मंजूर केला होता. भिंडे याने आता आपण निर्दोष असल्याचा आणि आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवल्याचा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाथाडे यांनी भिंडे याच्या अर्जावर पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
दरम्यान, कंपनीच्या स्थापनेपासून ते दुर्घटनाग्रस्त महाकाय फलक लावले जाईपर्यंत आपण कोणत्याही प्रकारे कंपनीशी संबंधित नव्हतो. याउलट, सध्या जामिनावर असलेल्या प्रकरणातील सहआरोपी जान्हवी मराठे या कंपनीच्या संचालकपदी कार्यरत होत्या त्यामुळे, आपल्यावरील आरोप अस्पष्ट आणि संदिग्ध असून गुन्ह्यातील आपल्या सहभागाबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावाही भिंडे याने केला आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *