अनिल ठाणेकर
ठाणे : महापालिकेने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला आहे. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, माणसे संपवून केला जाणारा विकास काय कामाचा? ठामपाच्या या विकास आराखडय़ात संपूर्ण कळवा – खारीगांव उद्ध्वस्त होणार आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून पाचशे ते हजार इमारतींवर वरवंटा फिरवण्याचा कट आखला असून यात तब्बल ४५ हजार रहिवाशी बेघर होणार आहेत. कोणाच्या भल्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे? असा सवाल करून या आराखडय़ाच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा मुंब्रा कळव्याचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
नव्या प्रारुप विकास आराखड्यात कळवा आणि खारीगांव भागातील तब्बल १ हजारांच्या आसपास इमारती बाधीत होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत. कळव्यातील ४५० इमारती या विकास आराखडय़ामुळे बाधीत होणार असून खारीगावात देखील ५५० च्या आसपास इमारती बाधीत होऊन येथील तब्बल ४५ हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे, मैदाने, बाधीत होत असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. विकास आराखडा तयार करताना ज्या काही करामती केल्या आहेत; त्याचाही पर्दाफाश आपण करणार असून कावेरी सेतूची मालकी कोणाकडे आहे. त्याचा एफएसआय वापरता येतो का? ते देखील आता पाहणार असल्याचे ते म्हणाले.कळवा- खारीगांव येथील रहिवाशांना मारुन असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. ठाणे महानगरपालिकेने खारीगांवमधून डीपी रोडचा प्रस्ताव टाकला आहे. हा डीपी रोड पुढे नाशिक महामागार्ला जोडला जाणार आहे. या डीपी रोडमुळे खारीगांवची मूळ संस्कृती नष्ट होणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खारीगांवातील १७ रहिवासी इमारती, ग्रामपंचायतपासूनची १८ जुनी घरे तसेच खारीगांवची ग्रामदेवता जरीमरीचे प्राचीन मंदिरही या विकास आराखडय़ामुळे तोडले जाणार आहे. त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच लोकांना उद्ध्वस्त करणारा हा विकास आराखडा एक इंचही पुढे जाऊ दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले. इथे विकास आराखड्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र कळवा, मुंब्रा या भागातील विकास आराखड्यातील रस्त्यांवरच अतिक्रमणे उभी राहत आहेत. येथील पालिका अधिकारी प्रति चौरसफुटामागे ३०० रुपये घेऊन आपले खिसे भरत आहेत. परंतु कारवाई करण्यासाठी पालिका पुढे येत नसल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.
००००