मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय तापमान दिवसागणिक वाढत चालले असले तरी मुंबई ठाण्यासह राज्यातील तापामानात कमालीची घट होत आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला आहे. राज्यामध्ये शनिवारी नाशिक येथे ८.९ या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर मुंबई आणि ठाण्यात थंडीचा कडाका असणार असल्यामुळे कपाटात धुळ खात पडलेले स्वेटर आता सक्तीने काढावे लागणार आहेत.
‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान आज धडकले. त्यामुळे त्या भागात काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. पण सोमवार, मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यातही सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोमवारी २ डिसेंबरला सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर मंगळवारी ३ डिसेंबरला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
राज्यात शनिवारी पुणे, नाशिक या दोनच शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली गेले. तर बऱ्याच शहरांचे तापमान ११ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. फेंगल वादळ जमिनीवर आल्याने आता तापमानाचा पारा आणखी घसरणार नाही.